चला शोधूया

आम्ही थंड
तुम्ही थंड
कोण थांबवेल हे
मानवते विरूद्धचे बंड

आम्ही शांत
तुम्ही शांत
दृष्ट प्रवृतीचा
कोण करेल अंत

तुम्ही शंड
आम्ही शंड
म्हणून जातीयवादी
वाढलेत गुंड

आम्ही दुःखी
तुम्ही दुःखी
कशी होईल
जनता सुखी

आम्ही राजे
तुम्ही राजे
विकास शुन्य
नुसते तोंड गर्जे

आम्ही कवी
तुम्ही कवी
चला शोधूया
यावर युक्ती नवी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

तो नभीचा ध्रुवतारा

*तो नभीचा ध्रुवतारा* 🌟

ढळला जातो गिरीराजही
कधी हिमस्सखलन होऊन
कधी केदारनाथ तर कधी
माळीणला पोटात गाडून

महावृक्षही पोखरला जातो
वाळव्यांच्या अक्रमणाने
तर कधी दिला जातो बळी
अवास्तव विकास नावाने

भलेभलेही गाडले गेलेत
जग मुठीत धरू पाहणारे
अजिंक्य बिरूदावलीवाले
भौतिकतेवर गर्व करणारे

उठतात मनाच्या पटलावर
ते कैक तरंग अनिश्चितेने
दृढनिश्चयही ढळला जातो
मेनकेच्या एका दर्शनाने

विश्वासही नाही राहिला
आता अभेद्य, चिरंतन
पेव अफवांचे फुटताच
आत कातरले जाते मन

पावसावरही नाही भरवसा
बेईमान होतोय तो वारा
अढळ,निश्चल,श्वाश्वत फक्त
एकच तो नभीचा ध्रुवतारा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

होय माझा देश

*होय माझा देश महासत्ता बनू लागलाय*

होय माझा देश महासत्ता बनू लागलाय!

पहिल्यासारखा आता शेतकरी दीनवानी
देवाला दोष देत बसत नाही
आत्महत्या करण्यापेक्षा या सरकारला
सळो की पळो करून सोडू लागलाय

बेरोजगारीचे कारण नशीबाला आता
कोणताच तरूण मानत नाही
विविध कौशल्यात निपून होतोय तो
किंवा स्वतःच उद्योग उभारू लागलाय

दास्यत्वाची वल्कले स्त्रीयांनी केव्हाच
गाडून टाकल्यात काळाच्या मातीत
अन्यायाविरूद्ध पेटून उटत्यात आणि
आत्मविश्वासही मनात जोर धरू लागलाय

पाप-पुण्य या भाकडकथेत कोणी रमत नाही
कर्मकांडालाही सहसा जुमानत नाही कोणी
विज्ञानाचा वसा सर्वांनीच अंगीकारलाय
चंद्रावर पाय ठेवून मंगळाला पाहू लागलाय

जाती-पातीची बंधने केव्हाच झुगारलेत
खांद्याला खांदा लावून झटतोय प्रत्येकजन
समानतेचा वसा आता प्रत्येकानेच घेतलाय
सविंधानाचे नियम जो तो पाळू लागलाय

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अंधकार पसरतोय

*अंधकार पसरतोय*

संपतोय तो प्रकाश
अंधारतेय ती वाट
सोनेरी किरणांची
हरवतेय ती पहाट

दूरावली सारी नाती
सुटले हातातले हात
आपल्या मतलबाने
केला आपलाच घात

झाडांच्या नरडीवरती
आम्हीच ठेवली कुर्हाड
चिऊकाऊचं सुखातलं
हाकलून दिलं बिर्हाड

चॕटिंग करण्यासाठी
संवादच केलाय बंद
संकुचित प्रवृत्तीमध्ये
झाले सारे नजरबंद

वंशाच्या दिव्यासाठी
वातीलाच विसरतोय
म्हणून तर घराघरात
हा अंधकार पसरतोय

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*