ढग

*ढग*

ढगांचे भांडण
असे कसे लागले
धडाड-धूम मग
एकमेकांवर गरजले

चालू झाला त्यांचा
खेळ पाठशिवणीचा
नाचू लागला मोर
त्यांना पाहून वनीचा

एकमेकांना दिल्या
धडकावर धडका
सोसवेना ढगांनाही
चेहरा झाला रडका

ढगांच्या भांडणात
वीज चमकली
टचकन नभातून
सर खाली आली

काळसर ढगांचा
गेला उतरून तोरा
पांढरा झाला रंग
चिंब झाली धरा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

एकटी चिमणी २

*एकटी चिमणी*

कर्ज बनलं ग फास
केलं पांढरं कपाळ
नाही पहावलं सुख
कसं अभद्र हे भाळ

झाली होती ग आमच्या
साल  दोनच  लग्नाला
धाडीयेलं  आमंत्रण
दुष्काळानं ग विघ्नाला

फुल  एकच फुललं
संसाराच्या  वेलीवर
लय होता जीव त्यांचा
इवल्याश्या मुलीवर

कोण कुणाचं असतं?
आपलच  मेल्यावर
एकटच  ग  झुलावं
लागतयं  झुल्यावर

स्वप्न पडली पांढरी
कधी होती ग रंगीत
गेले विरूनीया रंग 
आता निरस संगीत

आता एकटी चिमणी
नाही चिमणा साथीला
तेलाविना सांग कसं
बळ येईल वातीला?

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

रंगमय जीवन

*रंगमय जीवन*

किती रंग जीवनात
असतात भरलेले
काही बाह्यांगावरती
काही मनी कोरलेले

रंग जीवनाचे भिन्न
रंग भावनांचे भिन्न
सुख आणिक दुःखाचे
किती आहेत नगण्य

रंग सुखाचे वेगळे
रंग दुःखाचे वेगळे
वेळ वाईट येताच
पळू लागती सगळे

रंग  बदलणारेही
असतात हो कित्येक
सरड्याच्या जातीतले
नसतात  बरं  नेक

किती रंगाची माणसं
असतात जगामधी
उंच विचार सरणी
जगतात मात्र साधी

फक्त एकच रंगाचा
नको जयघोष उगा
सप्तरंगी  रंगामधी
जरा जगायचं बघा

रंग अनेक आपुले
तर ध्येय एक ठेवा
एक दिलाने जगूया
याच ध्येयाकडे धावा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

काळ्या मातीत

*काळ्या मातीत*

काळ्या मातीत राबता
जाते  मोडून कंबर
पाठ  टेकता  भुईला
निळं  दिसतं  अंबर

काळ्या मातीत राबता
येई  पिक  जोमदार
धान्य आबादाणी होई
जाई  फिटून  उदार

काळ्या मातीत राबता
चारा  मुबलक  होई
दारी कडब्यांची गंज
पान्हा सोडतात गाई

काळ्या मातीत राबता
होई  घामाचं  रे सोने
शेता-शेतात दिसते
पिक डौलदार छान

काळ्या मातीत राबता
गेली  सरून  हयात
भाजे उन्हामधी अंग
तरी  गोडी  -हुदयात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

न्याहारी

*न्याहरी*

धनी  राबतो  शेतात
घाम अंगाचा निघतो
येते  दुपार  डोईला
वाट सखीची बघतो

वेळ न्याहारीची होता
कानी पैंजण वाजते
मुरडत  ठुमकत
सखी  शेतामधी येते

अनवाणी पावलांनी
पाय भाजते चालते
धनी उपाशी शेतात
तिचं काळीज बोलते

कांदा चटणी भाकर
टोपलीत डोईवर
प्रिती तिची धन्यावर
जशी साय दुधावर

तृणपाते  बांधावर
तिच्या पायाशी खेळते
फुल तोडून तिथले
तिही केसात माळते

लाज पदरी लपते
होता नजरा नजर
किती लोभस दिसतं
तिचं रूपडं साजरं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पैसे

*पैसा* बालकविता

पैसा  अरे  पैसा तू
आहेस तरी कसा
ज्याच्याकडे असे तू
त्याचा गरम रे खिसा

बाबा तुला नेहमी
पॉकेटमधे ठेवतात
आईला ते एकांतात
मोजूनी दाखवतात

दुकानात तुझ्यासाठी
असतो खास गल्ला
तुझ्याशिवाय वकीलही
देत नाही म्हणे सल्ला

नाणी असतात काही
काही असतात नोटा
नफा नाही झाला तर
होतो म्हणतात तोटा

बटव्यातून आजी तुला
हळूच बाहेर काढते
चॉकलेटची माझ्यासाठी
मेजवानी मस्त होते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पिल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

