बदलाची नांदी

*बदलाची नांदी*

कात टाकली शाळेने
बदलला गणवेश
डिजीटल शिक्षणाने
अंगी बानविला जोश

गेली बदलून शाळा
बदलले  गुरूजण
काय हवे विद्यार्थ्यांना
त्यांनी जाणलेय मन

अ आ ई गिरवणा-या
हाती आलाय माऊस
सेमी इंग्रजीच्या संगे
घर  झालय  हाऊस

गेली हातातली छडी
झाली भयमुक्त शाळा
तंत्रज्ञानी  शिक्षणाचा
लागे विद्यार्थ्यांना लळा

झाली डिजीटल शाळा
बोलु लागले पुस्तक
नव्या शिक्षणाची नांदी
गेली  देऊन  दस्तक

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

घासभर धान्य

*घासभर धान्य*

सई दळीते दळण
भल्या पहाटे उठून
जातं वाजे घरोघरी
येतं तांबडे  फुटून

घासावरी घास धान्य
टाके जात्याच्या मुखात
होतो तरास पाटीला
तरी  गातेय  सुखात

घासावरी घास धान्य
टाके जात्याच्या मुखात
होतो तरास पाटीला
तरी  गातेय  सुखात

काट पदराची साडी
तिला शोभून दिसते
गाते जात्यावर ओव्या
सई  गालात  हसते

रांधल्याचा जात्यावर
नाही कसलाही त्राण
रात्रंदिस  घरासाठी
तिचे  राबतात  प्राण

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नको माझ्यावर रूसू

*नको माझ्यावर रूसु*

नको माझ्यावर सखु तू रूसु ग
नको कोपऱ्यात जाऊन बसू ग

सोनुच्या नादी तू नको लागु
त्या RJ वाणी तू नको जगू
उगी खड्डे नको शोधत बसू ग

विदेशात जास्त तू फिरू नको
भाषणबाजी जास्त करू नको
आपल्याच शब्दात नको फसू ग

अच्छे दिनाचे स्वप्न तू पाहू नको
गोड बोलण्यात अशी वाहू नको
बघ टमाटेही लागलेत आता हसू ग

वंशाला हवा दिवा,पणती विजवती
दाभोळकर मारून कर्मकांड माजवती
भविष्य अंधारात लागलय दिसू ग

