Student पोर्टल ला आधीचे सर्व शाळांचे पासवर्ड Reset झालेले आहेत नविन पासवर्ड कसा बनवावा

 Student पोर्टल ला आधीचे सर्व शाळांचे पासवर्ड Reset झालेले आहेत

Default पासवर्ड 

   Guest123!@#  

ने लॉगिन करून नविन पासवर्ड बनवून पुढील काम करावे
Step 
  • Login
  • शाळेचा यु डायस नंबर टाईप करा
  • वरील Default पासवर्ड Guest123!@#  टाइप करा
  • Enter captcha
  • Login वर क्लिक करा
  • आता नवीन Dashboard Open होईल
  • अजून Guest123!@#  टाईप करा
  • नवीन पासवर्ड तयार करा
  •  नवीन पासवर्ड Retype करा
  • Change पासवर्ड वर क्लिक करा
शाळेतील विद्यार्थी यांची माहिती आपल्याला स्टुडंट पोर्टल वर भरावी लागते, त्याकरिता आपल्याला स्टुडंट पोर्टल वरील सर्व Tab विषयी माहिती  आवश्यक आहे. चला तर मग आपण सर्व Tab विषयी माहिती जाणून घेऊ या.
सुरुवातीला आपण स्टुडंट पोर्टल वेबसाईटवर ओपन करू त्याकरिता खालील वेबसाईटवर क्लिक करा
आता शाळेचा UDISE NO व  पासवर्ड  टाकून लॉगिन करा
आता आपल्याला मेनू तील सर्व Tab दिसेल आता सर्व Tabविषयी माहिती पाहूया

नव्हताच मोबाईल जेव्हा

*नव्हताच मोबाईल जेव्हा*

नव्हताच मोबाईल जेव्हा
पत्रानेच संवाद होता
ऐकायला आवाज तिचा
जीव कासावीस होत होता||धृ||

पत्र हेच एकमेव साधन
होते प्रेम करण्यासाठी
तिला नजरेत भरायला
व्हायच्या चोरून गाठीभेटी
आता मोबाईल नंबर आला
अन् तिचा विसरून गेलो पत्ता||१||

मी समोर दिसताच क्षणी
लाजेने चूर व्हायची तारा
आता बिनदास्त चॕटींग करते
लगेच वाजून जातात बारा
जरी बोलणे मोकळे झाले
मनात वाढता चालला गुंता||२||

नव्हत्याच फसव्या स्माइली
कधी नव्हते खोटे बोलणे
समोरासमोरी बसोनिया
ह्रुदयाचे  अंतरंग खोलणे
नव्हतीच लपवा लपवी
मनमोकळा संवाद होता||३||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
©  *ldsawant.blogspot.in*

झोप नको झेप घेऊया

झोप नको झेप घेऊया

जगायचं  तर  संघर्ष
जणू  ठरलेला आहे
लढा इथं प्रत्येकाच्या
ह्रुदयी कोरलेला आहे

न्यायहक्कासाठी आता
काढावा लागतो मोर्चा
मोर्चाविना कोणी इथं 
करीतच नाहीय चर्चा

मागण्या ज्या टोपीवर
तेच फलक नि घोषणा
कोण जुमानतो उन्हाला?
न्याय मिळण्याची तृष्णा

मागणी व्हावी मान्य
वाटते ज्याला त्याला
अन्यायावर आता तरी
घालायला हवा घाला

शत्रू सारे आपल्यातील
आपल्याशीच ही लढाई
झोप नको झेप घेऊया
अन्यायावर करू चढाई

लक्ष्मण दशरथ सावंत,औरंगाबाद

व्यसनमुक्ति अभंग

*व्यसनमुक्ती अभंग*

मद्य, सिगारेट | सेवानाचा पाश |
होतो सत्यनाश | शरीराचा ||

तंबाखूची पुडी | जणू विष फडी|
लावा त्याला काडी | एकदाची||

मादक द्रव्याची | नका करू नशा |
जीवनाची दशा | करेल ती ||

व्यसनाचे मागे | पळू नका कोणी
मळू नका कोणी | तंबाखूला||

कशापायी दारू | सांगा तुम्ही पिता |
उध्वस्त करता | जीवनाला ||

तुकडोजी सांगे | सोडावे व्यसन |
फुलेल जीवन | सदाकाळ ||

नका ठेवू कोणी | बुद्धीला गहाण |
सोडा धुम्रपान | आता तरी ||

चला सर्वजण | करूया निर्धार |
करू हद्दपार | व्यसनाला |

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा,पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

