माझा जिल्हा

*माझा जिल्हा माझी कविता*

जगाची ती माता
तुळजा भवानी
वसली जिथे ती
ती  हीच धरणी

शांततेची शिकवण
धाराशीव लेणीचा
चव एकदा चाखाच
कुंथलगीरी पेढ्याची

महादेवाचे डोंगर
आहेत पहारेकरी
येरमळी येडामाय
सदैव वास करी

नळदुर्ग किल्यातील
तो नरमादी धबधबा
अभेद्य आहोत आम्ही
हे सांगत आहे उभा

गोरोबाकाकांचे तेर
गाव प्रसिद्ध आहे
झरा ज्ञानाचा नित्य
सीना नदीतून वाहे

दुष्काळ,भुकंप
तरी आम्ही नाबाद
एकच जिल्हा तो
फक्त उस्मानाबाद

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*मु.तिंञज,ता-भुम,जि-उस्मानाबाद*
*ldsawant.bligspot.in*

महाराष्ट्र गीत

🚩 *महाराष्ट्र गीत* 🚩

जरिपटक्याचा भगवा झेंडा हा
अटकेपार होता फडफडला
स्वराज्य संस्थापक शिवरायही
सह्याद्रीच्या याच भुमीत घडला

पौरूषत्वाच्या कथा इथल्या
आसेतुहिमाचल लोक वदती
लाख सिकंदरांना गाडून इथे
नेहमीच पुरून उरते ही माती

राजकारण वा समाजकारण
दोन्हीही सुखाने इथे नांदती
पसरवायाला किर्ती जगामधी
शक्ती-युक्ती साथ कार्य साधती

हीच ती माती भिमाची जननी
आगरकर,टिळक,फुले,शाहुंची
काळाकुट्ट पाषाण फोडणाऱ्या
राकट कणखर बलदंड बाहुंची

जात,धर्म बहू वेशभूषा इथल्या
परि मराठी हा मानवधर्म असे
जरी सूर विविध जसे रंग इंद्रधनु
महाराष्ट्र गीत या ह्रुदयात वसे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.bligspot.in*

रांग

🚶🏻🚶🏻🚶🏻 *रांग*🚶🏻🚶🏻🚶🏻

कसं जगायचं हे तूच सांग आता
सगळीकडेच दिसतेय रांग आता

सरकार असायचे आधार आधी
सरकारलाच हवाय आधार आता
जनसंख्या काही कमी नाही इथं
आधार काढायला होती रांग आता

*जीवो* चा नारा फुकटामध्ये आला
पुरा देश सिमसाठी रांगेत उभा झाला
फायदा शोधला जातो फुकटातही हे
पटवणार जनतेला कोण सांग आता

कॕशलेसच्या नावाने नोटाबंधी झाली
पुन्हा गरीब जनता रांगेत उभी केली
कष्टाचा पांढरा पैसा गुंतलाय बँकेत
रांगेशिवाय कोणता पर्याय सांग आता

कटप्पाने बाहुबलीला सांग का मारले?
जीवन-मरणाचा प्रश्न देशाला पडला
तिकीटविक्रीचा अनोखा विक्रम घडला
उत्तर शोधायला पुन्हा आहे रांग आता

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

दुपार

🌞 *दुपार*🔥

होता मध्यान दुपार
लागे अंगाला चटके
कुठे किती शिवणार
आहे नशीब फाटके

फाटलेल्या कपड्यात
बाप उन्हात राबतो
काळ्या काळ्या ढेकळात
जणू नशीब शोधतो

काम करता शेतात
वाहे घामाच्या त्या धारा
नाही आराम माहित
होई श्वास त्याचा खारा

होऊ लागता दूपार
लपे पायात सावली
संगे घेवून न्याहारी
चाले शेतात माऊली

पान हालेना डुलेना
वारा गरम जाहला
नादी लागून उन्हाच्या
त्याची किरणे पियला

पंख दुमडून पक्षी
शांत झाडत बसली
चारा शोधण्याची घाई
नाही राहिली कसली

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

हसावे लागते

😀 *हसावे लागते*😷

हसू नाही वाटले तरी हसावे लागते
बसू नाही वाटले तरी बसावे लागते

जीवन म्हणजे आहे हारजीतचा खेळ
खेळू नाही वाटले तरी खेळावे लागते

कैक निर्णयावरून घ्यावी लागते माघार
वळू नाही वाटले तरी वळावे लागते

हे जीवनच झालयं क्षणोक्षणी रेस
पळू नाही वाटले तरी पळावे लागते

लपावे वाटते मतलबी दुनियेपासून
दिसू नाही वाटले तरी दिसावे लागते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

उन्हाळी सुट्या

*उन्हाळी सुट्ट्या*

लागल्या सुट्या चला
गाठू मामाचा गाव
आई आणी दादासंगे
पाय घेतात धाव

नवी नवी कपडे
मामा देतो घेवून
राजकुमारी भासे
कपडे मी लेवून

आमरस नि पोळ्या
गरम शेवायाचा भात
मायाळू आजीची मी
आहे लाडाची नात

कैर्या चिंचा पाडायची
गंमत असते भारी
सुरपारूंब्याचा खेळ
सुरू तिथेच झाडावरी

शाळा नाही अभ्यास
नाही क्लासेसचा ताण
उन्हाळी सुट्टी म्हणजे
असते आनंदाला उधान

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अवकाळी

🌧 *अवकाळी*🌧

अवकाळी पावसाची
सर अशी यावी
या तापलेल्या भूईची
तहान भागवावी

अवकाळी पावसाची
सर अशीही यावी
गरम झालेल्या देहासह
मनाची शांती व्हावी

अवकाळी पावसाची
सर अशी यावी
तापलेल्या वार्याची
शीतल झुळूक व्हावी

अवकाळी पावसाची
सर अशीही यावी
झाडेवेली पशुपक्षी
मग आनंदाने गावी

अवकाळी पावसात
तीही अवकाळी यावी
सुकलेल्या या ओठाची
तिने तृष्णा मिटवावी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नको हा उन्हाळा

*नको हा उन्हाळा*

असेल का हो उन्हाचं
काळीज जसं पाषाण
जळू पाहतोय हा देह
नुसती घाशाला तहान

उन्हाळ्याच्या दिवसांत
याचचं चालतयं नाणं
डिग्रीचा वाढलाय भाव
लय शिकलेलं दिसतं बेणं

अशा या उन्हाळ्यामध्ये
घामाच्या वाहत्यात धारा
नको वाटायला लागलाय
तिच्या मिठीचाही सहारा

जरा थंडगार वाटतं म्हणून
ए टि एम शोधावं लागतोय
पैसे काढायचा बहाण्याने
बॕलेन्स चेक करून बघतोय

कधी येईल तो पावसाळा
याची आस लागलीय मना
तिला पुन्हा मिठीत घेण्याचा
मी शोधणार आहे बहाणा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*