ती बेटी जरी या भारत भू ची
शिकार ती नित्य वासनांधाची
शुद्ध विचारही लागले नासू ग

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

घासभर धान्य

*घासभर धान्य*

सई दळीते दळण
भल्या पहाटे उठून
जातं वाजे घरोघरी
येतं तांबडे  फुटून

घासावरी घास धान्य
टाके जात्याच्या मुखात
होतो तरास पाटीला
तरी  गातेय  सुखात

घासावरी घास धान्य
टाके जात्याच्या मुखात
होतो तरास पाटीला
तरी  गातेय  सुखात

काट पदराची साडी
तिला शोभून दिसते
गाते जात्यावर ओव्या
सई  गालात  हसते

रांधल्याचा जात्यावर
नाही कसलाही त्राण
रात्रंदिस  घरासाठी
तिचे  राबतात  प्राण

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

श्रावण

🌧 *श्रावण*🌾

आला श्रावण महिना
शालू  हिरवा नेसून
लेकीबाळी घेती मजा
झोक्या वरती बसून

नागपंचमीचा  सण
आले आनंदा उधान
हंडी दह्याची कृष्णाला
आहे फोडायचा मान

नारळीची ती पौर्णिमा
आणी सागरा भरती
राखी बांधून भावाला
ताई औक्षण करती

ऊन पावसाचा खेळ
चाले राना माळावरी
थोडे सुकताच अंग
चिंब भिजवती सरी

इंद्रधनुष्याचा वेल
दिसे क्षितीजावरती
तृप्त ढेकर देतीया
पाणी पिऊन धरती

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

प्रेमयात्री

🌹🌹 *प्रेमयात्री* 🌹🌹

टाक पावले झपाझप अजूनी चांदरात आहे
तव लावण्य बहारण्याची ही सुरूवात आहे

लपतो का सुर्य कधी काळसर त्या ढगांनी?
तुझ्या यौवनाची चर्चा सखे घराघरात आहे

चाखला मी तो गुलकंद ओठांवर असलेला
माधुर्य त्या ओठातले या ओठास ज्ञात आहे

न बोलताच काही ये या छातीस बिलगाया
तुझी जागा फक्त माझ्या या -हुदयात आहे

सोड बाण नयनांचे कर घायाळ काळजाला
वेदना होतील कशा ते आजही प्रेमात आहे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

पटलं तर बोला

*पटल तर बोला*

झिंगलोय जरी आज मी
तरी खरं खरं बोलाणार
खरं बोलल्याबिगर आज
गटारात नाही लोळणार||धृ||😇

दिवसाढवळ्या लेकीबाळी
बलात्काराला बळी पडत्यात
पुरोगामी माझ्या राज्यामध्ये
रोजच अशा घटना घडतात
निर्ढावलेल्या *त्या* हातांना
सांगा कोण आता तोडणार||१||

भ्रष्टाचाराने लोकनेत्यांचे
मावत नाही कंबरेवर पोट
नौकरीविना नवयुवकांचे
चिंतेने सुकून गेलेत ओठ
बेरोजगार अशा हातांना
सांगा कोण काम देणार||२||

शिक्षणव्यवस्थेत आज
ताळमेळ दिसत नाही
पहिल्यासारखा गुरूजी
मनमोकळा हसत नाही
बदलीच्या गुंत्यातून त्याला
कोण सलामत काढणार||३||

नवरी मिळेना तरूणाला
कितीही शहाणे वागून
गर्भपात अजूनही होतो
कायदा खुंटीला टांगून
कळीला खुडणा-या हातांना
कोण जबर शिक्षा करणार||४||

पिलोय जरा जास्तच थोडं
म्हणून पडतायत ही कोडं
चांगली चाललीय जींदगी
कुठं आडतयं  माझं  घोडं
पण कुठवर हे निर्लज्याचे
जीवन आपण  जगणार||५||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

पावसाळी रात्र

*पावसाळी रात्र*🌹

रात्रीच्या चिंब पावसात
तू चिंब भिजूनीया यावे
माझ्या छातीवर विसावता
श्वासही चिंब चिंब व्हावे

केस असतील तुझे ओले
अन् थेंबही तव गालावरी
मी ओटांनी टिपू लागता
तू होऊनीया जावी बावरी

गेले विझूनीया सारे दिवे
ही रात पावसात न्हाली
चिंब भिजलेली ती बटा
तुझ्या गालावरती आली

भिजली ती सारी वसने
तिचे तनही भिजून गेले
बिलगता  मजला  तिने
हसू   गालावर  उमलले

तो चंद्र लपला ढगाआड
तरी हा चंद्र हातात आहे
पावसाळी या काळोखात
तिला न्याहाळून मी पाहे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

तुझ्या -हुदयात

🌹🌹 *तुझ्या -हुदयात*🌹🌹

तुझ्या -हुदयात माझी जागा राहू दे
प्रेम मालेतील मजला धागा होऊ दे

या जुल्मी पावसाचा भरवसा काय
आज मनसोक्त चिंब उभा न्हाऊ दे

यौवन तुझे सखे सौंदर्यांने भारलेले
डोळ्यांत एकवेळ साठवून पाहू दे

गुलाबी हे ओठ तुझे अमृताची खाण
ओठांनी एकवेळ मज चाखून पाहू  दे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

फुगवटा

*फुगवटा*

पावसाचे पाणी
समुद्रात शिरताच
नदीपात्रात दिसून येतो
फुगवटा!

खिरापतीप्रमाणे वाटल्यात 
गुण तोंडी आणि प्रॕक्टिकलचे
गुणपत्रीकेत गुणांचा दिसून आला
फुगवटा!

