निसर्गाची हाक

🌍 *निसर्गाची हाक*🍃

तुझ्या राक्षसी वृत्तीने
पाणी केले हद्दपार
झाल्या विहिरी वांझट
झाले ओसाड शिवार

दिसू लागल्या गावात
दुष्ट दुष्काळाच्या छटा
पाणी मिळेना पोटाला
काय करायच्या नोटा?

अशा भयाण उन्हात
पाय चाले अनवाणी
शोध पाण्याचा घेताना
दाटे डोळ्यामधी पाणी

गेलं  पाणी  वाहूनिया
नाही बांदाला बंदिस्ती
किती चिमण्या जीवांची
गेली उजाडून वस्ती

होती हिरवी धरती
गात आनंदात गाणी
नाही राहिली पाखरे
गेली संपून कहानी

हाक ऐक निसर्गाची
धर हातामधी हात
बांध बंदिस्ती घालाया
देऊ एकमेकां साथ

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

हुंड्याचा धंदा

👰🏻 *हुंड्याचा धंदा*💸

वयात येताच पोरगा जरा
धंदा जोरात चालू होतो
किती घ्यायचा हुंडा हा
हिशोब घरादारात चालतो

घरदारासह हा पट्ट्या
पोरगी बघायला जातो
कांदापोहे चालेल कशी
पुरणपोळी खाऊन येतो

बैठक बसवून लोकांची
इथं लावली जाते बोली
बापाला मग प्रश्न पडतो
का जन्माला येतात मुली

हुंड्याचा रेट प्रत्येकाचा
वेगळा ठरलेला असतो
लाख दीड लाखात कोणी
तोळ्यात विकला जातो

एक दोन हजारामुळेही
शुभकार्यात येते विघ्न
अशी पैसेपिपासु लोकं 
मोडून टाकत्याती लग्न

चिमण्या पोरीसाठी बाप
देणं सगळ करतो कबूल
दिवट्या पोराच्या अंगावर
मग चढवली जाते झुल

मातीमोल ठरतात नाती
कवडीमोल कागदासाठी
कशा जन्मा येतील पोरी
अशाने समाज्याच्यापोटी?

तुझ्या पोटी जन्मेल मुलगी
तेव्हाच सारं तुला कळेल
बोली लागताना तेव्हा तुझं
काळीज तीळ तीळ जळेल

आता तरी वाटुदे जरा खंत
अजूनही वेळ गेलेली नाही
मुलीचे बाप मागतील हुंडा
तो दिवस  खरेच दूर नाही

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

लाट

🌊 *लाट* 🌊

लाट आता समुद्रापुरतीच
मर्यादित राहिलेली नाही
किनारे कधीच सोडलेत तिने

लाट थंडीचीही येते कधी
गुलाबी स्वप्न रंगवायला
कधी उघड्यांना कुडकुडवायला

रंगाचीही असतेय लाट
कधी भगवी,निळी कधी
तर कधी असतेय ती हिरवी

लाट असते स्वातंत्र्याचीही
कधी गुलामगिरीपासून तर
कधी अनिष्ट चालीरितीपासूनची

विचारांचीही लाट असते
गांधीवादी, हिटलरवादी,
कट्टरवादी,कधी कम्युनिस्टांचीही

व्यक्तींचीही असते लाट
कधी मोदी,पुतीन कधी
कधी ट्रम्प,आणि ओबामाचीही

आलेली लाट ओसरतेच
निसर्गाच्या नियमानुसार
कधी भरती तर कधी ओहोटी

परंतु लाट असते करत नक्षी
मनाच्या किनाऱ्यावरती
क्षणिक कधी निरंतरतेसाठी

माणूसकीचीही यावी लाट
अनिश्चित कालावधीसाठी
कधी ओहोटी न येण्यासाठी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*