आठवण तुझी येते

*आठवण तुझी येते*

आठवण तुझी येते
तेव्हा काळीज फाटते
दुराव्याचे शल्य माझ्या
सखे उरात दाटते

आठवण तुझी येते
नभी दिसता चांदणं
आठवते तुझ्या सखे
भाळी केलेलं गोंदणं

आठवण तुझी येते
फूल गुलाबी पाहून
वाटे घालावासा पिंगा
आता भ्रमर होऊन

आठवण तुझी येते
थेंब लागताच पडू
आसू जातात भिजून
याला का म्हणावे रडू?

आठवण तुझी येते
दिसताच मयखाना
दोन घोट  पिण्यासाठी
मग मिळतो बहाणा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

निरोप तुला देताना

*निरोप तुला देताना*

एक वर्षाची संगत
अनुभव देवून गेली
ज्ञान अमृताची द्वारे
सगळीच होती खुली

निरोप तुला देताना
भारावलोय मी मनी
आनंद नव वर्षाचा
तरी आसू या नयनी

झाले गेले सारे असे
कसे विसरून जावे?
नवे येते वर्ष म्हणून
कसे कृतघ्न मी व्हावे?

सुटताना हात जशा
वेदना ह्रुदयाला होतात
मनामधी गत वर्षाच्या
मग आठवणी दाटतात

वाडवडील सांगायचे
जुने ते सोने असते
मागे वळून पाहताना
तेच खरोखर भासते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

कप

☕ *कप*☕

कप मारत असतात उड्या
या टेबलावरून त्या टेबलावर
याच्या तोंडी लागत असतात
कधी त्याच्या तोंडी लागत आसतात
परत विसळले जातात
कधी गडूळ झालेल्या पाण्यात
अन् नंतर स्वच्छ
कधी भिडत असतात आपसातच
चहा ओतून घ्यायला
किटलीतून तर कधी पातेल्यातून
गाळणीतून गाळलेला
काही फुटतही असतात, हातातून निसटून
अगदी टुकड्या-टुकड्यात
आवाज दिवसभर चालू असतो
संध्याकाळच्या वेळेला मात्र
फेकले जाणार असतात,
कान तुटलेले,निरोपयोगी झालेले
तर बरेचसे मांडणीला
लटकवले जाणार असतात,
काही पालथे घातले जातात 
उद्या परत चहा ओतण्यासाठी
तोंडाला लावण्यासाठी

✒ *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

विझता विझेना

*विझता विझेना*
*षढाक्षरी*

धुपणच जणू
झालंय जातीचं
जळता जळेना
विझता विझेना

शिगेला पोचली
महगाई आता
गरीबाची रोटी
भाजता भाजेना

पाण्याविना धरा
सुकूनिया गेली
माती पावसाने
भिजता भिजेना

पाश्चात्त्य संस्कृती
मनामनामंधी
नवी नवरीही
लाजता लाजेना

सोशल होण्याचं
फॕड आलं हल्ली
रात्रभर कोणी
निजता निजेना

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

आम्ही भारतीय

*आम्ही भारतीय*

कटू अनुभव सारे
आम्ही विसरून जातो
एकमेका तिळगूळ
आम्ही भरवून येतो

ध्येय एकच आमुचे
एक आमुचे विचार
सौहार्दाने नांदायचे
आम्ही गिरवून घेतो

विभागलो जरी आम्ही
नाना जातीपातीमधी
जास्त ताणायचं नाही
आम्ही ठरवून घेतो

सारे भांडलो कितीही
तरी एकत्र नांदतो
वेळ पडता, वैऱ्यांची
आम्ही जिरवून येतो

रंग कुणाचा हिरवा
रंग कुणाचा भगवा
रंग तिरंग्यात येता
सारे हरवून जातो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

रंग आयुष्याचे

*रंग आयुष्याचे*🌈

मनसोक्त हसलो मी
कधी हसवीत आलो
रंग आयुष्याचे कधी
असे उधळीत आलो

कधी वादळाला भ्यालो
कधी वादळाला प्यालो
आग वादळाची कधी
इथं शमवीत आलो

कधी सुखात न्हाहलो
कधी दुःखात वाहलो
कधी प्रेम देत गेलो
कधी मिळवीत आलो

तृणावर चमकाया
कधी दंवबिंदू झालो
ठसे अस्तित्वाचे कधी
इथे उमटीत आलो

कृतुत्वाला डोईवर
कधी मिरवीत आलो
अन्यायाला पायदळी
नित्य तुडवीत आलो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माझा शिवा

🚩 *माझा शिवा* 🚩

माणसाला माणूस शिवा जोडत गेला
अन्याय मुघलांचा शिवा तोडत गेला

काळवंढली होती रयत जुलमाने
मंत्र स्वराज्याचा शिवा सोडत गेला

माजलेले होते लांडगे मराठी मातीत
शत्रू अफजल्यांना शिवा फाडत गेला

गनिमी कावा कधी निधड्या छातीने
वर्चस्व गनिमांचे शिवा मोडत गेला

उभारल्यात भिंती जरी गडदुर्गांच्या
भिंती जातीधर्माच्या शिवा पाडत गेला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माझी माय मराठी

माझी माय मराठी

माझी माय हो मराठी
किती वर्णवू महती
साता-समुद्रा पल्याड
तिची पसरली किर्ती

गोडी अविट भासते
ओवी मुखामधी येता
ज्ञानयाचे तुकोबाचे
कान अभंग ऐकता

पैठणीची भरजरी
माय परिधान करी
साज कोल्हापूरी तिच्या
दिसे छान अंगावरी

कृष्णा कोयना नि गोदा
तिच्या लाडाच्या ग लेकी
पाणी पिऊन जनांच्या
भिने अंगामध्ये एकी

अमृताचा रे गोडवा
मज बोलताना वाटे
तिच्या अमृत वाणीने
तम अज्ञानाचे मिटे

किती तिच्या बोलीभाषा
कोल्हापूरी अहिराणी
विदर्भाची ती व-हाडी
कोकणाची ती कोकणी

नाना जाती नाना धर्म
तिच्या उदरी नांदती
तिच्या परोपकाराचे
नित्य गोडवे वदती

लक्ष्मण दशरथ सावंत
पाल,औरंगाबाद
9403682125

रंग रंगले रंगात

🎨 *रंग रंगले रंगात*🎨

रंग उजळून आले
रंग खुलवून आले
रंग कळींना देवून
रंग फूलवून आले

रंगवाया निसर्गाला
रंग वसंताचे आले
रंग झाडांना वेलींना
रंगमय सारे झाले

रंग गालाला लावूया
रंग अंगाला लावूया
रंग लावू  एकमेकां
रंग   रंगीत  होवूया

रंग येता हातामधी
रंग चेहऱ्याला आले
रंग कोणता कोणाचा?
रंग सारे एक झाले

रंग लागले तनाला
रंग लागले मनाला
रंगमय  वसंताचे
रंग लावूया जनाला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*