🌧 *श्रावण*🌾
आला श्रावण महिना
शालू हिरवा नेसून
लेकीबाळी घेती मजा
झोक्या वरती बसून
नागपंचमीचा सण
आले आनंदा उधान
हंडी दह्याची कृष्णाला
आहे फोडायचा मान
नारळीची ती पौर्णिमा
आणी सागरा भरती
राखी बांधून भावाला
ताई औक्षण करती
ऊन पावसाचा खेळ
चाले राना माळावरी
थोडे सुकताच अंग
चिंब भिजवती सरी
इंद्रधनुष्याचा वेल
दिसे क्षितीजावरती
तृप्त ढेकर देतीया
पाणी पिऊन धरती
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment