कबड्डी

खेळ रांगडा कबड्डी
माय मराठी मातीचा
नाही भेद स्री-पुरूष
जरी निधड्या छातीचा

सारखेच ते नियम
खेळताना रे हुतूतु
जाती सामो-या निडर
नाही किंतु नि परंतु

सावजास टिपायला
जणू तयार वाघीणी
नाही कमी सावजही
होई पसार वेगानी

कधी आक्रमक होई
कधी करती बचाव
खेळाद्वारे प्रेक्षकांची
कधी मिळविती वाव!

असो कोणतेही क्षेत्र
लेक उमठवी ठसा
उंच मारते भरारी
संगे प्रगतीचा वसा

✒ *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पहिला प्रेमभंग

पहिला प्रेमभंग
माझ्या ह्रुदयाला जाळतो
दुरावा छळतो
मनाला

पहिला प्रेमभंग
सहन होईना मला
सांगावे कोणाला
कळेनाच

पहिला प्रेमभंग
जणू श्वासाविना तन
हरवते मन
विरहात

पहिला प्रेमभंग
लागतो हो जिव्हारी
नसते तय्यारी
मनाची

पहिला प्रेमभंग
होवो न कोणाचा
विचार मनाचा
व्हावाच

स्पंदने

🌹 *स्पंदने* 🌹

ह्रुदयाची ती स्पंदने
काढतात आठवण
पापण्यात आसवांची
करतात साठवण

क्षण पुन्हा आठवले
दोघं तेव्हा भेटलेले
आज त्या आठवणींचे
दुःख उरी  दाटलेले

मुलायम त्या क्षणांचा
मोरपीस मग होतो
तुला पुन्हा भेटायला
जीव कासावीस होतो

माझ्या प्रत्येक श्वासात
फक्त तुच तू भेटते
सोबतीला जग माझ्या
तरी  एकटे  वाटते

आता बोचतो दुरावा
परतूनी ये ग वेगे
तुटू लागल्यात सखे
संयमाचे सारे धागे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आनंदाचा झोका

*आनंदाचा झोका*

नाही निवारा राह्याला
नाही ओसरी पायाला
पुल शोधावा लागतो
राती आडवं व्हायला

कामासाठी वणवण
करी आईबाप रोज
दोघं करीत हलक
दोन तुकड्याचं ओझं

तोच पुल मग होतो
घर आणिक रे दार
सगळ्याच ऋतूमधी
त्याचं लय उपकार

अशा मायाळू पुलाला
आम्ही बांधियेला झुला
झुलाताना झुल्यावर
कोण सुख वर्णु तुला

जरी दारिद्रय घरात
नको दारिद्रय मनात
क्षण शोधतो आनंदी
जरी राबतो उन्हात

✒ *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

थंडी

बालकविता- थंडी

सुरू होताच हिवाळा
वाहे गार गार वारा
नाकातून वाहतात
मग हळूहळू धारा

नाही नाही म्हणताना
चांगलीच झोंबे थंडी
उब मिळावी म्हणून
शिजतील घरी अंडी

घडी घालून स्वेटर
असे करीत आराम
थंडीमुळे त्याला सुद्धा
मिळे भरपूर काम

हातमोजे, पायमोजे
दोन्ही तयार होणार
थंडी लागू नये अंगा
याची काळजी घेणार

कानपट्टी, मफलर
अन् ती माकडटोपी
काम साऱ्यांनाच मिळे
नाही कोणालाच माफी

रग आणि चादरीला
नाही दुसरा पर्याय
थंडी लागताच वाटे
प्यावा गरम तो चाय

✒ लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

नको रे बाबा

*बालकविता-नको रे बाबा*

आडाणी ठोकळा
मेंदू हा मोकळा
नको रे बाबा

लांब लांब नखं
अंगभर दुखं
नको रे बाबा

घाणेरडे वागणे
बिनलाजे जगणे
नको रे बाबा

करणे चोरी
आणि मारामारी
नको रे बाबा

आळसीपणा
लावणे चुना
नको रे बाबा

✒ *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

स्वच्छता

*बालकविता- स्वच्छता*

चला ठेवूया स्वच्छता
दूर लोटूनिया घाण
स्वच्छतेत भारताची
चला वाढवूया शान||धृ||

आम्ही भविष्य उद्याचे
हाती घेवुयात झाडू
जळमटे ती भिंतीची
केर कचराही काढू
श्रम करीत करीत
होऊ उद्याले सुजाण||१||

नखे कापून टाकूया
साबणाने हात धुऊ
जन जागृती करण्या
स्वच्छतेचे नारे देऊ
स्वच्छ समृद्ध भारत
आता करूया निर्माण||२||

घेऊ हातामधी हात
नाही पाहायची जात
स्वच्छ कराया भारत
चला करू सुरूवात
अशा एकीच्या बळाने
देश होईल महान ||३||

वसा गाडगे बाबांचा
चला जपुया आपण
स्वच्छ करू परिसर
करू  वृक्ष  संगोपन
त्यांच्या अतुल्य कार्याची
चला ठेवुया रे जाण||४||

✒ *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बलात्कार

🌹

बलात्कार शब्दातच
पाहा आहे किती दर्द
पिडितेच्या जीवनात
होतो अंधार तो गर्द

रोज नवीन बातमी
रोज नवीन पिडित
वासनांध असतात
रोज काळीज फाडीत

मन कापते वाचून
रोज तेच पानोपानी
बदलते जागा फक्त
तीच असते कहाणी

आर्त किंकाळी ठोकते
रोज नवीन निर्भया
कुठं असतो कायदा?
नाही थांबवत क्रौर्या

संस्कारच कुठेतरी
कमी पडत आहेत
म्हणूनच घटना या
अशा घडत आहेत

✒ *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*