*चला उपक्रमांची बॅंक करुया*
आज सकाळ च्या सप्तरंग पुरवणी त हेरंब कुलकर्णी यांचा लेख                            चला उपक्रमांची बँक करू या   -----------------
शाळेमध्ये उपक्रम राबवा असं सगळेच सुचवतात, पण कुठले उपक्रम राबवावेत हा प्रश्‍न पडतो. सहज करता येणाऱ्या काही उपक्रमांची यादी करू या. मात्र यात सगळ्यांनी भर घालायची आणि सर्व शाळांसाठी उपक्रमांची एक बॅंक करायची. काही उपक्रम सांगून मी सुरवात करतो.
१)     ग्रंथालयात नवीन खरेदी केलेली पुस्तकं दर्शनी भागात लावावीत, म्हणजे मुलांना नवीन आलेली पुस्तकं कळतील.
२)     आता अनेक ठिकाणी सेमी इंग्लिश माध्यम सुरू झाल्यामुळं मुलांना इंग्लिश वाचनाची सवय व्हावी म्हणून गोष्टींची इंग्लिशमधलीही पुस्तकंही खरेदी करावीत.
३)     एखाद्या साहित्यिकाची जयंती किंवा पुण्यतिथी असेल किंवा त्याला पुरस्कार मिळेल तेव्हा त्यांची पुस्तकं दर्शनी भागात मांडावीत.
४)     विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर त्यांना काय वाटलं, हे लिहावं. यासाठी वाचनालयाच्या बाहेर फलक तयार करावा. त्यावर मुलांनी लिहिलेले पुस्तक परिचय लावावेत.
५)     वर्षभरात जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं बक्षिसे द्यावीत.
६)     विद्यार्थ्यांना जे लेखक आवडतील, त्यांना पत्र लिहायला प्रोत्साहन द्यावं.
७)     सूचना फलकाच्या जागी सहा फलक लावावेत. त्या फलकांच्या सजावटीची जबाबदारी दर आठवड्यात एका इयत्तेला द्यावी. त्या इयत्तेच्या सर्व तुकड्यांनी फलक वाटून घेऊन सजावट करावी. 
फलक ढोबळपणानं असे करता येतील
१)     मुलांचे लेख-प्रवासवर्णन, कथा, पुस्तक परिचय,
२)     मुलांनी केलेल्या कविता व मुलांनी वाचाव्यात म्हणून लावलेल्या चांगल्या कविता,
३)     विनोद आणि कोडी,
४)     मुलांनी काढलेली चित्रं. हस्तकलेचं काम,
५)     मुलांनी केलेले इंग्लिश लेखन-इंग्लिश मजकुराची कात्रणं, इंग्लिशमधले विनोद,
६)     एका फलकावर महत्त्वाची कात्रणे.
यातून चांगली लिहिणारी मुले लक्षात येतील. त्यांची लेखन कार्यशाळा घ्यावी.
८)     शाळेच्या फलकावर सुविचार लावण्यापेक्षा मराठीतल्या गाजलेल्या कवितांच्या चार ओळी लिहाव्यात. आश्‍चर्यकारक गमतीदार माहिती आजकाल वह्यांच्या मागच्या कव्हरवर किंवा इंटरनेटवर http://www.did-you-knows.com/ या साइटवर असते. ती फलकावर लिहावी. अवांतर माहितीचा मारा कमी करावा. त्यापेक्षा आनंद देणारा मजकूर लिहावा.
९)     शाळेत ‘विचारा मला प्रश्‍न’ अशी एक छोटी पेटी तयार करावी. त्यात मुलांना जे प्रश्‍न पडतात, ते प्रश्‍न त्यांनी विचारावेत. त्यात विज्ञानासोबत इतर विषयांबद्दलची उत्सुकता व्यक्त करणारे प्रश्‍न येऊ शकतात. प्रार्थना झाल्यावर यातल्या रोज एका प्रश्‍नाचं उत्तर द्यायचं असं करता येईल. मुलं कसा विचार करतात आणि त्यांना किती प्रश्‍न पडू शकतात, याचं एक उदाहरणं सांगतो. एका मुलानं प्रश्‍न विचारला होता...चंद्रामुळं जर समुद्राचं पाणी हलतं तर मग आपल्या घरातल्या बादलीतलं पाणी चंद्रामुळं का हलत नाही? मुलं असा विचार करतात. मुलांच्या जिज्ञासावाढीला अशा उपक्रमांतून गती मिळू शकेल.