स्वप्नवत सौंदर्य

*चित्रकाव्य*

वाहणाऱ्या सरीतेचे
दृश्य असे मनोहर
नटलेली धरा अशी
जणू स्वर्ग खरोखर

दोन ललना बसल्या
न्याहाळत सौंदर्याला
शुभ्र पक्षी नभामधी
जसे छेडती वाऱ्याला

गिरी  शिखरावरती
शुभ्र हिमाची चादर
सोबतीला इंद्रधनु
रूप  दिसते  नादर

चहुदिशा  हिरवळ
दिसे आनंदात मोर
घ्याया आनंद सृष्टीचा
यावे विसरून घोर

स्वप्नवत  सौंदर्य हे
जेव्हा नयनी वसते
सुख मोठे याच्याहून
सांगा कोणते असते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

उन्हाळ्याची सुट्टी ६ अक्षरी

*उन्हाळ्याची सुट्टी*

उन्हाळ्याची सुट्टी
अभ्यासाशी कट्टी
गावाच्या मित्रांशी
करूयात   गट्टी

लपाछपी खेळू
लगोरीही खेळू
हुंदाडू  गावात
विटीदांडू खेळू

पाण्यात पोहुया
जत्रेला जाऊया
फुटाणे रेवड्या
आनंदे खाऊया

गोड गाणी गाऊ
गारीगार  खाऊ
चारताना  गाई
रानमेवा  खाऊ

चांदोमामा पाहू
चांदण्यात न्हाहु
आजीच्या कुशीत
गाड झोपी जाऊ

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
©
*ldsawant.blogspot.in*

डोईवरी मंडवळी

डोई मंडवळी तिच्या

ओठ गुलाबाचे तिचे
नथ  शोभते  नाकात
जणू सौंदर्याची खाण
रूप  साजरे  लाखात

किती  रेखीव  भुवया
तिच्या काजळ डोळ्यात
सोनसळी दागिण्यांचा
साज शोभतो गळ्यात

हातावरी  मेहंदीत
नाव सख्याचे कोरले
शुभ मंगल होताच
बांधणार तो डोरले

चंद्रकोर  शोभतीय
भाळी भुवयांच्या मंधी
आज झालीय नवरी
होती सानुली जी आधी

डोई मंडवळी तिच्या
बिंदी मस्तकी शोभते
भविष्याच्या स्वप्नांना ती
अशी शुन्यात शोधते

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

गर्द हिरव्या पानात

गर्द हिरव्या पानात

गर्द   हिरव्या पानात
आंबा पाडाचा पाहून
चोच मारायला जोडी
येते  राघूंची   धावून

गर्द  हिरव्या पानात
जोडी हिरवी रावाची
लालेलाल चोचीने ते
रस चाखती कवाची

गर्द हिरव्या पानात
आंबे लपलेले जणू
रस चाखताना राघू
लागे  गीत  गुणगुणू

गर्द हिरव्या पानात
येई  कवडसे छान
खेळ ऊन सावलीचा
जरा हालताच पान

गर्द हिरव्या पानात
किती चैतन्य दिसते
वसंताच्या चाहूलीने
सृष्टी  आनंदे हसते

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

निकाल

निकाल

जाता  संपून परीक्षा
जीव पडतो भांड्यात
येता निकालाचा दिस
मन पडते कोड्यात

ज्यांनी केली मेहनत
फळ त्यांनाच मिळते
कोण किती पाण्यामधी
निकालाने ते कळते

कतृत्वाला शबासकी
देत आसतो निकाल
मानहानी  करणारी
नको आळशी ती चाल

कोणी अपयशी होता
नका जाऊ रे खचून
जग जिंकायचे आहे
सांगा साऱ्यांना टिच्चून

आहे निकाल सांगत
रोज करावा अभ्यास
संकटाशी दोन हात
करण्याचा घ्यावा ध्यास

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

लाखात एक

लाखात एक

तिव्र उन्हाळ्याच्या झळा
पोळू लागल्या अंगाला
माथी  मारली  गरिबी
नाही  देव  तो  चांगला

देह  उगडाच  माझा
रानी चारताना शेळी
जीव इवलासा जरी
आहे दैवाचीच खेळी

दोन्ही टेकले गुडघे
पाणी घ्यावया मुखात
माझे प्रतिबिंब तिथे
एक दिसते लाखात

पाणी हे जलाशयाचे
मज भासते नितळ
मिटे तहान जीवाची
जरी असेल उथळ

झाले शरीर काटक
राना- वनात राहून
काळासवे पाण्यासम
जावे दुःखही वाहून

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

प्रेमाने जग जिंका

प्रेमाने जग जिंका

सुंभ जळून जातो तरी
सुटला जात नाही पीळ
गाठी मनात बांधल्या की
विकासाला बसते खीळ

मी मोठा मीच हुशार
मी पणात सरते वय
अंती मात्र हिशोब होतो
नसतेच तिथे हयगय

थोड्या थोडक्या यशाने
हुरळून नसते जायचे
काय राहते शेवटी इथे
शब्द गोड बोलायचे

नाही काहीच श्वाश्वत
तरी कसला अहंकार
मिळून मिसळून जग
कशाला शब्दांचे वार?

चार दिस सासूचे जरी
सुनेचेही असतात चार
प्रेमाने जग जिंकता येते
आता तरी कर विचार

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

भूक

भूक

बाजार अस्तित्वाचा भरला होता
आपापल्या परीने प्रत्येकजण
जगण्याचा प्रपंच मांडत होता
बाजाराच्या अगदी मधोमध
झेंड्यांचा ठेला मांडलेला होता
प्रत्येक धर्माच्या जातीच्या रंगाचे
वेगवेगळ्या आकाराचे झेंडे
अगदी रूबाबदार दिसत होते
आपापल्या जाती-धर्म-पंतानुसार
खरेदी होत होते विविध झेंडे
जणू झेंड्या-झेड्यात माणूस
विभागला होता एकजुट विसरून...
झेंडा विकणारा मात्र निर्विकार...
कुठलाच रूबाब नाही...
कोणताच आततायीपणा नाही....
फक्त झेंडे विकण्यात मग्न झालेला...
हटकलेच जाऊन त्याला मी...
सांग कोणता तुझा धर्म,कोणती जात?
रंगलास सांग तू कोणत्या रंगात?
सहज बोलून गेला..मात्र धडा शिकवला
*भूक* हाच माझा धर्म,हीच माझी जात...
शोधलेच नाही अद्यापही मला मी
नेमका रंगलोय कोणत्या रंगात..
सांगा साहेब तुम्हीच आता...
भूकेला असतोय का कुठला धर्म?
जगण्याशी लढाई माझी तेच माझं कर्म
जगण्याशी लढाई माझी तेच माझं कर्म

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

शानदार गोष्ट

बालकविता

शानदार गोष्ट

माझ्या वर्गातील मुलं
रोज रोज हट्ट धरतात
ऐकायची नवीन गोष्ट
मागणी सुरात करतात

ऐके दिवशी मिही त्यांना
सांगितली नवीन गोष्ट
गोष्टीच्या त्या टपालाला
नव्हतचं कुठलं पोस्ट

सांगतो म्हटलं गोष्ट पण
राहायचं तुम्ही सगळे दक्ष
उत्तर जो देईल तोच असेल
इथं सगळ्यामधी चाणाक्ष

