रूसणे तुझे छळू लागले

*रूसणे ते तुझे छळू लागले*🌹

बोलणे हे तुला ना कळू लागले
रूसणे ते तुझे मज छळू लागले

पाहणे वाट राणी जमेना मला
हे दिवसही अता गे ढळू लागले

टाळताना तुला ना तमा वाटली
आसवे का अता हे गळू लागले

जोडले हात ज्यांनी मते घ्यायला
हात ते आमचे पिरगळू लागले

गंध जो काल लपला कळी आतला
फूल ते आज रे दरवळू लागले

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

वंचित

*वंचित*

सत्तरी ओलंढली स्वातंत्र्याने
तरीही बत्तर आमचे जीणे
कपडेही अजून फाटलेले
देश विकसित होतोय म्हणे

डांबराचा टिपका अजूनही
शिवलेला नाही या रस्त्याला
अजूनही इथं पेटतो दिवा
विजेचा पत्ता नाही वस्तीला

नुसती कोटींची आश्वासने
हवेमध्येच हरवले जातात
मदतीच्या पॕकेजसाठी फक्त
कागदी घोडे मिरवले जातात

स्वातंत्र्य मिळवलेला माझा देश
इंडीया भारतात विभागला आहे
इंडीया शहरात चमचमतो आहे
भारत अन्नासाठी महागला आहे

पोटासाठी वणवण आमची
कधीतरी संपायलाच हवी
शहर नको तुमचे आम्हाला
विकासात तुमची साथ हवी

✒ *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बाहूली

*बालकविता-बाहुली*

पाहा छान छान छान
आमची बाहुली छान

तिचा गोरा गोरा रंग
आणि मऊशार अंग

मखमली तिचे केस
अन् गुलाबी तो वेश

तिचे डोळे पाणीदार
नाक लांब टोकदार

गळ्यामध्ये आहे तिच्या
शुभ्र माळा मोत्याच्या

गुलाबपाकळीचे ओठ
छान भेंडीवाणी बोट

छान गालामधी हसते
हळूवार कुशीत बसते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

विंचू की माणूस

*विंचू की माणूस?*

डंख विंचवाचा होता
जसा कळवळे जीव
डंख मारताना लोका
तुला येत नाही कीव

जिभेवर भरलं तु
विष शब्दांचे जहाल
जन तुझे रे शब्द
होती ऐकून बेहाल

डंख मारणे लोकांना
विंचवाचा धर्म आहे
नको डसू कोणासही
तुझे भिन्न कर्म आहे

त्याचं बिराड पाठीशी
तुझं इथं सर्वकाही
एवाढ्याशा कारणाने
नको सारू मागे बाही

मतभेद विसरून
बोल दोन शब्द गोड
डसायची नेहमीची
आता जुनी खोड मोड

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*