महागाईचा भस्मासूर

*महागाईचा भस्मासूर*

सणवार येता दारामधी
महागाई वर तोंड काढते
पगार पडतो तोडका अन्
नको ते जीवनात घडते

उंदराऐवढा  माझा पगार
जेव्हा महागाई पेलू पाहतो
खर्च करायला धावणारा
शेवटी अभिमन्यू होऊन जातो

पेट्रोल डिजेल टाकताना
कासावीस होतो जीव
दुसऱ्यांचे सोडा हो तुम्ही
बायकोलाही येत नाही कीव

तिच्या एक एक मागण्यांची
लांबच  लांब  लिस्ट असते
डोळे  उघडे ठेवून ही बया
रोज दिवास्वप्न पाहत बसते

नवी  कपडे  घ्यावीत की
घ्यावे फराळासाठी सामान
पै-पाहुण्यांनी दस्तक देताच
डोळ्यांना दिसते आसमान

एकेकांचा हट्ट पुरविताना
माझ्या नाकी येतात नऊ
आणल्या गेल्या खेळण्या
तर राहूनिया जातो खाऊ

नौकरदार आहे मी म्हणून
पाहुण्यांकडे पैसे कसे मागावे
कळतच नाही सणावाराला
नाक मुठीत धरून कसे जगावे

महागाईचा भस्मासूर असा
वरचेवर वाढतच चाललाय
ईवलासा खिसा त्याने माझा
कुरतडून कुरतडून खाल्लाय

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

तरूणांनो जागे व्हा रे

*तरूणांनो जागे व्हा रे*

खूप निखळले तारे
खूप पेटले निखारे
राख विझली जयांची
आग त्यातही फुका रे

वासनेत जो बुडाला
त्याची करा नसबंदी
व्हावे कलमही हात
मग  उतरेल  धुंदी

भ्रष्टाचार माजलेला
तृण जसे कुरणात
रोखायला त्यांना आता
जाळ करूया कानात

भविष्याच्या काळजीने
तरूणांनो व्हा रे जागे
आयुष्याच्या गोधडीचे
खूप उसावले धागे

शोषीतांना हात द्या रे
मारा सुखद फुंकर
बळ लढण्याचे द्या रे
ही देवूनी कंकर

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आजच कर

*जे करायचे ते आजच कर*

जे करायचे ते आजच कर
व्यर्थ भय ना तू मनात धर

जुलूमी शृंखला तोडून टाक
अन्यायापुढे नको झोळेझाक
एक मरताच उठतील लाख
युद्ध लढण्याची तयारी कर

मीच का? हा नको विचार
एकटाच जरी तू कर प्रहार
धर  हाती  ती  शूर तलवार
तव शौर्याची येऊ दे रे लहर

कसला धर्म नी कसली जात
बंद कर  तू तो अंध रक्तपात
संपवायला  ती  अंधारी रात
दिवा न्यायाचा आता उंच धर

नसानसात रक्त सळसळू दे
लाट क्रांतीची मनी उसळू दे
शौर्यकिर्तीचा सुगंध दरवळू दे
ना तरी हा देह आहेच नश्वर

कुठवर शब्दद्वंद्व चालू द्यावे
कुठवर युद्ध टाळून ध्यावे
शिवरायांचे  वंशज आपण
लढण्या सदैव तत्पर रहावे
हाती असो खडग् वा कंकर

हसत झेलले ज्यांनी विरमरण
शुरविरांचे त्या तू कर स्मरण
जयगाथेने चढू दे तव स्फुरण
वेळ  हीच रे होण्याची अमर