चला बालकांनो

*चला बालकांनो*

चला बालकांनो आज
मजा  निसर्गाची  पाहू
सा-या गमती जमती
मनी  साठवून  ठेवू

विचारूया पाखरांना
झेप घेतात ते कसे
रात्र दिवस पाण्यात
कसे राहतात मासे

रोज  नवीन  आकार
कोण चांदोबाला देतो
सप्तरंगी  इंद्रधनु
कसा आकाशात होतो

पंख दिले कोणी तुम्हा
जरा विचारू पक्षांना
गोड फळे देता कसे
पुसू जाऊनी वृक्षांना

काळे काळे ढग नभी
येती अचानक कसे
कोणी दिलेत मोराला
छान रंगातली पिसे

काडी काडी जमवून
किती छान खोपा होतो
साप आयत्या बिळात
कसा निवारा शोधतो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*

सुंदर आयुष्य

*सुंदर आयुष्य*

एवढ्याशा कारणाने
नाही निराश व्हायचं
भले  येऊ दे संकटे
नित्य हासत राह्यचं

क्षण कसोटीचा सदा
घेतो परीक्षा आपली
तोच यशस्वी जगतो
ज्याने शांतता जपली

येती कित्येक वादळे
घोंगावत नैराश्याची
आणि घेतात परीक्षा
मनातल्या संयामाची

फास लावून गळ्याला
प्रश्न  संपलेत  कुठे?
फुले  हसत  फुलती
जरी टोचतात काटे

किती सुंदर आयुष्य!
वाया नकोस घालवू
अनमोल  देहावर
नको  उदार  तू होऊ

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

उघड्या रानात

उघड्या रानात

चाले उघड्या रानात
खेळ ऊन सावल्यांचा
मेघ भास करविती
डोंगराला टेकल्याचा

तृण हिरवे पोपटी
हसे आनंदाने धरा
गेले पक्षी उडूनीया
नभी मोकळ्याच तारा

डोंगराळ माळरानी
शुभ्र झरा खळखळे
दूर गावकुसामधी
पिके मोतीयेचे मळे

पान पान आनंदूनी
घेती झाडावर झुले
वाऱ्यासंगे डोलणारी
रान गवताची फुले

गेला निघून पाऊस
सृष्टी आनंदी करून
दूर  मळभ सारून
मोद  मनात  पेरून

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

करावासा वाटतो अंत

करावासा वाटतोय अंत

करावासा वाटतोय अंत
कुजलेल्या विचारांचा
एकविसाव्या शतकातही
अंधश्रद्धा पाळणाऱ्यांचा

करावासा वाटतोय अंत
वासनांध झालेल्यांचा
बलत्कारासाठी उठणा-या
कामवासनी देहांचा

करावासा वाटतोय अंत
तरूणींवर शेरेबाजी करणाऱ्यांचा
आधुनिक बदल न स्विकारता
कपड्यावरून गरळ ओकणाऱ्यांचा

करावासा वाटतोय अंत
कळीला गर्भात खुडणा-यांचा
स्रीजातीवर हात उगरणा-या
बिनलाज्या पुरूषी अहंकाराचा

करावासा वाटतोय अंत
जातीत भेदभाव करणाऱ्यांचा
स्वतःच्या स्वार्थापायी
एकमेकांत भांडणे लावणाऱ्यांचा

करावासा वाटतोय अंत
दुबळ्यांवर अन्याय करणाऱ्यांचा
अन् अंत करावासा वाटतोय
मुकाटयाने अन्याय सहनाऱ्यांचाही

करावासा वाटतोय अंत
मनुस्मृतीने पाडलेल्या अंधाराचा
धर्मविरोधी मनात घाण साठवून
समाज कुरतडणाऱ्या उंदरांचा

करावासा वाटतोय अंत
माझ्या आणि तुमच्यासारख्यांचा
सगळंकाही दिसत असूनसुद्धा
धृतराष्ट्र बनू पाहणाऱ्या वृतींचा

चला बालकांनो

*चला बालकांनो*

चला चला बालकांनो
गाणे निसर्गाचे गाऊ
झाडे,वेली,चंद्र,तारे
सारे  निरखून  पाहू

मारताना उड्या ससा
जरा  दुरूनच  बघू
चांदण्यांना मोजायला
चला रात्रभर जागू

कडाडते वीज अन्
ढग वाजवितो बाजा
राजेशाही थाटामधी
येतो हा पाऊस राजा

नदीतल्या त्या पाण्यात
चला  मनसोक्त  डुंबू
रानातच  गवतात
खेळ मांडू लिंबू-टिंबू

वास फुलांचा आपल्या
चला नाकात भरून
खोपा केला कसा घेऊ
चिमणीला विचारून

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*