पावसाळ्यात पावसाने
घराचे दरवाजे होतात जाडे
दरवाजातही आद्रतेचा दिसून येतो
फुगवटा!

हाडांची काडे करून
राबतोय शेतकरी शेतात
भ्रष्टाचाराने नेत्यांच्या पोटाचा
पाहा दिसून येतोय
फुगवटा!

खोटीच तिची करावी
लागतेय नेहमी मला तारीफ
सत्य सांगायला जावं तर
गालावरती दिसून येतो
फुगवटा!

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

कुठं कुठं

*कुठं.....कुठं*

कुठं  रिमझिम  धारा
कुठं सोसाट्याचा वारा
कुठं  ढगाविना  आहे
नभाचा  कागद  कोरा

कुठं  नद्यांची  दुथडी
कुठं  महापूर  आला
कुठं पाण्याविन जीव
आता कासावीस झाला

कुठं अतिवृष्ठी  झाली
कुठं  गारपीट  झाली
कुठं पाण्याच्या चिंतेने
झाली पापणी  ओली

कुठं  उच्छाद  ढगांचा
कुठं  मातला  वरूण
कुठं नापिकी म्हणोनी
फासी  घेतोय तरूण

कुठं  असं  कुठं  तसं
खेळ निसर्गाचा असा
कुठं  सतृप्त  ढेकर
कुठं कोरडा उसासा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आयुष्याचं ओझं

*आयुष्याचं ओझं*

डोक्यावर माझ्या हाय
उखळीचा  वरवटा
कडेवर  घेतला  मी
माझ्या लाडाचा ग पोट्टा

नजरेत माझ्या काय
दोन वेळचं जेवण
त्याच्यासाठी पायपीट
घेते अंगावर उन्हं

तडूपाचा बांधुनीया
झोका माझीया उराशी
घेते पान्हाही पाजूनी
वेळ काढूनी जराशी

असं  भटकत  जीणं
आलं माझीया नशीबी
मुलं ठेवीन सुखात
माझी राहीन कशीबी

तोल  सावरत  गेलं
सारं आयुष्यच माझं
कधी उतरणारं हे
माझ्या डोईचं ग ओझं?

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पहाट

🌹 *पहाट* 🌹

सुटला पहाट वारा
मंद झाल्या तारका
बहरला मोगरा अन्
सुगंध येतो सारखा

पुर्वेकडच्या वेशीवर
सांडला कोणी तांबडा
केव्हापासून ओरडतो
क्वॉकक क्वॉक कोंबडा

गवतावर त्या दंवबिंदूनी
साम्राज्य मांडून ठेवलं
अनवाणी पायाला मग
नकळत त्यानं भिजवलं

नवी घेण्या झेप पुन्हा
घरट्यात किलबिलाट
चालू लागेल आज पुन्हा
झोपलेली ती पायवाट

मांगल्याचा सुगंध पुन्हा
दरवळू पाहे घरात
शेणमातीचा सडा अन्
रांगोळी शोभे दारात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

सुगरण मी

*सुगरण मी*

काडी काडी जमवीली
केला आशीयाना उभा
वारा येता  जोशामधी
जाई भिडायला  नभा

टापटिप  दिसे  खोपा
सुगरण  मी  नावाची
त्यात खेळतील माझी
पिल्ले इवल्या जीवाची

नको लागायला त्यांना
ऊन  पाऊस  नि वारा
माझ्या आशा खोप्यामध्ये
नाही धोक्यालाही थारा

