पाऊस

*पाऊस*🌧

झाडावर पाऊस
खोडावर पाऊस
पानातही पाऊस
उन्हातही पाऊस

इकडे पाऊस
तिकडे पाऊस
भिजलयं सारं
चिऊच हाऊस

रस्त्यावर पाऊस
वस्त्यांवर पाऊस
तळ्यात पाऊस
मळ्यात पाऊस

तुमचा पाऊस
आमचा पाऊस
सगळ्यांचा सारखा
असतोय पाऊस

हसवतो पाऊस
भिजवतो पाऊस
आईच्या कुशीत
निजवतो पाऊस

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मी शेतकरी

*मी शेतकरी*

मेघ   बरसून   गेले
मना  भिजवून गेले
पाणी पिवूनिया शेत
आता पेरणीला आले

हाती  घेवूनी  तिपन
सोनं झाकीतो मातीत
भाग्यावर  जगायचं
बळ  येतया  छातीत

लई लाडाची ही मैना
आली भाकरी घेऊन
पुन्हा लागतो कामाला
थोडा विसावा खाऊन

खातो मिरची भाकर
तोंडी लाववितो कांदा
कृपा वरुण राजाची
हाय जोमात आवंदा

मुठी मुठी भरूनिया
धान्य ओळीत पेरीन
कर्ता  करविता  देव
त्याच्या हवाली करीन

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

सावित्रीचा वट?

चालीरीतीचे बंधन पाळत
वडाला ती आजही पुजते
कसाही असला जरी तो
अजूनही त्यालाच मागते

सावित्रीचा वट चालतो कुठं
फक्त वटाला ती बांधून ठेवते
स्वतः त्याच्या स्वाधीन होऊन
त्याच्या हातचे बाहुले बनते

सत्यवान आता उरलाय कुठे
हैवान होऊन जगतो आहे
उठता लाथ बसता बुक्की
तिला तो पाण्यात बघतो आहे

मनात  इच्छा  नसली  तरी
वडाला ती बांधून येते धागा
कितीही कष्ट त्याने दिले तरी
ह्रुदयात त्याचीच ठेवते जागा

तिनेच कुठवर जळत रहायचं
त्यालाही थोडं पोळायला हवं
तिचेही शरीर मानसाचे आहे
त्यालाही आता कळायला हवं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शहरवासियांनो

🙏🏻 *शहरवासीयांनो*🙏🏻

जळतयं गाव संपात तरी
शहराला काही घेणं नाही
फेकतयं चार पैसे जास्त
त्यांना अजूनही उणं नाही

शेजारी कोणी मेलं तरी
ह्यांना माहित होत नाही
अन्याय होत असतानाही
रक्तच सळसळत नाही

संप अजूनही संपलेला नाही
किती दिवस महागाचं खाल?
पाव चिकन मासांहार अन्
उसळीवरती पोट भराल?

हक्काचं मागतोय बळीराजा
द्यायला हवी तुम्हीही साथ
AC तो गारवा सोडून जरा
त्याच्यासाठी याल का संपात?

दोन दिवस त्याच्यासाठी
तुमचीही हवीय साथ
झोपलेले कुंभकर्णवृत्तीला
मारायचीय जोरदार लाथ

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आठवणीतला पाऊस

*आठवणीतला पाऊस*

रूद्र रूप धारण करून
वरूणराजा होता आला
झोपडीवजा बंगला माझा
त्याने दूर वाहूनीया नेला

लेकराबाळाचा हा संसार
त्याने उघड्यावर पाडला
एकही कोना ह्रुदयाचा
भिजवायचा नाही सोडला

वारा होता सोसाट्याचा
कहर माजवून तो गेला
गंजीमधला कडबा त्याने
दूरवर भिरकावून दिला

वीजमाईही धावतच मग
घराकडं माझ्या आली
मोकळी जाईलच कशी
दोन बकय्रा घेऊन गेली

भिजवली सारीच स्वप्ने
उंच भरारी घेयच्या आत
आठवणीतला पाऊस
घेवून  आला  काळरात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*