आटपाट नगरीमध्ये
दोन मित्र राहायचे
सांगू आणि नकासांगू
लोक त्यांना म्हणायचे

दोघांचेही  लग्न  झालते
बायका होत्या छान छान
जंगलात जाऊ फिरायला
सगळ्यांनीच केला प्लॕन

जंगलात येता सारेजण
लागले गंमतीजमती करू
आनंदाने गाणी म्हणत
तालावर नृत्य लागले करू

चौघेच होती जंगलात
त्यांना सिंह दिसला दुरून
कळेना कोणाला काही
सगळेच गेले घाबरून

ऐका मुलांनो ध्यान देवून
तिथं गोष्ट अनोखी घडली
सांगा चढला झाडावरती
बायको सांगाचीही चढली

नकासांगाचीही बायको
झाडावर चढली पटकन
सांगा बरं झाडाखाली
आता राहिलं असेल कोण?

चटकन बोलले विद्यार्थी
*नकासांगू* राहिला खाली
खर सांगतो तुम्हाला आता
तिथच चूक त्यांनी केली

मिही म्हणालो त्यांना मग
आता नाहीच गोष्ट सांगत
तुम्हीच बोलले नका सांगू
बसा गोष्टीची वाट बघत .....

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

मामाची बैलगाडी

मामाची बैलगाडी

माझ्या मामाच्या गाडीला
छान   शुभ्र   बैलजोडी
सर्जा राजाच्या साथीने
मामा   हाकी   बैलगाडी

असो उन्हाळा दिवाळी
मन  अतुर  जायला
गाडी हाकीत हाकीत
मामा येतसे न्यायला

जोडी सर्जा न राजाची
खूप  दिसती  सुरेख
रोज  राबती  शेतात
लय  कष्टाळू नी नेक

वाजे घुंगरू गळ्यात
छान  पाठीवर झूल
घेती  धाव  लगबग
जरा मिळता चाहूल

सजलेली  बैलगाडी
त्यात मामा गाडीवान
जणू सुखाची पर्वणी
आम्हा  वाटे  धनवान

गाडीमधी बसायला
वाटे अनोखा आनंद
खूर उडल्या धुळीचा
असे वेगळाच गंध

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

एप्रिल फूल

एप्रिल फूल दिनानिमित्त
बरेच जण जाहले फूल
माणसात नव्हते जे कोणी
आज मात्र राहिले कूल

कुठे बायकोने नवऱ्याला
कुठे नवऱ्याने बायकोला
कुठे काकांनी काकुला
कुठे काकुंनी काकाला
आजोबांनीही आजीला
आजींबाईनी आजोबाला
प्रयकराने प्रियशीला
प्रयशीनेही प्रियकराला
शब्दांनीच शब्दांची दिली हूल
बनवले एकमेकांना फूल

आज मुर्ख होण्यापेक्षाही
फूल होण्यात जास्तच रूची
अर्थ जरी एक तरीही
सन्मान पडणार नव्हता खर्ची
एक मात्र नक्की होतं
आपल्याच ओळखीतल्या
आपल्याच माणसांनी
आपल्याच मित्रमैत्रिणींनी
एकमेकांना बनवले आहे
आजच्या दिनी एप्रिल फूल

लक्ष्मण दशरथ सावंत

गावातील माणुसकी

गावातली माणुसकी

नदी सुकूनीया गेली
गेली विहीर तळाला
दुष्ट दुष्काळाच्या पशू
लागू लागले गळाला

झाड जाहले बोडके
नाही सावली राहिली
पाय भाजता उन्हात
होते जीवाची काहिली

घोटभर पाण्यासाठी
ठरलेली पायपीट
कामधंदा नाही हाता
नाही भाकरीला पीठ

जरी आटले रे पाणी
माणुसकी जीती हाय
पाण्याविना वाटसरू
कधी रिता गेला नाय

गावातलं गावपण
नाही राहिलं रे जरी
माणुसकी जपायचं
भान रूजलेलं उरी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

