कोण गडे?

असतेस सदा तू
माझ्या आसपास
जगू कसा तुजवीन
तुच माझा श्वास

तुजवीन खरेतर इथं
पानही हालत नाही
फुल गुलाबाचं जरी
आनंदे डोलत नाही

जाळतेच तूच आणि
विझवणारीही तूच
दम कोंडतो तुझमुळे
गंध पसरवणारी तूच

जलचक्र हे तुझ्यामुळे
तूच वादळे वाहणारी
भरती-ओहटी तवकारणे
तू त्सुनामी घडवणारी

कोण बरे तू आहे गडे
मज हवीशी वाटणारी?
ह्रुदयासह माझ्यातल्या
रक्तातही घर थाटणारी?

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

महादेव

☘पावन महाशिवरात्रीनिमित्त प्रभू महादेवाच्या नावांची षठाक्षरी रचना ☘

शिव महाकाल
शिव महाकांत
शिव एकपाद
शिव उमाकांत

शिव निरंजन
शिव निलकंठ
शिव अनिरूद्ध
शिव कालकंठ

शिव अर्धेश्वर
शिव योगेश्वर
शिव सर्वेश्वर
शिव महेश्वर

शिव उमानाथ
शिव सिद्धनाथ
शिव गणनाथ
शिव भोलानाथ

शिव कल्पवृक्ष
शिव ही एकाक्ष
शिव महालिंग
शिव पिंगलाक्ष

शिव अक्षमाली
शिव अंबरीश
शिव त्रिलोकेश
शिव जगदिश

शिव  पुरंदर
शिव जटाधर
शिव कलाधर
शिव गंगाधर

☘ *हरहर महादेव* ☘

✍🏻  *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पळस फुलला

*पळस फुलला*

येतो पळसाला पहा
सर्वअंगा रक्तवर्ण
माह संपताना माघ
जाती झडूनीया पर्ण

पोपटाच्या चोचीसम
याची सुंदरशी फुले
जणू फडके पताका
तशी वाऱ्यावर डुले

लाल दिसताती ज्वाला
जणू शेकोटी पेटली
मिळवाया ते तारूण्य
धरा   पेटून   उठली

मातकट, मळसर
जरी निसर्गाचा रंग
किमयेने पळसाच्या
सर्व राहताता दंग

झाड झाड होते सुने
जाता गळूनीया पाने
कथा पळसाची न्यारी
गातो वसंताचे गाणे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

गुलाबाची फुलं

🌹 *गुलाबाची ती फुलं*🌹

गुलाबाची ती फुलं
निरागस,लोभस,गोंडस
काट्यामधी फुललेली
वाऱ्यावर डोललेली
रोज डे काय आला अन्...
खुडली गेली देटातून
कोणी देवापुढं मांडली
कोणाच्या वेणीत विराजली
कोणाच्या ओंजळीत आली
कोणाच्या चिमटीत बसून
गंधाने ह्रुदयाला सुगंधमय केलं
कोणी पाकळ्यात कुस्करून
शयनघरातील पलंगावर अंथरलं
काही फुलांच्या नशीबात मात्र...
पायदळी तुडवणं आलं..नकार पचवायला
काहींना कचरापेटीत तर....
तर काहींना रस्त्यावर भिरकावलं..
काही फुलं मात्र प्रियेशीच्या प्रतिक्षेत हातात तशीच सुकून गेली.......😢🌹
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

पतंग व्हायचयं मला

खुडताना कळी

*खुडताना कळी तुला*

काढले पोट्याने घराबाहेर जेव्हा
आसवे तुझ्या होते नयनी दाटले
खुडताना पोटात कळी इवलीशी
तुला का तेव्हा ना काहीच वाटले

  खेळली असती ती अंगणात
  घर केले असते तुझ्या मनात
  धरला तू हव्यास दिवट्याचा
  तेव्हाच तुझे रे नशीब फुटले

  बेभान होतास तारूण्यात तू
  घेतले ना तेव्हा रे ध्यानात तू
लेक लावी दिवा दोन्ही घराचा
  बोल हे तुला ना कधी पटले

चिरडून कळीला जन्म मुलाचा
प्रश्न तेव्हा होता तुझ्या कुळाचा
कळले ना तुला भविष्य उद्याचे
म्हणूनच आज आभाळ फाटले

जिम्मेदार तू तुझ्या यातनांचा
गुन्हेगार तू  तुझ्या आसवांचा
नको आता रे कोरडा उसासा
कर्माने तुझ्या अंधाराला गाठले

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आली खळ्याला जाग

*आली खळ्याला रे जाग*

आली सोंगणीला आली
साऱ्या शेतातली साळी
गावोगावी  मळणीला
सज्ज झाल्यात रे खळी

धुमाकूळ जागोजागी
माह संपताना माघ
रास साळीची अंगणी
येते खळ्याला रे जाग

होता घावावर घाव
दाणे निसटती खाली
उफनाया वाऱ्यावर
पुन्हा भरतील डाली

किती कष्टाचे हे काम
अंग गाळतेय घाम
तरी मातीमोल ठरे
साऱ्या घामाचा रे दाम

जरी पडतात कष्ट
तरी राबे शेतकरी
आबादानी उत्पन्नाचे
स्वप्न बाळगून उरी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नकोच ती वादळे

🌪 *नकोच ती वादळे*🌪

खूप झाली वादळे
खूप झाली रे हवा
शांती नि समतेचा
मार्ग दाखवा रे नवा

किती आली वादळे
आणि विरून गेली
निरापराध जीवांचा
गळा चिरून गेली

महान होते पुरूष ते
नका जातीमध्ये बांधू
त्यांच्या थोरवीवरती
नका संधी तुम्ही साधू

निळे, भगवे नको
नको हिरवे वादळ
उभाराया शांतीस्तंभ
घेवूया हाती कुदळ

कशाला करता हवा
गर्वाचा नुसता फुगा
हिमतीवर स्वतःच्या
जरा आनंदाने जगा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*