प्रेमवेडा

🌹 *प्रेमवेडा*🌹

माझ्या गुलाबी प्रश्नांना
नकोय ग काटेरी उत्तर
सौंदर्यासह तुझ्या सखे
पसरू दे सुगंधी अत्तर

तुझ्या मुलायम केसात
माळावा वाटतो गजरा
का दडवतेस पदरात तु
मुखडा तुझा तो लाजरा

ओठ सखे तुझे जणू की
गुलाबाच्या  पाकळ्या
हसतेस जेव्हा गाली तु
उमलतात जशा कळ्या

पैंजणाची ती रूणझुण
ह्रुदयाची छेडते तार
कातिल मृगनयनांनी तव
होतात माझ्यावर वार

समजावे मी तरी किती
हा जीव गुंतला तुझ्यात
विसरून तुलाच तुही
मिसळून जावे माझ्यात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

नजर मायेची

*नजर मायेची*

झेप आकाशी घेतली
चित्त बाळापाशी होते
तिच्या भविष्यासाठीच
बळ पंखामध्ये येते

आहे शर्यत जीवाची
दंग धावण्यात जो तो
माय घेते धाव परी
जीव लेकीत गुंततो

राणी झाशीची लढली
पुञ पाठीशी बांधून
माता जपते पुञांना
राञं - दिवस रांधून

उर्मी एकच मनाला
ध्येय गाठायचे आता
धावताना हरीणीला
जशी पाडसाची चिंता

तिची नजर मायेची
दूर हटेना थोडीही
जीवा इवल्या सोडून
जावू वाटेना पुढेही

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आला उन्हाळा

🔥 *आला उन्हाळा*🍂

धारा घामाच्या घेवून
आलाय हा उन्हाळा
सोसवेना कोणालाही
गरम हवेच्या झळा

तळ गाठलेली विहीर
ओस पडलेला गाव
चहूदिशा पाण्यासाठी
बायापोरं घेती धाव

भेगाळलेली जमीन
हळदीजर्द बाबूळ
ओझंटलेले वाहणारे
नभात शुभ्र ढगूळ

जागोजाग पाणपोई
गार कुल्फीचे ठेले
गावोगावी गावकरी
ग्रामयाञेत रंगलेले

थंड ठेवा तुम्ही शरीरा
नि ठेवा मनालाही थंड
उन्हासह झेलायच्यात
झळा महागाईच्या प्रचंड

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*