मी पुतळा बोलतोय
"काढून जुना आत्ताच, माझ्या गळा घातलाय हार
पुन्हा पुन्हा या उतळ सत्काराचा सोसवेना भार"
होय,मी पुतळा बोलतोय. निश्चलपेक्षा असंवेदनशील,समोर अत्याचार होत असताना रक्त गोठवून बर्फासारखा? छे! बर्फ गरम झाल्यावर पाणी सळसळत वाहते तरी. बर्फासारखा नव्हे तर दगडासारखा असंवेदनशीलतेने पाहत बसणारा. होय दगडच मी. जाती-जातीत दंगल पसरत असताना, धर्मा-धर्मात मलाच वाटून घेतले जात असताना, माझ्याच लेकींची खुलेआम इज्जत लुटली जात असताना,सुधारलेच्या नावाने भ्रष्टाचारात बरबटलेले,ओंगळवाणे अंगप्रदर्शन करत, किळसवाणे धांगडधींगा नृत्य करत व बिनलाज्यावाणी मदिरा प्राशन करून बेजबाबदारपणे हातवारे करत असताना,आयाबहिणींवर टाकलेले हात ज्यावेळी माझ्या जयंती- पुण्यतिथी निमित्ताने मला हार घालायला सरसावतात, वाटते यावे बाहेर या दगडामातीच्या देहातुन, अन् वाजवून द्यावी जळजळीत कानशीलात सुधारायचा प्रकाश पाडण्यासाठी किंवा दिवसाच तारे दाखवण्यासाठी नाहीतर वाटते माझ्याच ठिकर्या ठिकर्या करून छिन्न छिन्न करावे वाटते यांच्या डोक्यांची..माझ्या या दगडी देहापासून बनवावी वाटतात धारदार हत्यारे अन् छाटावी वाटतात शीरं धडापासून कायमसाठी.......होतो जरी शांतीचा पुजक मी.
लाज वाटते माझ्याच पुढच्या पिढीची, वाटते उगाच पडलो समाज सुधारणा, देश स्वातंत्र्य करण्याच्या भानगडीत, उगाच आटवत बसलो रक्त यांच्या भलाईसाठी..अन् पसरवत बसलो विचार मनामनाला जागृत करणारे...अरे या मानव जातीपेक्षा मला ते मर्कटं, कावळे चिमण्या चांगल्या वाटतात...निदान ते दररोज येऊन विष्टा तरी करतात या दगडावर अन् करतात चिवचिवाट निस्वार्थीपणे...पण तुम्ही माञ निमित्त शोधता मला पुजनाचे, हार घालण्याचे....माझ्या सोहळ्याचे. दररोज बसणारा गुन्हेगाराचा धुराळा झटकायला येतात माझ्याकडे पांढरे शुभ्र वसने नेसून परंतु आत दाटलेला काळकुट्ट भ्रष्टाचार कधी धुतलाच जात नाही....
आज जरी महान असलो मी, पुतळा होण्याइतका तरी उद्या काय सांगावे माझे विचार पटतीलच सर्व लोकांना म्हणून? नाही पटले तर कोण सांगावे तोडतीलही मला काही माथेफिरू..अन् पसरेल दंगा परत माझ्या विसर्जनावरून..विचार बाजूला सारून माझे, सारून कशाला? माझ्या विचारांना मुठमाती देऊन लढतील, मुडदे पाडतील...
खरच कंटाळा आलाय मला या पुतळेपणाचा..वाटलं घेतील प्रेरणा माझ्या कार्याची म्हणून होतो हरकलो,सुखावलो होतो मिळेल कोणीतरी आपल्या विचारांचा पाईक म्हणून ...पण व्यर्थ! माझी कथा?(व्यथा) ऐकून नका हलवू माझ्या जागेवरून मला.नाहीतर तुम्हालाही ठरवतील ते माथेफिरू..फोडतील तुमचेचा डोके ..फक्त एकच विनंती आहे परत नका उभा करू माझे ,कोणाचेही पुतळे..उभरता आला तर फक्त विचारांचा पुतळा उभा करात स्वतःच्या मनात चिरंतन🙏🏻
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *hindhsher99@gmail.com*