फक्त दोघांचच जग

*फक्त दोघांचच जग*

हातामध्ये हात सखे
गुंफूनीया दूर जाऊ
निसर्गाच्या सवे आज
प्रेमगीत  गात जाऊ

शुभ्र  वस्र  लेवुनी तू
केस मोकळे सोडले
मम ह्रुदयाच्या सखे
आज तारेला छेडले

धुंद होऊनीया धुकं
चहूदिशा पसरलं
तुला घ्यायला बाहूत
मन माझं आसुसलं

तुझ्या सोबत चालता
नाही चंद्राची त्या आस
तव मुखचंद्राचा ग
हवा वाटे सहवास

गर्द हिरव्या झाडीत
सखे आपणच दोघं
चिंब प्रेमात बुडल्या
फक्त दोघांचच जग

अशा गुलाबी थंडीत
जरा शोधूया एकांत
संसाराच्या जोखडाचा
नको करायला भ्रांत

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बदली

*बदली*

असं आम्ही ऐकलं मॕडम
आता बदली तुमची होणार
लळा शिकायचा लावून
अर्ध्यातच सोडून जाणार

बोट धरूनीया बाबाचं
शाळेत होते मी आले
गोड  गोड  शब्दांनीच
तुम्ही आपलेसे मज केले

गाणी गोष्टी गप्पा खेळ
शिकवलतही तुम्ही छान
शिस्तही महत्वाची होती
आहे गावालाही अभिमान

रोज गृहपाठ, वर्गपाठ
स्वाध्याय पूर्ण व्हायचा
कृतीयुक्त अभ्यासक्रम
आनंद  देवून  जायचा

खेळताना कोणी पडलं
तर वेदना तुम्हाला व्हायच्या
प्रथमोपचार पेटी घेऊन
लगेचच उपचार करायच्या

जगणे कोणीही शिकवेल
वागायला तुम्ही शिकवले
जीवनाची अनमोल मूल्ये
तुमच्या वर्तनातून दाखवले

बदलवून टाकलीत शाळा
तुमच्या अपार मेहनतीने
तुमचीच  झालीय  बदली
कसा खेळ केला नियतीने

जिथं  जाल  तुम्ही मॕडम
तिथं फुलवाल आनंदवन
आम्ही मात्र पोरके झालो
काढू नित्य तुमची आठवण

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
✍🏻 © *ldsawant.blogspot.in*

त्याच्याविना दिवाळी

*त्याच्याविना दिवाळी*

तिच्या ओल्या पापण्यांना
त्याची  आठवण  झाली
त्याच्याविना दिवाळीला
घर  वाटे  खाली  खाली

देशासाठी सीमेवर
तिचा लढणारा सखा
तिचा असूनही होता
तिच्यासाठी तो परका

असो दिवाळी दसरा
येणे जमतच नाही
सुकलेल्या पापण्यांनी
सखी वाट त्याची पाही

अभिमान जरी तिला
सखा असल्याचा वीर
फुटे  आठवांचा बांध
कसा  धरायचा  धीर

आसमंत  उजळला
लक्ष लक्ष त्या दिव्यांनी
दाटी केली डोळ्यांमधी
आठवाच्या आसवांनी

त्याच्याविना दिवाळीला
दिप  नाही  पाजळला
नूर  चेहऱ्याचा  तिच्या
नाही  कधी  उजळला

आग आत काळजात
तरी डोळ्यामधी हसू
दुःख दाखवावे कोणा
लपे  पापण्यात आसू

त्याचा अभिमान आम्हा
आहे तसाच तुझाही
देशासाठी  लढतो तो
त्याग ना कमी तुझाही
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

वारा कधीच शांत नसतो

*वारा कधीच शांत नसतो*

आपल्या त्या धडधडणाऱ्या
छातीला विचारून पाहा
स्वच्छ हवा श्वसननलिकेतून
पोहचत राहतो ह्रुदयापर्यंत
अन् ह्रुदयापासून अस्वच्छ हवा बाहेर
जगण्याचा आनंद मिळतो तेव्हा कळते
वारा कधीच शांत नसतो

पिंपळाच्या त्या महाकाय
झाडाला विचारून पाहा
सळसळ फरफर वाजणारी पाने
दुपारच्या रणरणत्या उन्हात
जेव्हा हालतात,तेव्हा कळते
वारा कधीच शांत नसतो

अथांग समुद्रात जेव्हा विशाल
लाटा रूद्राकार धारण करतात
उंचची उंच भिंत करून किनाऱ्यावर
धाव घेत सुटतात तेव्हा जाणवते
वारा करा कधीच शांत नसतो

काळकुट्ट ढगांना घेऊन
रविराजाला झाकोळून टाकतो
थंडी गुलाबी हवा आसमंतात पसरवतो
जोरजोरात थेंबाचा वर्षाव होतो
त्यावेळी कळते
वारा कधीच शांत नसतो

