अनुभव

*अनुभव*

पिकलेले केस अन्
चेहरा सुरकुतलेला
अनुभव सांगत असतो

थरथरता हात जेव्हा
डोक्यावर ठेवला जातो
आशिर्वाद देत असतो

अंधुक झालेले डोळे
अंधारात मिचमिचतात
संकटातही अश्वासक करतात

चालताना हातातली काठी
फक्त आधारासाठी नाही
मार्गदर्शनही करत असते

दात सगळे पडून
बोळका झालेला जबडा
जीवनाचा धडा शिकवतो

राब राबून आयुष्यभर
पाठीला आलेला बाक
झुकते घ्यायला शिकवतो

वारस जेव्हा स्पर्शीतात
ते थकलेले मातीमय पाय
नक्कीच पुजनीय असतात
अनुभवाचे गाठोडे असतात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अक्कलकोटी अभंग

*अक्कलकोटी स्वामींच्या चरणी लीन होऊन*

डोळा देखियेले | श्री स्वामी समर्थ |
जीवनाचा अर्थ | कळला गे ||

या अक्कलकोटी | समर्थ श्री स्वामी |
पावन ही भूमी | झाली असे ||

स्वामींच्या चरणी | माथा ठेवियेला |
सारा बोळविला | मी तु पणा ||

सेविला प्रसाद | गोडी अमृताची |
महाप्रसादाची | लागतसे ||

भिऊ तू नकोस | पाठीशी तो आहे|
चिंता मग काहे | तुज असे ||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बडबडगीत

*बडबडगीत*

एकदा एका घरट्यात
पोपट होते चार
नटखट होते भारी
आणि चतुरही फार

एकदा चारी जणांनी
बागेत कुच केली
पेरूच्या पोटाला
हळूच चोच मारली

चोच मारताच त्यांना
पेरू लागला गोड
चार तुकडे करून
एकेक घेतली फोड

मग चारी जणांनी
ढेकर भारी दिला
शिट्टी मारून सगळा
जमाव गोळा केला

गोड गोड पेरूवर
असा प्रसंग घडला
सार्या जमावाने मग
फडशा पेरूंचा पाडला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

बिनदास्त राहा ना जरा

🌹 *बिनास्त राहा ना जरा*🌹

का बसायचं कुडत उडालेत म्हणून रंग
दुःखालाही गुंडाळू चला सुखाच्या संग

छञी सोबत घेतली असली की
पाऊस हमखास मारतो दडी
छञी नसली सोबत घेतली की
तो अंगावर मारणार नक्की उडी
का भीत जगायचं पावसाला?
घ्या अंगावर भिजू द्या जरा अंग

ञास जाणवतो शुगरचा म्हणून
साखरेचं मन का मारत जगायचं
वाढलं जरासं पोट इतभर म्हणून
का माकडउड्या मारून बघायचं
का करायची कपड्यांची काळजी
होऊदे थोडे त्यांनाही अंगाला तंग

सफेद कपडे अंगात घातली की
पक्का चिखल उडणार कपड्यावर
जायचं असेल कुठे गावाला की
पाव्हणे हजर लगेचच वाड्यावर
कुठवर रहायचं स्वतःतच मग्न
होऊन द्या कधीतरी एकाग्रता भंग

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माझी तु

🌹🌹 *माझी तु*🌹🌹

जीव तुझ्यात गुंतला
नाही कशाचेही भान
तुझी सवय ओठाला
नित्य तुझे गुणगान

तुझे मखमली केस
असे वार्यांनी उडती
कंठ कोकिळेचा तुझा
स्वर ह्रुदया भिडती

तुझे चालणे नाजूक
पायी वाजते पैंजण
नाद ऐकताच होई
ह्रुदयात रूणझुण

नाक जणू चाफेकळी
ओठ गुलाब पाकळी
मला सतावन्या भाळी
बटा सोडली मोकळी

वेणी दिसते खुलून
आहे माळला गजरा
मज म्हणोनी आवडे
तिचा चेहरा लाजरा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मानवतेचा हात

*मानवतेचा हात*

उन्हाचा असह्य तडाका
जीव कासाविस तहानेने
पाणी मिळेना कुठेही
काय करावे मुक्त प्राण्याने?

हिंदू गाईला माता मानतो
मुस्लिमांना दूध कुठं आहे वर्ज्य
भुकेला अन्न तहानेला पाणी
हा सगळ्यांचाच आहे फर्ज

तिला सारखेच दोन्हीही
मंदिर असो वा मस्जिद
दूध ती दोघांनाही पुरवते
दिवाळी असो किंवा ईद

मुक्या प्राण्यांना कुठं सांगा
कळतो जात अन् धर्म
फक्त भाईचार्याने राहायाचे
एवढेच जाणतात ते कर्म

फक्त मानुन उपयोग काय?
गोमाता आमची आई
पाण्याविना आजही तडफती
रस्त्यावर कैक बेवारस गाई

भुतदया जे दाखवितात
नसतात कोणत्या धर्माचे
मदत करणारे हात नेहमी
फक्त असतात मानवतेचे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पुन्हा पुन्हा

🌹🌹 *पुन्हा पुन्हा*🌹🌹

प्रेमामध्ये पडावे पुन्हा पुन्हा
तो गुन्हा करावा पुन्हा पुन्हा

टोचले ते काटे विरहाचे तरी
प्रेम फूल तोडावे पुन्हा पुन्हा

नकार तिचा लटकाच असतो
प्रयास तो करावा पुन्हा पुन्हा

भाव खाणे जन्मसिद्ध हक्क
भाव द्यावा तिला पुन्हा पुन्हा

बाहूपाशात यावया अधीर ती
मिठीत घ्यावे तिला पुन्हा पुन्हा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*