महाबलशाली हनुमान

महाबलशाली हनुमान

महापराक्रमी| महाबलवान|
महाधैर्यवान | हनुमंत ||

सर्वशक्तीमान | केशरी नंदन |
संकटमोचन | अंजनेय ||

लन्किनी भंजन | सर्व रोगहारा |
सर्व दुखःहारा | महाकाय ||

वानर नायक | अंजनीचा सुत |
रामाचा तो दूत | बजरंगी ||

बजरंगबली | कंचन बरन |
शंकर सुवन | महावीर ||

लंका विदायक | दैत्यकुलान्तक |
सर्वयन्त्रात्मक | वज्रकाय ||

अमित विक्रम | उदधिक्रमण |
शोक विनाशन | महारूद्र ||

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कैं.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

आता फक्त लढायचं

आता फक्त लढायचं

नको फासी घेऊ राजा
आता फक्त  लढायचं
भले येतील संकटे
नाही कधी रडायचं

हमी नाहीच भावाची
तरी उत्पन्न घ्यायचं
नाही निसर्गाची साथ
तरी पेरीत राह्यचं

कर्ज मानगुटी जरी
नाही मोडून जायचं
फास सावकारी सारे
दूर फेकून द्यायचं

हवे हक्काचे आम्हाला
  हिंमतीने सांगायचं
समृद्धीला साऱ्यांनीच
  वेशीवर टांगायचं

हातामधी हात घेत
हक्कासाठी लढायचं
मोर्चा निमित्त रे फक्त
अन्यायाशी भिडायचं

लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

परीक्षा

📝 परीक्षा 📝

अरे परीक्षा परीक्षा
बंद कुदणं खेळणं
पुस्तकाच्या पानांची रे
होते वाचून चाळणं

अरे परीक्षा परीक्षा
घोर जीवाला लागतो
अभ्यासाला परीक्षार्थी
रातं-दिवस जागतो

अरे परीक्षा परीक्षा
फेल कोण पास कोण
जणू विस्तवामधूनी
निघे चकाकून सोनं

अरे परीक्षा परीक्षा
नाही डोळ्याला रे डोळा
नको वाटतो सर्वांना
निकालात रे भोपळा

अरे परीक्षा परीक्षा
जणू जीवनाचे अंग
जावे तरून सागर
सारे बांधताती चंग

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

वाट

🛣 *वाट* 🛣

वाट बिकट नसावी
वाट काट्यात हसावी
वाट संपणारी नको
वाट सोबत असावी

वाट पाहता ही येते
वाट दाखवता येते
वाट वाकडी चालता
वाट लावता ही येते

वाट कष्टात काटता
वाट उन्नतीचा मार्ग
वाट चालता सत्याची
वाट जीवनाचा स्वर्ग

वाट जोडते वाटेला
वाट तोडते वाटेला
वाट दुरावली जरी
वाट भिडते वाटेला

वाट लावणारे नको
वाट दावणारे हवे
वाट लुटणारे नको
वाट पाहणारे हवे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

हीच वादळाची सुरवात

🌪 *हीच वादळाची सुरूवात*

धुसमसते काळीज जेव्हा आतल्याआत
वादळाची बहुतेक असावी हीच सुरूवात

सावकारांचे भरलेले इथं पैस्याने गल्ले
पुतळा विटंबनासाठी होती भ्याड हल्ले
अन्नाविना जीव जेव्हा प्राण इथं सोडतात

आपलीच माणसे होती जी कालपर्यंत
झेंड्यात विभागून केला माणूसकीचा अंत
पडते दरार जेव्हा राजकारणाने नात्यात

ती हुंड्यासाठी जळते ती गर्भातही मरते
बलात्काराचा इथं ती रोजच बळी ठरते
अबला म्हणून कोंडाल जेव्हा तिला घरात

आसमानी संकटानी जेव्हा माल जातो सडून
मातीमोल होता धान्य घसा सुका होतो रडून
झुकवला जातो शेतकरी जेव्हा हमीभावात

