सुगरण मी

*सुगरण मी*

काडी काडी जमवीली
केला आशीयाना उभा
वारा येता  जोशामधी
जाई भिडायला  नभा

टापटिप  दिसे  खोपा
सुगरण  मी  नावाची
त्यात खेळतील माझी
पिल्ले इवल्या जीवाची

नको लागायला त्यांना
ऊन  पाऊस  नि वारा
माझ्या आशा खोप्यामध्ये
नाही धोक्यालाही थारा

बसूनीया खोप्यावर
घेते झोका जरावेळ
पुन्हा ऊन सावलीशी
आहे खेळायचा खेळ

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शब्द

🌹 *शब्द*🌹

शब्द तोलून बोलावा
शब्द विंचवाचा डंक
शब्द करतो राजाही
शब्द  बनवितो रंक

शब्द  आईचा  पदर
शब्द आधार पित्याचा
शब्द झुळझुळ पाणी
शब्द घोंघाट रित्याचा

शब्द  मधूर  भाषण
शब्द फुलांची ओंजळ
शब्द वाचाळता व्यर्थ
शब्द अश्रुंचा ओघळ

शब्द जोडतात मन
शब्द तोडतात मन
शब्द हसवती आणि
शब्द  रडवती  मन

शब्द भावनांचा अर्थ
शब्द काळजाला स्पर्श
शब्द फुलांचा सुगंध
शब्द  फुलवतो  हर्ष

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बिनलाजा

👊🏻👊🏻 *बिनलाजा*👊🏻👊🏻

बिनलाजे आम्ही | आहोतच खरे |
एवढीच पुरे | ओळखही ||

दिनरात आम्ही | चॕटींग करतो |
दिस ना सरतो | त्याच्याविना ||

विषय आम्हाला | नाहीच लागत |
बसतो जागत | उगीचच ||

मान नित्य खाली | मोबाईल मध्ये |
नाही काही धंदे | याच्या परी ||

आई बाप बोले | वाया गेली पोरं |
जीवाला तो घोर | यांच्यापायी ||

जीवंतपणीच | झालो आम्ही मडे |
विवेकाला तडे | जावू पाहे ||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

संध्याराणी

🐾संध्याराणी🐾

सुर्य जातो नभापार
सांज उजळून येते
हळूहळू  उजेडाला
संध्या कवेमध्ये घेते

पक्षी  लपे  घरट्यात
चारा पिल्लांना घालती
दुध देण्या वासरांना
गाय  गोट्यात  धावती

दिवे  टिमटिम  करी
गाव  चिडीचूप  होई
पीठ दळताना सख्या
ओव्या जात्यावर गाई

चांदोबाचा नभामधी
मुक्त संचार चालतो
नक्षत्रात चांदण्यांचा
भव्य संसार फुलतो

वारा शीतल वाहतो
अंग अंग रोमांचित
सख्याविन सजनीचे
नाही कशातही चित्त

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

फुफाटा

😌 *फुफाटा*🍂

डोळ्यातील आसवांना
त्यानं कितीदा पुसावं
दुःख दाबूनी उरात
किती खोटेचं हसावं

थेंब पाण्याचा एकही
नाही भूईला स्पर्शला
ढग वाकुल्या दावूनी
जणू खट्याळ हसला

घालमेल या जीवाची
उभं जळताना पीक
देवा पुढे सांगा किती
त्याने मागायची भीक

फक्त फुफाटा मातीचा
पोटी पडलीय आग
बरसाया वर्षाधारा
तुला येऊ दे रे जाग

किती पाहशील अंत
किती करशी लाचार
सुन्न पडलयं  डोस्कं
गेला  खुंटून विचार

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अभंग आषाढी

*आषाढी स्पेशल अभंग*

चंद्रभागे तीरी | वैष्णव जमले |
किर्तनी रमले | विठ्ठलाच्या ||

विठ्ठल विठ्ठल | झाला जयघोष |
पहावा जल्लोष | पंढरीत ||

देखून हरीला | तृप्त हे नयन |
आनंदले मन | वर्णू किती ||

नामाचा गोडवा | वर्षभर पुरे |
दुःख चिंता हरे | जीवनाची ||

विठ्ठल भजावे | पंढरीत यावे |
सोहळे पाहावे | आषाढीचे ||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

तिच्या मनातील पाऊस

🌹 *तिच्या मनातील पाऊस*🌧

थोडासा खेळकर
थोडासा अल्लड
नाजुक नि मुलायम
तिच्या मनातील पाऊस

थोडासा सुरमय
थोडासा रूसणारा
हळू गाली हसणारा
तिच्या मनातील पाऊस

थोडासा चंचल
थोडासा वेंदळा
काळजाला भिजवणारा
तिच्या मनातील पाऊस

थोडासा रिप रिप
कधी कधी टिप टिप
लपाछपीही खेळणारा
तिच्या मनातील पाऊस

थोडासा कडाडणारा
थोडासा धडाडणारा
डोळ्यात पूरही दाटवणारा
तिच्या मनातील पाउस

अंगाला स्पर्श करणारा
ओठांची तृषा शमवणारा
रोम-रोमांचित करणारा
तिच्या मनातील पाऊस

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

तू अशी ग कशी

🌹 *तू अशी ग कशी?*🌹

मी चोरून तुला पहावं
नि तू गालात हसावं
समजूनही सगळे काही
मी जाळ्यात फसत जावं

गालावरती खेळणाऱ्या
बटांना तू हळूच सावरावं
त्यांंच्याकडे पाहत मी
उगाचच  मनात  झुरावं

सुंगंधीत गजऱ्याला तू
केसात तुझ्या माळावं
नजरेने तू असतेस खेळत
भावनेशीही का खेळावं

गल्लीबोळी रानीवनी
मी तुला शोधत फिरावं
चतुर तू हरीणीवाणी
क्षणात  हरवून  जावं

-हुदयात तुझ्या हो तरी तू
कधीच बोलून न दाखवावं
तुझ्या एका हो साठी मी
मात्र दिवस दिवस झुरावं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*