आज का उदास

*

वेणीतील गजरा तुझा
आज सुकून का गेला
चंद्रावाणी मुकडा हा
असा का कोमेजलेला

केस विस्कटलेले तुझे
नाही बुचुडा बांधलेला
आज उदास का चेहरा
काल गाली लाजलेला

कोकिळेवाणी तो कंठ
आज का एकदम शांत
मंञमुग्ध करणारा स्वर
आज आसुत भिजलेला

तुझ्या त्या नयन बाणाने
ह्रुदयात  पेटतात  दिवे
समईत  तेवणारा  दिवा
आज असा का विजलेला

का झाकला चंद्र हाताने
बघ झाला अंधार चहूकडे
कर प्रकाशीत या ह्रुदया
नको ठेवू तो निजलेला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मन

*मन*

मन उडालं उडालं
गेलं आकाशा भिडाया
कुठं लागत्याती पंख
त्याला हवेत उडाया

मन मोगर्याचं फूल
जाई  दूरवर गंध
कधी गुलाब वासाने
जाई होऊन बेधुंद

मन पाटातलं पाणी
करी आवाज खळाळ
नाही आवरत जणू
पायी बांधलय चाळ

मन झंजावात वारा
कधी इथे कधी तिथे
कधी होऊन वादळ
दूर पाचोळ्याला नेते

मन सागराची खोली
कधी लागला ना आंत
आत वादळ कित्येक
तरी  दिसतयं  शांत

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

लगीनघाई

*लगीनघाई*

आली लगीन सराई
घरा-घरात गोंधळ
लेक जाताना सासरी
मन होतयं वेंधळं

त्याच्या लाडक्या लेकीला
बाप घेतो रूखवत
रूप पाहून साजरं
त्याचं मन सुखावतं

लेक जाणार सासरी
गोळा येई उदराला
माय एकांती असता
डोळा पुसे पदराला

दुःख असताना मनी
भाऊ पञिका वाटतो
ताई होताना परकी
गळी हुंदका दाटतो

लग्न मंडपी उत्सव
मनी वादळ दाटलं
ज्याने जपलं मायेनं
तेच परके वाटलं

गळा आलाय भरून
आता सासरी जायचं
जिथं घेतलाय जन्म
तिथं पाव्हणी व्हायचं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शाळा भरणार

*शाळा भरणार*

पुन्हा वाजणार घंटी
शाळा भरली जाईल
पुन्हा इवल्या जीवांना
गट्टी शाळेशी होईल

पुन्हा नवे सवंगडी
डाव वेगळा असेल
हाती प्रत्येकाच्या पुन्हा
पाटी-पुस्तक दिसेल

पुन्हा विटी नि दांडूंना
दिस वाईट येणार
खेळ लगोरीचे पुन्हा
रोज नाही दिसणार

पुन्हा नाही दिसणार
सूर-पारंब्यांचे खेळ
झेपायला विहिरीत
नाही मिळणार वेळ

पुन्हा सुट्टीतली मजा
नाही करता येणार
किल्ला बांधणारे हात
पुन्हा *आई* लिहिणार

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*