बुक उघडा मनाचे

बुक उघडा मनाचे

आपणच आपुले रे
आज उघडूया बुक
आपणच करूया रे
आज आपुले कौतुक

वाचुयात प्रत्येकच
आज मनाचे रे पान
जरा लावुया हिशोब
किती मिळवले ज्ञान

मनी चांगले जे गुण
त्याचा वापर करूया
तमो गुण जे अंगात
त्याला बाजूला सारूया

काय हवं,काय नको
जरा  वाचून  पाहूया
हव्या नको त्या गोष्टींच्या
नोंदी  लिहून  ठेवूया

अनुभव शिकवतो
असे म्हणतात सारे
पाने पालटून मागे
धडा त्यातून शिका रे

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

पोतराज

पोतराज

दार  उघड  बये  तू
दारी पोतराज आला
थोडं धान्य दोन अंडी
वाढ सुपामधी त्याला

पोतराज तो आईचा
भटकतो दारोदारी
मळवट कुंकवाचा
लावियेला भाळेवरी

केला चिंद्याचा हासूड
वार अंगावर करी
चिंद्याचाच पोलका तो
बांधी आपल्या कमरी

दात लावून गाळ्याला
असा कोंबडा फाडीतो
समाजाच्या चालीरीती
पुढं  जोमाने  ओढीतो

केस  लांबत  राहीले
गेले  दारिद्रय  वाढत
येतं अंगामधी त्याच्या 
भूत लोकांचं काढतं

हाती हलगी वाजते
चाळ घुंगराचा पायी
ठेव सुखात सकला
तुज  विनवतो आई

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

आजीबाई

आजीबाई

काटी  टेकवत आजी
होती माझ्याकडे आली
सुरकुतलेला  हात
माझ्या फिरवला गाली

थराथरा कापे तिचे
बोलताना सारे अंग
नव्हतेच काळे केस
दिसे ढवळा हो रंग

एवढ्याशा  बटव्यात
असे खजिनाच भारी
   लगेचच  उपचार
असो कोणीही आजारी

दात नव्हता एकही
तरी गोडगोड बोले
रोज गोष्ट सांगे नवी
जणू ओंजळीत फुले

अनुभव मात्र आहे
भरपूर तिच्याकडे
अशी आजीबाई छान
आहे बरं माझ्याकडे

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

बाप माझा

आयुष्यभरही न थकलेला
मी बाप थकलेला पाहिला
अंथरूणावर शून्यात ती
नजर रोखलेला पाहिला

कधीकाळी फळाफुलांनी
झाड होते हे लगडलेले
संकटाशी करत दोन हात
ऊन वाऱ्याशी झगडलेले

झुकला नाही कुणापुढेही
ना लाचार झाला कुणापुढे
कष्टाला ना केली तडजोड
नाही दानवृत्तीला आडेवेडे

भेदरली ना नजर कधी
ना तुकविली मान कुठे
हनुमान भक्त बाप माझा
दर्शनाला पहाटेच उठे

चार बुकही नाही शिकला
कुठच काही आडलं नव्हतं
अनुभवाच्या  गाठोड्यात
जगायचं ज्ञान बांधलं होतं

सुकलं पान गळणारचं
तरी सावली त्यानं दिली
नातवंडात रमला बाप
अन् वेल मांडवाला गेली

लक्ष्मण दशरथ सावंत

उखाणा

नाव घेतो तिचं
जी माझ्यासाठी खास
माझ्या -हुदयात
तिचाच नित्य वास
सात खणाचा वाडा
दारी बैलजोडी,घोडा
सात खणाला सात दारं
सात दाराला सात कुलूपं
सात कुलूपाला सात किल्ल्या
किल्ल्या तिच्या कमरेला
चाले कशी दण दण
पैंजण वाजे छम छम
पहिले दार उघडते
साडी परीधान करते
दुसरे दार उघडते
नटा फटा करते
तिसरे दार  उघडते
देव पुजा करते
चौथे दार उघडते
स्वयंपाक बनवते
पाचवे दार उघडते
निरोप ती धाडते
सहावे दार उघडते
जेवण ती वाढते
सातव्या दाराआत
तोंडी रंगे पान
माझ्यात अडकलेले
असे तिचे प्राण
सप्तपदी ओलांडून
माझ्या वाड्यात आली
माझ्या जीवाची
*सोनाली* राणी झाली

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*

गर्दीत माणसांच्या

गर्दीत माणसांच्या

गर्दीत माणसांच्या मी हरवून गेलो
ना जगायचे एकटे मी ठरवून गेलो

शिक्षक नावापुरता उरलोय आता
टपाली कागदांचा मी कारकून झालो

प्रेम नव्हतेच ते फक्त स्वार्थ होता
गोड बोलण्याला मी हरखून गेलो

बांधून बाशिंगे मी बोहल्यावर उभा
उभा दुसराच केला मी सरकून गेलो

माझ्यातील ती अजून तशीच आहे
तिच्यातील मात्र मी भुर्रकन गेलो

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
© ldsawant.blogspot.in

गणेशोत्सव

गणेशोत्सव

घरोघरी गल्लोगल्ली
बाप्पा विराजले
स्वागताला श्रींच्या
मेघराज गरजले

दहा दिवस आता
गणेशोत्सव चालणार
आरतीच्या तालावर
भक्तजन डोलणार

मोदकाचा प्रसाद
बाप्पासाठी असेल
चाखताना उंदीरही
गालामधी हसेल

सद्बुद्धी दे देवा
ज्ञान आम्हा दे
चिमूकल्यांच्या चुका
तू पदरामध्ये घे

गणपती बाप्पाचा
करू जयजयकार
आशिर्वादाने त्याच्या
होती स्वप्न साकार

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

एकटी चिमणी

एकटी चिमणी

वरातीच्या मागे घोडे
खेळ पावसाचा चाले
आत जळणारी आग
जरी शरीर भिजले

पाणी घरात शिरलं
पाणी दारात साचलं
पावसानं माझं बाई
असं सराण रचलं

नाही बरसला तेव्हा
जेव्हा केलती पेरणी
हात जोडूनीया होती
केली ती मनधरणी

पाही वांझोट्या ढगाला
धनी  होई  चिंतातूर
फासी घेवूनीया मेला
काळ झालता फितूर

नाही पिकवता आलं
आता खरिपात पाणी
गेला चिमणा उडून
आता एकटी चिमणी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

अंकगीत

एक दोन तीन मोजू चला
अंकाचे गाणे गाऊ चला||धृ||

काटी अन् वाटी काढू चला
झालेल्या अंकाला एक बोला||१||

बैलांची शिंगे मोजू चला
झालेल्या अंकाला दोन बोला||२||

पळसाची पाने मोजू चला
आलेल्या अंकाला तीन बोला||३||

उडते पक्षी काढू चला
काढलेल्या अंकाला चार बोला||४||

हाताची बोटे मोजू चला
अलेल्या अंकाला पाच बोला||५||

उलटे तीन काढू चला
झालेल्या अंकाला सहा बोला||६||

पाण्यातील जहाज काढू चला
आलेल्या अंकाला सात बोला||७||

नाकाचे चित्र काढू चला
झालेल्या अंकाला आठ बोला||८||

उलटा एक काढू चला
झालेल्या अंकाला नऊ बोला||९||

एकावर शून्य देऊ चला
झालेल्या अंकाला दहा बोला||१०||

लक्ष्मण दशरथ सावंत

मनिमाऊ

मनीमाऊ

दबा धरून असं
बसलयं सांगा कोण?
डोळे करून बंद
दुध पितयं सांगा कोण?

वाघाची ती  मावशी
मांजर तिचे नाव
उंदीर पकडायला
झटकन घेते धाव

लांब लांब तिला
आहेत बघा मिशा
म्याव म्याव करते
कळत नाही भाषा

मऊ मऊ असतात
तिचे पाटीवरचे केस
दुध पिलेला दिसतो
तिच्या तोंडावर फेस

घाणीला तिच्या ती
मातीआड दडवते
अशी ती मनीमाऊ
सगळ्यांना आवडते

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

प्रेमभंग

प्रेमभंग?

