🐥 *चिऊताई फक्त दिन*😥
पहिले कसं लेकरावाणी
चिