नाही भेगाळलं मन

*नाही भेगाळलं मन*

घेतो विसावा जरासा
पंढरीच्या  वाटेवर
पुन्हा होणार मी स्वार
पालखीच्या लाटेवर

धरा अंथरली खाली
आहे पांघराया नभ
देते आधार जीवाला
विठू नामाची ती उब

भेगाळलं पाय जरी
नाही भेगाळलं मन
उर्मी अंगात अजूनी
जरी थकले हे तन

काम  करताना  विठू
झोप  घेतानाही  विठू
विठू  किर्तनात   भेटे
भेटे    चराचरी   विठू

ओढ  विठ्ठल  भेटीची
मना लागलीय माझ्या
डोळा पाहिन आवडी
आता  पंढरीचा माझा
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

हिरवे गोंदणं

🌧 *हिरवे गोंदण* 🌱

थेंब पिऊन नभाचे
धरा आनंदे हसली
होवूनिया  नववधु
शालू हिरवा नेसली

पोट तिचे फाडूनिया
बीज आत कोंबियले
दोन दिस  राहूनिया
मग  हळू  अंकुरले

चिंब चिंब होवूनिया
हसे  नववधु  धरा
शुभ्र नितळ पाण्याचा
तिच्या उदरात झरा

पाणी पाणी चहुकडे
जणू  टिपूर  चांदणं
अंगावर तिच्या दिसे
छान  हिरवे  गोंदणं

किती  करावं  कौतुक
तिच्या आशा लावण्याचं
मला लाभलय भाग्य
तिचं लेकरू होण्याचं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

तू जवळ नसल्यावर

*तू जवळ नसल्यावर...*🌹

शब्दच होतात मुके
लेखणीही बोलत नाही
तू जवळ नसल्यावर
मज सुचतच नाही काही

घर-दार जणू वाटते
खायलाच टपून बसले
कसं समजावू त्याला
हसूही माझ्यावर रूसले

किचनही असते जणू
मूग गिळून पडलेले
तुझ्याच ग आठवणीत
एकांतामध्ये रडलेले

तू जवळ नसल्यावर
जगणेही हरवून बसतो
शून्यातही ग तुझाच
चेहरा शोधत बसतो

नकोस आणखी छळू
परतूनी लवकर ये
घरादारासह तू माझ्या
ह्रुदयाचा ताबा घे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

बालकविता

*बालकविता*

काळेकुट्ट ढग
आलेत भरून
मोरही नाचला
ताल  धरून

पावसाचे थेंब
टपकन पडले
मातीच्या पोटात
जावून  दडले

मातीला कोंब
अलगद आले
पावसाच्या रेघात
चिंबचिंब न्हाले

रानफूले फुलली
फुलली टणटणी
पाखरांच्या ओठी
गोडगोड गाणी

हिरव्या शालूने
सजली धरती
आनंदाला माझ्या
आलीय भरती

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

व्यर्थ न हो बलिदान

रात्रं -  दिवस   जवान
आहे   सीमेवर   उभा
त्यांच्या  संरक्षणामुळे
आम्हा स्वातंत्र्याची मुभा

आई   बाप  ताई बंधू
पत्नी  मुलगा मुलगी
सोडूनिया  सगळ्यांना
केली  सीमेशी सलगी

किती असेल ते प्रेम
भारताच्या मातीवर
गोळ्या शत्रुंच्या तैयार
झेलायला छातीवर

जवानांचे बलीदान
व्यर्थ नकोच जायला
वर्षे अनेक लागती
वीरव्यक्ती जन्मायला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

कमलदल

🌷 *कमलदल*🌷

जीणं असं उकीरड्याचं
आम्हा का नियतीने दिलं
माय  बापांना  मारूनी
का आम्हा  पोरकं केलं

नाही मायेचं कोणीही इथं
कोणाचा नाही पाठीवर हात
कोण  कुरवाळेल  केस
आणि चारेल मऊ दूधभात

पायी अडकलेत आमच्या
अतुट दारिद्र्याचे फास
कोण्या सटवीने लिहिला
आमच्या नशीबी वनवास

पोटामध्ये या कळ तरी
मुखावरती आमच्या हसू
कचऱ्यातुनच एक दिवस
चमकाणारे आम्ही असू

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*

वात्सल्य

*वात्सल्य*

जन्म देताच वासराला
गाय जिभेने चाटते
तिच्या अशा वात्सल्याचे
मला कौतुक वाटते

नाही कोणतं परिमाण
मोजण्या आईची माया
खूप मेहनतीने देवाने
बनविलीय तिची काया

देव असतो सर्वत्र तरीही
आपल्याला ना दिसतो
आईच्या शरीरातही त्याचा
अंश सामावलेला असतो

माय माझी माय तुझी ती
सार्यांचीच सारखी असते
माय पशुची असली तरी
मातृत्व तिथे वसलेले असते

तिच्यासारखी  ती माया
फक्त तीच  करत असते
म्हणूनच प्रत्येकाची आई
प्रत्येकासाठी बेस्ट असते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मला शाळेला जायचं

*मला शाळेला जायचं*

आई कर जरा  घाई
मला शाळेला जायचं
गेल्या संपुनिया सुट्या
नाही  घरला राहाचं

शोभुनिया दिसतयं
बघ दप्तर चिमिचं
नविनचं वाटतया
बघ पुस्तक नमीचं

माझ्या वर्गातील पोरं
जमा झाली असतील
खेळ  गप्पा  रंगवता
हळू  गाली  हसतील

रोज  जाईन  शाळेत
रोज अभ्यास करीन
सारूनिया काजळीला
वाट  ज्ञानाची धरीन

नको ठेवू  मला घरी
आता शाळेत जाऊ दे
आणि शिक्षण घेवूनी
मला साहेब  होऊ दे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

विठू तुझ्या नामाचा

*विठू तुझ्या नामाचा*

आस लागली मनाला
भेट  विठुची  होईल
संत जणांच्या संगती
पायी चालत जाईल

पंढरीच्या वाटेकडे
पाय ओढ घेती माझे
टाळ टिपरीच्या संगे
मुग्ध मृदंगही वाजे

पालखीत भेटतील
ज्ञाना तुका नामा जना
नाम स्मरता विठुचे
होई समाधान मना

मन  होईल  हे तृप्त
डोळा पंढरी देखता
विठू तुझ्या रे नामाचा
मग गोडवा ऐकता

तुझ्या पायी व्हावे लीन
हीच आस  या मनाची
तुझे  आशिष  मिळता
चिंता  मिटेल  उन्हाची

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*