१०)    अनेक शाळा डिजिटल झाल्यात, पण मुलांसाठीचे मनोरंजनपर चित्रपट दाखविले जात नाहीत. इंटरनेटवरून असे काही चित्रपट डाउनलोड करून दाखवावेत. ग्रामीण भागातली मुलं दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांवरच्या बटबटीत टीव्ही मालिका बघतात, पण अभिरुची रुंदावण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळं चांगले कलात्मक चित्रपट व उत्कृष्ट मनोरंजन करणाऱ्या मालिका दाखवाव्यात. ‘मालगुडी डेज’सारखी मालिका किंवा ‘चिल्ड्रेन फ्रॉम हेवन’ असे चित्रपट मुलांना दाखवायला हवेत.
११)    गाणी, संगीत यावर अनेक शाळांत चांगले काम होतं आहे, पण मुलांना संगीताच्या परीक्षेसाठी बसवण्याचा प्रयत्न होत नाही. या परीक्षांनी ज्या मुलांमध्ये गायनाचं चांगलं बीज आहे, त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळतं. गावातल्या भजनी मंडळाचीही याबद्दलच्या उपक्रमास चांगली मदत मिळू शकते. भजनी मंडळाच्या मदतीनं मुलांना पेटी, तबला, ढोलकी शिकविणं शक्‍य आहे.
१२)    बुद्धिबळ हा खेळ दुर्लक्षित होत आहे. मधल्या सुटीत जर बुद्धिबळाचे काही संच उपलब्ध करून दिले तर अनेक मुलांना या खेळाची गोडी लागू शकते. यातून बुद्धिबळ खेळणारे चांगले खेळाडू तयार होऊ शकतील.
१३)    आज शाळेत व घरात गोष्टी सांगितल्या जात नाहीत. गोष्टींमध्ये मुलांना संवेदनशील बनविण्याची, प्रगल्भ बनविण्याची ताकद आहे. मुलांची कल्पनाशक्ती त्यातून बहरते. शाळेत जास्तीत जास्त गोष्टी सांगितल्या जायला हव्यात. हे करण्यासाठी किमान शिक्षकांनी २०० गोष्टी जमवाव्यात. या गोष्टी फक्त उपदेशपर नसाव्यात. यात विनोदी, भयकथा, साहसकथा अशा सर्व प्रकारच्या कथा असाव्यात. शाळा २२० दिवस चालते. किमान १७५ दिवस तरी शाळा सुटताना रोज इयत्ता सातवीपर्यंत गोष्ट सांगणं शक्‍य आहे. या उपक्रमांतून मुलं नक्कीच बदललेली दिसतील.
१४)    गोष्टीसारखीच गाण्यांची स्थिती आहे. आज मुलांना गाणीच फारशी माहीत नाहीत. प्रत्येक शाळेत काही निवडक मुलंच गाणी म्हणत असतात. सर्व मुलांना खूप गाणी पाठ नसतात. यासाठी किमान ५० गाणी जर जमवली आणि एका आठवड्यात एक गाणं जरी मुलांकडून म्हणून घेतलं तरीसुद्धा मुलांना खूप गाणी येतील. पण त्यात एक काळजी घ्यावी. शाळेत गाणी म्हटली, की केवळ देशभक्तिपर गाणी असं समीकरण झालं आहे. अगदी विनोदी गाणी, शब्दचमत्कृती साधणारी गाणी अशी अनेक प्रकारची गाणी आहेत. पारंपरिक चांगली भजनं, पोवाडे, भारूड असं खूप काही आहे. हेही मुलांकडून म्हणून घ्यावं. मुलांना गाणी म्हणायला खूप मजा वाटते. आपण ते देत नाही म्हणून ही मुलं मग कुठलीही नको ती गाणी गुणगुणतात.
१५)    माध्यमिक शाळेत ‘ऑफ तास’ हा जितका कल्पकतेनं वापरला जाईल, त्यावर त्या शाळेतल्या मुलांचं व्यक्तिमत्त्व विकसित होतं. आज शाळेतल्या तासिका केवळ ३० मिनिटांच्या झाल्या आहेत. या कमी वेळेच्या तासिकांमुळं अभ्यासक्रमात वेगळं काही घेणं कठीण झालंय. अशावेळी या ‘ऑफ तासांना’ गाणी, गोष्टी, विविध माहिती सांगणं असा एक विषय देऊन त्यावर मुलांना बोलायला लावणं असं करता येईल. अनेक शाळांत गोष्टींच्या पुस्तकाची पेटी केलेली असते व ‘ऑफ तासा’ला ती आणून मुलांना पुस्तकं दिली जातात. हा सोपा उपक्रम कुठलीही शाळा करू शकेल. याचबरोबर या वेळात गाण्यांच्या, गावांच्या किंवा इंग्लिश शब्दांच्या भेंड्या लावणं असं खूप काही
करता येईल.