वावटळींचं साम्राज्य निर्माण करून
महाकाय वृक्षांना,इमारतींना
क्षणांत जमिनदोस्त करतो,
अनेकांच्या घरात व जीवनात अंधार पेरतो,
क्षणात होत्याचं नव्हतं
ज्या वेळी होतं, तेव्हा कळतं
वारा कधीच शांत नसतो

वारा कधीच शांत नसतो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

दीप घेऊन चालले

*दिप घेऊन चालले*

तम मनाचे जाळाया
वात होऊन जळले
उजळाया  अंधकार
दिप  घेऊन  चालले

डोळे मिटूनिया घेता
भूतकाळ आठवतो
दुःख यातनांचे सारे
अंतरात    पेटवतो

एक ठिणगी होऊन
आता निश्चय करीन
जनी निंद ज्या प्रवृत्ती
साऱ्या बाजूला सारीन

वार नजरांचे सारे
खूप झेलुनिया झाले
आसू गाळायचे आता
बंद  नयनांनी केले

माझ्या यातनांची आता
अशी करीन मी ज्वाला
आता  सोसवेना  छळ
अंत  संयमाचा  झाला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

भाकरीचा चंद्र

*भाकरीचा चंद्र*

चंद्र पाहण्याचा ध्यास
आम्ही घेतलाच नाही
चंद्र भाकरीचा आम्हा
आज दिसलाच नाही

आज  शितल चांदणे
आले घेऊन प्रकाश
भाग्य उजळेल कधी
त्यात नित्य अमावस

नाही माहित आम्हाला
काय शरद चांदणे
आहे आमुच्या नशिबी
भिक मागून जगणे

जागलात रात्रभर
दूध आठवीत तुम्ही
भर नाही या पोटात
जागे उपाशीच आम्ही

छान केसरी दूधात
कोण चंद्राला बघतो
भाकरीच्या चंद्रासाठी
आम्ही उपाशी जागतो

चंद्रावर मोहिमेचं
देश सपान बघतो
भाकरीच्या तुकड्यात
आम्ही चंद्राला शोधतो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

चिखलाच्या बेड्या

*चिखलाच्या बेड्या*

आम्ही शेतकरी मुलं
नातं आमुचं मातीशी
चिखलात फुलायचं
ध्येय एकच छातीशी

माझा शेतकरी बाप
रोज शेतात राबतो
प्वार साहेब बनावं
याचं सपान बघतो

फक्त शिकायला हवं
हेच आम्हाला माहित
धन दांडग्याची मुलं
आम्ही खरचं नाहीत

नाही डांबराची आस
नको सिमेंटचा रस्ता
तुम्हा समजाया हवं
जीव नाही हो हा सस्ता

भाग्य उद्याचं देशाचं
आज चिखल पाण्यात
हवा विकास इथचं
कोण घेईना ध्यानात

भाग्य उद्याचं देशाचं
आज चिखल पाण्यात
हवा विकास इथचं
कोण घेईना ध्यानात

अशा चिखलाच्या बेड्या
आम्ही तोडून टाकल्या
शिक्षणाच्या ध्येयावर
आता  नजरा  रोखल्या

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

गेले हकनाक जीव

*गेले हकनाक जीव*

स्वप्न  बुलेट  ट्रेनचं
एका क्षणात विरलं
भरधाव जाण्याआधी
जीव काळाने घेरलं

झाली  चेंगराचेंगरी
फक्त अफवेनं एका
अफवाच होती तरी
नाही ओळखला धोका

आता चौकशी कशाची
आणि कुणाला मावेजा
गेले जीव हकनाक
किती सुन्या झाल्या भूजा

पायाभूत सुविधांची
किती प्रचंड वानवा
प्रवाशांच्या उद्रेकाचा
आता पेटला वनवा

सुविधांच्या विकासाला
नको द्यावयाला खोडा
अपघात शिकवितो
घ्यावा आतातरी धडा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

ओटी नदीची भरली

*ओटी नदीची भरली*

आला जोमाने पाऊस
ओटी  नदीची भरली
माजलेल्या दुष्काळाची
आता चांगली जिरली

पाणी जुमानेच कोणा
काय बांध नि धरण
बंद केलय पाण्याने
अंग  चोरत  चालणं

वाहे  दुथडी  भरून
वाजे खळखळ पाणी
आली निसर्गाच्या ओठी
सारी तृप्ततेची गाणी

फेस आलाय तोंडाला
फेस पाण्याचा पाहून
कोण जाणे काय काय
नदी  नेईल  वाहून

आकाशाचे प्रतिबिंब
खळाळत्या त्या पाण्यात
नाही थांबण्याचे नाव
धन्य मानी वाहण्यात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

चिऊताई

*चिऊताई*

चिऊताई चिऊताई
एक सांग मला बाई
टिपताना दाणे सांग
किती करतेस घाई

होता पहाट सकाळ
येई चिवचिव कानी
पहाटेच्या वेळी सांग
म्हणतेस का ग गाणी?