मिळतात आश्वासने अन् होत नाही पुर्तता
गमावली जाते मनामनातून विश्वासार्हता
पाडायला सत्ता जेव्हा शिवशिवतात हात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

ठेच मायेच्या पायाला

ठेच मायेच्या पायाला
असू डोळ्यात दाटते
जवा रक्ताळतो पाय
माझे काळीज फाटते

रक्ताळला पाय तिचा
नाही दगडा पाझर
भाळी लिहिली ठोकर
किती जपावी नजर

ठेच लागता पायाला
किती तळमळे जीव
किती निष्ठूर तो देव
नाही येत त्यास कीव

नित्य चालणे उन्हात
असे दुर्मिळ सावली
रस्ता दगड- मातीचा
नित्य तुडवी माऊली

नाही साडी भरजरी
तरी कणखर पाय
लाख दगड धोड्यांना
उरे पुरुनिया माय

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

आठवण तुझी येते

*आठवण तुझी येते*

आठवण तुझी येते
तेव्हा काळीज फाटते
दुराव्याचे शल्य माझ्या
सखे उरात दाटते

आठवण तुझी येते
नभी दिसता चांदणं
आठवते तुझ्या सखे
भाळी केलेलं गोंदणं

आठवण तुझी येते
फूल गुलाबी पाहून
वाटे घालावासा पिंगा
आता भ्रमर होऊन

आठवण तुझी येते
थेंब लागताच पडू
आसू जातात भिजून
याला का म्हणावे रडू?

आठवण तुझी येते
दिसताच मयखाना
दोन घोट  पिण्यासाठी
मग मिळतो बहाणा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

निरोप तुला देताना

*निरोप तुला देताना*

एक वर्षाची संगत
अनुभव देवून गेली
ज्ञान अमृताची द्वारे
सगळीच होती खुली

निरोप तुला देताना
भारावलोय मी मनी
आनंद नव वर्षाचा
तरी आसू या नयनी

झाले गेले सारे असे
कसे विसरून जावे?
नवे येते वर्ष म्हणून
कसे कृतघ्न मी व्हावे?

सुटताना हात जशा
वेदना ह्रुदयाला होतात
मनामधी गत वर्षाच्या
मग आठवणी दाटतात

वाडवडील सांगायचे
जुने ते सोने असते
मागे वळून पाहताना
तेच खरोखर भासते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

कप

☕ *कप*☕

कप मारत असतात उड्या
या टेबलावरून त्या टेबलावर
याच्या तोंडी लागत असतात
कधी त्याच्या तोंडी लागत आसतात
परत विसळले जातात
कधी गडूळ झालेल्या पाण्यात
अन् नंतर स्वच्छ
कधी भिडत असतात आपसातच
चहा ओतून घ्यायला
किटलीतून तर कधी पातेल्यातून
गाळणीतून गाळलेला
काही फुटतही असतात, हातातून निसटून
अगदी टुकड्या-टुकड्यात
आवाज दिवसभर चालू असतो
संध्याकाळच्या वेळेला मात्र
फेकले जाणार असतात,
कान तुटलेले,निरोपयोगी झालेले
तर बरेचसे मांडणीला
लटकवले जाणार असतात,
काही पालथे घातले जातात 
उद्या परत चहा ओतण्यासाठी
तोंडाला लावण्यासाठी