बसूनीया खोप्यावर
घेते झोका जरावेळ
पुन्हा ऊन सावलीशी
आहे खेळायचा खेळ

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शब्द

🌹 *शब्द*🌹

शब्द तोलून बोलावा
शब्द विंचवाचा डंक
शब्द करतो राजाही
शब्द  बनवितो रंक

शब्द  आईचा  पदर
शब्द आधार पित्याचा
शब्द झुळझुळ पाणी
शब्द घोंघाट रित्याचा

शब्द  मधूर  भाषण
शब्द फुलांची ओंजळ
शब्द वाचाळता व्यर्थ
शब्द अश्रुंचा ओघळ

शब्द जोडतात मन
शब्द तोडतात मन
शब्द हसवती आणि
शब्द  रडवती  मन

शब्द भावनांचा अर्थ
शब्द काळजाला स्पर्श
शब्द फुलांचा सुगंध
शब्द  फुलवतो  हर्ष

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बिनलाजा

👊🏻👊🏻 *बिनलाजा*👊🏻👊🏻

बिनलाजे आम्ही | आहोतच खरे |
एवढीच पुरे | ओळखही ||

दिनरात आम्ही | चॕटींग करतो |
दिस ना सरतो | त्याच्याविना ||

विषय आम्हाला | नाहीच लागत |
बसतो जागत | उगीचच ||

मान नित्य खाली | मोबाईल मध्ये |
नाही काही धंदे | याच्या परी ||

आई बाप बोले | वाया गेली पोरं |
जीवाला तो घोर | यांच्यापायी ||

जीवंतपणीच | झालो आम्ही मडे |
विवेकाला तडे | जावू पाहे ||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

संध्याराणी

🐾संध्याराणी🐾

सुर्य जातो नभापार
सांज उजळून येते
हळूहळू  उजेडाला
संध्या कवेमध्ये घेते

पक्षी  लपे  घरट्यात
चारा पिल्लांना घालती
दुध देण्या वासरांना
गाय  गोट्यात  धावती

दिवे  टिमटिम  करी
गाव  चिडीचूप  होई
पीठ दळताना सख्या
ओव्या जात्यावर गाई

चांदोबाचा नभामधी
मुक्त संचार चालतो
नक्षत्रात चांदण्यांचा
भव्य संसार फुलतो

वारा शीतल वाहतो
अंग अंग रोमांचित
सख्याविन सजनीचे
नाही कशातही चित्त

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

फुफाटा

😌 *फुफाटा*🍂

डोळ्यातील आसवांना
त्यानं कितीदा पुसावं
दुःख दाबूनी उरात
किती खोटेचं हसावं

थेंब पाण्याचा एकही
नाही भूईला स्पर्शला
ढग वाकुल्या दावूनी
जणू खट्याळ हसला

घालमेल या जीवाची
उभं जळताना पीक
देवा पुढे सांगा किती
त्याने मागायची भीक

फक्त फुफाटा मातीचा
पोटी पडलीय आग
बरसाया वर्षाधारा
तुला येऊ दे रे जाग

किती पाहशील अंत
किती करशी लाचार
सुन्न पडलयं  डोस्कं
गेला  खुंटून विचार

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अभंग आषाढी

*आषाढी स्पेशल अभंग*

चंद्रभागे तीरी | वैष्णव जमले |
किर्तनी रमले | विठ्ठलाच्या ||

विठ्ठल विठ्ठल | झाला जयघोष |
पहावा जल्लोष | पंढरीत ||

देखून हरीला | तृप्त हे नयन |
आनंदले मन | वर्णू किती ||

नामाचा गोडवा | वर्षभर पुरे |
दुःख चिंता हरे | जीवनाची ||

विठ्ठल भजावे | पंढरीत यावे |
सोहळे पाहावे | आषाढीचे ||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