१६)    ‘ऑफ तासा’ला एक विषय देऊन प्रत्येक मुलानं त्यावर एक मिनीट बोलायचं हा अतिशय छान खेळ आहे. यात शिक्षकांना काहीच बोलायचं नाही. फक्त एक विषय द्यायचा आणि मुलांनी बोलायचं, फक्त अट ही की तेच तेच मुद्दे पुन्हा मांडायचे नाहीत. विषय घेताना अगदी रोजच्या जीवनातले विषय घ्यावेत. लहान गटात अगदी ‘मी पक्षी असतो तर’ असे कल्पनारम्य विषय द्यावेत. मोठ्या गटात ज्या विषयाला दोन बाजू आहेत, असे विषय असावेत. उदा. टीव्हीवर बंदी घालावी का? अशा विषयातून मुलांच्या विचारांना चालना मिळेल.
१७)    जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम अतिशय रटाळ होतात. त्यात काही कल्पकता आणता येईल का? गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात भारतात होऊन गेलेल्या प्रसिद्ध गुरू-शिष्य जोड्या एका एकाला वाटून देऊन त्यानं तेवढीच गोष्ट सांगावी. महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीला त्यांच्यावरची काही गाणी, काही पुस्तकांतील भाग वाचणं, काही महापुरुषांच्या जीवनातला प्रसंग घेऊन त्याचं नाट्यीकरण, त्यांची वेशभूषा करून त्यांच्या गाजलेल्या भाषणांचं सादरीकरण असंही काही करता येईल. मुख्य म्हणजे आजचे प्रश्‍न काय आहेत, त्याच्याशी त्या महापुरुषांचे विचार जोडून मुलांना यातून मार्गदर्शन करायला हवं.
१८)    शिक्षकांचं वाचन वाढावं म्हणून दर महिनाअखेरीला प्रत्येकानं त्या महिनाभरात काय वाचलं यावर बोलावं व पुस्तक खरेदी करण्यासाठी शिक्षकांची पुस्तकभिशी सुरू करावी. यात ३०० ते ५०० अशी विशिष्ट रक्कम गोळा करून दोन क्रमांक काढावेत व त्या रकमेची पुस्तकं शिक्षकांनी खरेदी करून सर्वांनी ती वाचावीत व त्यावर चर्चा करावी.
१९)    जे प्रकल्प दिले जातात, त्यात सामाजिक भान विकसन हा उद्देश ठेवावा. आजूबाजूला राहणाऱ्या कष्टकरी वर्गांचा अभ्यास असा एक प्रकल्प घ्यावा. यात मुलांना प्रश्‍नावली बनवायला मदत करावी. मुलांनी एका-एका कुटुंबाला भेट देऊन माहिती जमवावी. यातून कष्टकरी वर्ग कसा जगतो हे मुलांना कळेल. त्याची एकत्रित पुस्तिका करावी.
२०)    क्षेत्रभेटीत ऊसतोड, वीटभट्टी, झोपडपट्टी अशा कष्टकरी वर्गाच्या वस्तीला भेट देणं याची आखणी दरवर्षी करावी. यातल्या काहींच्या मुलाखतीही शाळेत घ्याव्यात. हे वंचितांचं जग मुलांना लहानपणापासून परिचित झालं नाही तर ती खूपच आत्मकेंद्री बनतात. तेव्हा अशा भेटी व त्यातून त्या समाजघटकाचं जीवन लक्षात आणून देणं हे खूप महत्त्वाचं आहे.
मला जे वाटले ते उपक्रम मी इथं दिले आहेत, ही यादी १०० पर्यंत आपल्याला न्यायची आहे. आता पुढचे उपक्रम तुम्ही वाढवा. तुम्हाला सुचलेले उपक्रम मला 9921288521 या व्हाट्सअँप वर किंवा herambkulkarni1971@gmail.com या ई-मेलवर आवर्जून कळवा. आपण सगळे मिळून नावीन्यपूर्ण उपक्रमांची बँक करू या ,,----हेरंब कुलकर्णी

No comments: