एकदा तरी

🌹 *एकदा तरी*😥

कस सांगू मी तुला
विसरू शकत नाही
तुझ्याशिवाय खरेतर
काहीच सुचत नाही

नजरेआड होताच तू
गोंधळ माझा होतो
तुझ्या भेटीसाठी जीव
व्याकूळ माझा होतो

तूच  तू  दिसतेस  मग
गुलाबाच्या  पाकळीत
तुझीच  प्रतिमा माझ्या
गळ्यातल्या साखळीत

ओठावरचं नाव तुझं
ह्रुदयातही कोरलयं
तुझ्यासाठी कित्येकींना
बाजूला मी सारलयं

श्वास हा तुटण्याआधी
एकदा तरी येऊन जा
तुझ्या मिलनाचा सखे
गारवा  तू   देवून  जा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

धरतीचे नंदनवन

*धरतीचे नंदनवन*

देवतांच्या वासाने पावन
जम्मु नि कश्मीर झाले
निसर्गानेही मुक्त हस्ताने
इथं सौंदर्य बहाल केले

ट्युलिप फुलांनी बहरलेलं
माझ्या भारताचे नंदनवन
धर्मांध दहशतवाद्यांमुळे
त्याला लागले आहे ग्रहण

धरतीचा हा स्वर्ग आता
नरकच बनू पाहतोय
बर्फाच्या पाण्यामधून
रोज लालझरा वाहतोय

नसानसात भरलीय जणू
फुटीरतावादी संस्कृती
माणुसकीचा खून होऊन
दिसू लागलीय विकृती

फुटीरतावाद्यांना धडा
आता शिकवायला हवा
भारताचा हा नंदनवन
आता वाचवायला हवा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आस थेंबांची

🌧 *आस थेंबांची*🌧

आस थेंबांची लावून
धरा केव्हाची बसली
वेळ मिलनाची होता
हळू गालात  हसली

नभ  लागले  गरजू
चिंब  सपान  पडले
निळसर आभाळाला
काळ्या ढगांनी वेढले

वीज चमकेल नभी
अशा झरतील धारा
नादी लागूनीया त्याच्या
होई  ओलसर वारा

तळे, शेतं  भरतील
पूर  नदीला  येईल
पाणी मातीत मुरता
धरा  हिरवी  होईल

मऊ  मऊ  मातीमधी
मग  तिफन  चालेल
कोंब फुटून बियांना
मन  वार्याने  हलेल

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मी पुन्हा

✊🏻 *मी पुन्हा*✊🏻

लाजाळूच्या झाडाला मी पुन्हा लाजवू का
चिंब लाजेने झालीस मी पुन्हा भिजवू का

आधीच विचाराच्या गर्तेत आडकलीस तू
शंकेचे वादळ मनात मी पुन्हा माजवू का

विरहाच्या दुःखाची आताच खपली पडली
आठवणीच्या काडीने मी पुन्हा खाजवू का

स्वर बासरीचे करतात बैचेन हरेक मनाला
मनमोही त्या मुरलीला मी पुन्हा वाजवू का

झेलले वादळांना किती, हरलो ना कधीही
या तुफानाला ह्रुदयात मी पुन्हा निजवू का

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*