✒ *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

विझता विझेना

*विझता विझेना*
*षढाक्षरी*

धुपणच जणू
झालंय जातीचं
जळता जळेना
विझता विझेना

शिगेला पोचली
महगाई आता
गरीबाची रोटी
भाजता भाजेना

पाण्याविना धरा
सुकूनिया गेली
माती पावसाने
भिजता भिजेना

पाश्चात्त्य संस्कृती
मनामनामंधी
नवी नवरीही
लाजता लाजेना

सोशल होण्याचं
फॕड आलं हल्ली
रात्रभर कोणी
निजता निजेना

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

आम्ही भारतीय

*आम्ही भारतीय*

कटू अनुभव सारे
आम्ही विसरून जातो
एकमेका तिळगूळ
आम्ही भरवून येतो

ध्येय एकच आमुचे
एक आमुचे विचार
सौहार्दाने नांदायचे
आम्ही गिरवून घेतो

विभागलो जरी आम्ही
नाना जातीपातीमधी
जास्त ताणायचं नाही
आम्ही ठरवून घेतो

सारे भांडलो कितीही
तरी एकत्र नांदतो
वेळ पडता, वैऱ्यांची
आम्ही जिरवून येतो

रंग कुणाचा हिरवा
रंग कुणाचा भगवा
रंग तिरंग्यात येता
सारे हरवून जातो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

रंग आयुष्याचे

*रंग आयुष्याचे*🌈

मनसोक्त हसलो मी
कधी हसवीत आलो
रंग आयुष्याचे कधी
असे उधळीत आलो

कधी वादळाला भ्यालो
कधी वादळाला प्यालो
आग वादळाची कधी
इथं शमवीत आलो

कधी सुखात न्हाहलो
कधी दुःखात वाहलो
कधी प्रेम देत गेलो
कधी मिळवीत आलो

तृणावर चमकाया
कधी दंवबिंदू झालो
ठसे अस्तित्वाचे कधी
इथे उमटीत आलो

कृतुत्वाला डोईवर
कधी मिरवीत आलो
अन्यायाला पायदळी
नित्य तुडवीत आलो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माझा शिवा

🚩 *माझा शिवा* 🚩

माणसाला माणूस शिवा जोडत गेला
अन्याय मुघलांचा शिवा तोडत गेला

काळवंढली होती रयत जुलमाने
मंत्र स्वराज्याचा शिवा सोडत गेला

माजलेले होते लांडगे मराठी मातीत
शत्रू अफजल्यांना शिवा फाडत गेला

गनिमी कावा कधी निधड्या छातीने
वर्चस्व गनिमांचे शिवा मोडत गेला

उभारल्यात भिंती जरी गडदुर्गांच्या
भिंती जातीधर्माच्या शिवा पाडत गेला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माझी माय मराठी

माझी माय मराठी

माझी माय हो मराठी
किती वर्णवू महती
साता-समुद्रा पल्याड
तिची पसरली किर्ती

गोडी अविट भासते
ओवी मुखामधी येता
ज्ञानयाचे तुकोबाचे
कान अभंग ऐकता

पैठणीची भरजरी
माय परिधान करी
साज कोल्हापूरी तिच्या
दिसे छान अंगावरी

कृष्णा कोयना नि गोदा
तिच्या लाडाच्या ग लेकी
पाणी पिऊन जनांच्या
भिने अंगामध्ये एकी

अमृताचा रे गोडवा
मज बोलताना वाटे
तिच्या अमृत वाणीने
तम अज्ञानाचे मिटे

किती तिच्या बोलीभाषा
कोल्हापूरी अहिराणी
विदर्भाची ती व-हाडी
कोकणाची ती कोकणी

नाना जाती नाना धर्म
तिच्या उदरी नांदती
तिच्या परोपकाराचे
नित्य गोडवे वदती

लक्ष्मण दशरथ सावंत
पाल,औरंगाबाद
9403682125

रंग रंगले रंगात

🎨 *रंग रंगले रंगात*🎨

रंग उजळून आले
रंग खुलवून आले
रंग कळींना देवून
रंग फूलवून आले

रंगवाया निसर्गाला
रंग वसंताचे आले
रंग झाडांना वेलींना
रंगमय सारे झाले

रंग गालाला लावूया
रंग अंगाला लावूया
रंग लावू  एकमेकां
रंग   रंगीत  होवूया

रंग येता हातामधी
रंग चेहऱ्याला आले
रंग कोणता कोणाचा?
रंग सारे एक झाले

रंग लागले तनाला
रंग लागले मनाला
रंगमय  वसंताचे
रंग लावूया जनाला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*