तिच्या मनातील पाऊस

🌹 *तिच्या मनातील पाऊस*🌧

थोडासा खेळकर
थोडासा अल्लड
नाजुक नि मुलायम
तिच्या मनातील पाऊस

थोडासा सुरमय
थोडासा रूसणारा
हळू गाली हसणारा
तिच्या मनातील पाऊस

थोडासा चंचल
थोडासा वेंदळा
काळजाला भिजवणारा
तिच्या मनातील पाऊस

थोडासा रिप रिप
कधी कधी टिप टिप
लपाछपीही खेळणारा
तिच्या मनातील पाऊस

थोडासा कडाडणारा
थोडासा धडाडणारा
डोळ्यात पूरही दाटवणारा
तिच्या मनातील पाउस

अंगाला स्पर्श करणारा
ओठांची तृषा शमवणारा
रोम-रोमांचित करणारा
तिच्या मनातील पाऊस

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

तू अशी ग कशी

🌹 *तू अशी ग कशी?*🌹

मी चोरून तुला पहावं
नि तू गालात हसावं
समजूनही सगळे काही
मी जाळ्यात फसत जावं

गालावरती खेळणाऱ्या
बटांना तू हळूच सावरावं
त्यांंच्याकडे पाहत मी
उगाचच  मनात  झुरावं

सुंगंधीत गजऱ्याला तू
केसात तुझ्या माळावं
नजरेने तू असतेस खेळत
भावनेशीही का खेळावं

गल्लीबोळी रानीवनी
मी तुला शोधत फिरावं
चतुर तू हरीणीवाणी
क्षणात  हरवून  जावं

-हुदयात तुझ्या हो तरी तू
कधीच बोलून न दाखवावं
तुझ्या एका हो साठी मी
मात्र दिवस दिवस झुरावं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

नाही भेगाळलं मन

*नाही भेगाळलं मन*

घेतो विसावा जरासा
पंढरीच्या  वाटेवर
पुन्हा होणार मी स्वार
पालखीच्या लाटेवर

धरा अंथरली खाली
आहे पांघराया नभ
देते आधार जीवाला
विठू नामाची ती उब

भेगाळलं पाय जरी
नाही भेगाळलं मन
उर्मी अंगात अजूनी
जरी थकले हे तन

काम  करताना  विठू
झोप  घेतानाही  विठू
विठू  किर्तनात   भेटे
भेटे    चराचरी   विठू

ओढ  विठ्ठल  भेटीची
मना लागलीय माझ्या
डोळा पाहिन आवडी
आता  पंढरीचा माझा
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

हिरवे गोंदणं

🌧 *हिरवे गोंदण* 🌱

थेंब पिऊन नभाचे
धरा आनंदे हसली
होवूनिया  नववधु
शालू हिरवा नेसली

पोट तिचे फाडूनिया
बीज आत कोंबियले
दोन दिस  राहूनिया
मग  हळू  अंकुरले

चिंब चिंब होवूनिया
हसे  नववधु  धरा
शुभ्र नितळ पाण्याचा
तिच्या उदरात झरा

पाणी पाणी चहुकडे
जणू  टिपूर  चांदणं
अंगावर तिच्या दिसे
छान  हिरवे  गोंदणं

किती  करावं  कौतुक
तिच्या आशा लावण्याचं
मला लाभलय भाग्य
तिचं लेकरू होण्याचं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

तू जवळ नसल्यावर

*तू जवळ नसल्यावर...*🌹

शब्दच होतात मुके
लेखणीही बोलत नाही
तू जवळ नसल्यावर
मज सुचतच नाही काही

घर-दार जणू वाटते
खायलाच टपून बसले
कसं समजावू त्याला
हसूही माझ्यावर रूसले

किचनही असते जणू
मूग गिळून पडलेले
तुझ्याच ग आठवणीत
एकांतामध्ये रडलेले

तू जवळ नसल्यावर
जगणेही हरवून बसतो
शून्यातही ग तुझाच
चेहरा शोधत बसतो

नकोस आणखी छळू
परतूनी लवकर ये
घरादारासह तू माझ्या
ह्रुदयाचा ताबा घे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