चोचीतला दाणा चिऊ
देते पिल्लांच्या चोचीत
दाणा खाऊनिया उष्टा
पिल्लु  येतात  खुशीत

झेप  घेते  दूरवर
काडी चोचीत आणते
काडी काडी जमवून
कसे घरटे विणते

माझ्या अंगणी तू चिऊ
रोज  टिपतेस दाणे
मज  आवडते  तुझे
स्वैर  गगणी  उडणे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पावा प्रतिक प्रेमाचे

*पावा प्रतिक प्रेमाचे*🎼

यमुनेच्या  तीरावरी
कान्हा वाजवी बासरी
नाद ऐकून तयाचा
होई राधा ती बावरी

गाई वासरे आनंदी
स्वर ऐकून मंजुळ
संथ वाहे यमुनाई
वाजे पाणी झुळझुळ

पावा मुरली बासरी
तुझ्या वाद्याची रे नावे
शाम रंग मोहमयी
रूप आणिक बरवे

येता सुर बासरीचे
जाई हरपून भान
भुक नाहीच पोटाला
नाही लागत तहान

पावा प्रतिक प्रेमाचे
राधा आणि मुरारीचे
जुळे एकमेकांमध्ये
सारे स्वर अंतरीचे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

गुणवंत होऊ

शाळेत जाऊया
शाळेत शिकूया
शाळेत करूया.....ज्ञानार्जण

करूया वाचन
करूया लेखन
करूया पठन....आनंदाने

होऊ गुणवंत
होऊ ज्ञानवंत
होऊ नितीमंत....शाळेमधी

मिळून राहूया
मिळून खेळूया
मिळून होऊया.....सुशिक्षित

वाईट गंमत
वाईट पंगत
वाईट संगत......नको आता

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*

बेडूक

🐸🐸
बालकविता

बेडूक बेडूक 
उड्या मारी किती
पाण्याची रे तुला
नाही कशी भिती

जमीन की पाणी?
कुठं तुझं घर ?
सर्वत्रच तुझा
असतो वावर

तुझा रे आवाज
डराव डराव
पाऊस पडता
करतो सराव

गळा फुगवितो
पोट फुगवितो
आवाजाने तुझ्या
रात जागवितो

जिभेला काढून
किटक भक्षितो
निसर्गाचा मित्र
निसर्ग रक्षितो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मधली सुट्टी

*दुपारची सुट्टी*

घण घण घण
घंटा वाजली
दुपारची सुट्टी
शाळेची झाली

आवाज करत
मुलं बाहेर आली
अंगणात शाळेच्या
गर्दी फार झाली

लगोर, कबड्डी
खेळ झाले सुरू
मामाच्या पत्रासाठी
फेर लागले धरू

कोण उड्या मारी
कोण नुसते बसे
गमतीजमती बघत
कोण नुसतेच हसे

कोणी आणी तोडून
छान बकुळीची फुले
वडाच्या पारंबीला
कोणी खेळतात झुले

दुपारच्या सुट्टीत
असा आनंदी आनंद
आपल्या आवडीचा
जो तो जपतो छंद

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आकाश हे तुझे

*आकाश हे तुझे*

जोमानं उचल
पाऊल तू नारी
भुंकणारी कुत्री
टपलेली दारी

जन निंदकांची
चिंता नको करू
थांबवू नकोस
यशाचा तू वारू

लाजेचा पदर
बाजूला तू सार
आकाश हे तुझे
स्वैर झेप मार

लागायला नको
कोणाचीही दृष्ट
यशस्वी व्हायला
पडतात  कष्ट

साधेसोपे यश
मिळत नसते
कोंब व्हायला बी
मातीत घुसते

अडथळे जरी
नको करू त्रागा
नक्षत्रात आहे
तुझी एक जागा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*