प्रेम केलं जिच्यावर
तिचं लगीन झालयं
कुणावर करू काव्य
मज कळेना झालयं

आदी तिचं ते सौंदर्य
नजरेत भरायचो
कवितेच्या ओळीमध्ये
शब्दबद्ध करायचो

हात हातात धरून
दूरवर चालायचो
मनातले द्वंद्व सारे
तिच्या म्होरं खोलायचो

असताना प्रियेशी ती
अलबेल होत सारं
झाली ती बायको अन्
वाहे उलटचं वारं

तिच्या एका नजरेनं
होते लेखनी ही म्यान
माझं ऐकणं दूरच
तिचं पाजळते ज्ञान

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

उदास चंद्रमा

उदास चंद्रमा

लाली संपली केव्हाची
काळरात्र बघा झाली
लपलीय का चांदणी?
कशी नाही उमलली

दिसे उदास चंद्रमा
नभ व्याकूळ जाहले
वाट तिची पाहताना
डोळे त्याचे पाणावले

तारा एक तुटताना
भयभीत होते मन
वाटे भयाण ही रात्र
थरथरू लागे  तन

नजरेत  तू  पडावी
हाच एक ध्यास मनी
किती आळवावी सखे
अशी विरहाची गाणी

सुकताना सारी  फुले
तुझी आठवण झाली
रात्र  रडली  एकांती
तृणपाती केली ओली

पानावले  दोन्ही  डोळे
पापणीही झाली ओली
-हुदयात  आठवांनी
अशी  गर्दी  गच्च केली

लक्ष्मण दशरथ सावंत

सकाळ झाली

सकाळ झाली

पुर्वेकडे  क्षितीजात
अशी पसरली लाली
कोंबड्यानं बाग दिली
झाली सकाळ झाली

उगवला  रविराज
दाटी किरणांची झाली
लगबग पाखरांची
झाली सकाळ झाली

दंवबिंदू चहूकडे
तृणपाती झाली ओली
झाडं-वेली आनंदली
झाली सकाळ झाली

गेला मिटून काळोख
पेटू  लागल्यात चुली
पेटवण्या क्रांतीज्योत
झाली सकाळ झाली

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

थेंब

थेंब

थेंब भेटले मातीला
थेंब पडले रानात
थेंब पडले झाडात
थेंब वाजले पानात

थेंब आले हळूवार
थेंब लागे गारगार
थेंब धार तलवार
थेंब स्पर्श अलवार

थेंब सुखवी तनाला
थेंब सुखवी मनाला
थेंब स्पर्शतो तनाला
थेंब हर्षीतो मनाला

थेंब हसवी मुलांना
थेंब खुलवी मुलांना
थेंब भिजवी फुलांना
थेंब फुलवी फुलांना

थेंब दुःखात सोबती
थेंब आनंदाचा साथी
थेंब  -हुदयाचं  हसू
थेंब डोळ्यातील आसू

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

पावसा

पावसा

अरे पावसा पावसा
कुठं दडून बसला
जीव पणाला लागला
कुठं अडून बसला

अरे पावसा पावसा
नको  नुसतेच  ढग
करपलं  धान  सारं
खाली येऊनीया बघ

अरे पावसा पावसा
नको होऊस निर्दयी
भिजवाया रान सारं
फोड पाझर -हुदयी

अरे  पावसा  पावसा
काय आहे तुझ्या मनी?
गेला सुकूनीया घसा
किती करू विनवणी

अरे पावसा पावसा
कुठं मारलीस दडी
सुखी संसाराची माझ्या
गेली विस्कटुन घडी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawnt.blogspot.in

करा विचार लांबचा

करा विचार लांबचा

तुम्ही  मारा  पाटीवर
नका पोटामधी मारू
नाही देता आला चारा
नका हो प्लास्टिक चारू

उभं आयुष्य शेतात
सारं झिजलय माझं
खाणं माझं कसं मग
तुम्हा वाटले हो ओझं?

जिथं तिथं प्लास्टिकचा
खच  पडलेला  आहे
मानवाचा  विचारच
इथं  सडलेला  आहे

फळं तुमच्या कर्माची
आम्ही भोगीत बसतो
जरी   तेहतीस  कोट
देव   देहात   वसतो

असं प्लास्टिकच खाणं
नाही  पोटाला  पचलं
जगण्याचं   बळ माझं
पूर्ण   तिथच   खचलं

छंद  होतोय  तुमचा
जीव जातोय आमचा
नका पाहू पायाजोगं
करा  विचार लांबचा

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

कोशिंबीर

कांदा आणि टॕमोटोचे
घनघोर युद्ध झाले
चाकू विळी त्यांना मग
लढायला कामी आले

कोंथींबिर सुद्धा तिथं
आली धावत पळत
घाव तिलाही विळीचा
झाला कि हो नकळत

युद्ध  सोडवताना ती
झाली काकडी शहीद
पातेल्याच्या तुरूंगात
थोडे दही झाले कैद

मिठानेही भांडणाला
थोडीफार हवा दिली
युद्धातच पातेल्यात
कोशिंबीर रेडी झाली

स्वाद  असा  शानदार
आले तोंडालाही पाणी
घेतो खाऊन आता मी
गेली  संपून  कहाणी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

निसर्ग सौंदर्य

निसर्ग सौंदर्य

निसर्गाने सौंदर्यांची
अशी उधळण केली
जागोजागी रानफुले
मस्त बहरून आली

रान  गवताचं  पातं
वाऱ्यावर डोलतयं
गाणी फुलपाखरांची
कानो-कानी बोलतयं

पाणी वाहे खळाळून
नाही जुमानत कोणा
फोडी पाझर डोंगरा
सोडी वाहण्याच्या खूणा

आला बाजरीला आला
बघा कणीस फुलोरा
दिसे प्रत्येक रानात
त्याचा अनोखा डोलारा

खेळ ऊन-पावसाचा
चाले रान-शिवारात
दिसे आनंदी-आनंद
साऱ्या गाई-वासरात

लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in