बालकविता

*बालकविता*

काळेकुट्ट ढग
आलेत भरून
मोरही नाचला
ताल  धरून

पावसाचे थेंब
टपकन पडले
मातीच्या पोटात
जावून  दडले

मातीला कोंब
अलगद आले
पावसाच्या रेघात
चिंबचिंब न्हाले

रानफूले फुलली
फुलली टणटणी
पाखरांच्या ओठी
गोडगोड गाणी

हिरव्या शालूने
सजली धरती
आनंदाला माझ्या
आलीय भरती

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

व्यर्थ न हो बलिदान

रात्रं -  दिवस   जवान
आहे   सीमेवर   उभा
त्यांच्या  संरक्षणामुळे
आम्हा स्वातंत्र्याची मुभा

आई   बाप  ताई बंधू
पत्नी  मुलगा मुलगी
सोडूनिया  सगळ्यांना
केली  सीमेशी सलगी

किती असेल ते प्रेम
भारताच्या मातीवर
गोळ्या शत्रुंच्या तैयार
झेलायला छातीवर

जवानांचे बलीदान
व्यर्थ नकोच जायला
वर्षे अनेक लागती
वीरव्यक्ती जन्मायला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

कमलदल

🌷 *कमलदल*🌷

जीणं असं उकीरड्याचं
आम्हा का नियतीने दिलं
माय  बापांना  मारूनी
का आम्हा  पोरकं केलं

नाही मायेचं कोणीही इथं
कोणाचा नाही पाठीवर हात
कोण  कुरवाळेल  केस
आणि चारेल मऊ दूधभात

पायी अडकलेत आमच्या
अतुट दारिद्र्याचे फास
कोण्या सटवीने लिहिला
आमच्या नशीबी वनवास

पोटामध्ये या कळ तरी
मुखावरती आमच्या हसू
कचऱ्यातुनच एक दिवस
चमकाणारे आम्ही असू

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*

वात्सल्य

*वात्सल्य*

जन्म देताच वासराला
गाय जिभेने चाटते
तिच्या अशा वात्सल्याचे
मला कौतुक वाटते

नाही कोणतं परिमाण
मोजण्या आईची माया
खूप मेहनतीने देवाने
बनविलीय तिची काया

देव असतो सर्वत्र तरीही
आपल्याला ना दिसतो
आईच्या शरीरातही त्याचा
अंश सामावलेला असतो

माय माझी माय तुझी ती
सार्यांचीच सारखी असते
माय पशुची असली तरी
मातृत्व तिथे वसलेले असते

तिच्यासारखी  ती माया
फक्त तीच  करत असते
म्हणूनच प्रत्येकाची आई
प्रत्येकासाठी बेस्ट असते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मला शाळेला जायचं

*मला शाळेला जायचं*

आई कर जरा  घाई
मला शाळेला जायचं
गेल्या संपुनिया सुट्या
नाही  घरला राहाचं

शोभुनिया दिसतयं
बघ दप्तर चिमिचं
नविनचं वाटतया
बघ पुस्तक नमीचं

माझ्या वर्गातील पोरं
जमा झाली असतील
खेळ  गप्पा  रंगवता
हळू  गाली  हसतील

रोज  जाईन  शाळेत
रोज अभ्यास करीन
सारूनिया काजळीला
वाट  ज्ञानाची धरीन

नको ठेवू  मला घरी
आता शाळेत जाऊ दे
आणि शिक्षण घेवूनी
मला साहेब  होऊ दे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

विठू तुझ्या नामाचा

*विठू तुझ्या नामाचा*

आस लागली मनाला
भेट  विठुची  होईल
संत जणांच्या संगती
पायी चालत जाईल

पंढरीच्या वाटेकडे
पाय ओढ घेती माझे
टाळ टिपरीच्या संगे
मुग्ध मृदंगही वाजे

पालखीत भेटतील
ज्ञाना तुका नामा जना
नाम स्मरता विठुचे
होई समाधान मना

मन  होईल  हे तृप्त
डोळा पंढरी देखता
विठू तुझ्या रे नामाचा
मग गोडवा ऐकता

तुझ्या पायी व्हावे लीन
हीच आस  या मनाची
तुझे  आशिष  मिळता
चिंता  मिटेल  उन्हाची

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*