बाजार

आठवडी बाजारात
कोणी विकायला येतो
खर्चुनीया चार पैसे
कोणी विकतही घेतो

चाले घाई बाजारात
भल्या पहाटे पासून
मांडायची भाजीपाला
घेती जागा तपासून

आठवडी बाजारात
येतो विकायला कोणी
खर्चुनीया चार पैसे
घेतो विकतही कोणी

कुठे टोमॅटो बटाटे
कुठे शेंगा गवारीच्या
कुठे हिरवी मिरची
कुठे राशी जवारीच्या

गिऱ्हाईक त-हेबाज
भाव मागती पाडून
व्यापारीही नाही कमी
भावा सांगतो चढून

चाले खेळ डोंबाऱ्याचा 
एकीकडे बाजारात
मदारीही  करी  खेळ
टाळ्या वाजती जोरात

भाव सांगता सांगता
घसा  पडतो  कोरडा
विकताना भाजीपाला
होतो आरडा ओरडा

पाल  ठोकून विकतो
कोण उन्हात विकतो
नफा होण्यासाठी कोणी
उभा राहूनी विकतो

ढिगाऱ्यात बसलेल्या
कोबी वांगी कांदे भेंडी
चालबाज भाजीवाला
लावी गिऱ्हाईका शेंडी

झोंबे मिरच्या नाकाला
कोणी उधळता त्यांना
नाक झाकून चालणे
शिंका येई सगळ्यांना

माझ्या गावचा बाजार
नित्य असाच भरतो
पंच कोशीतील जना
तिथं  एकत्र  करतो

माल आणि विचारांची
होते देवाण घेवाण
तिथं मिळतील साऱ्या
वस्तू लहान सहान

आयुष्याच्या बाजाराची
कथा अशीच असते
संस्काराचे घेणे देणे
नित्य चालूच असते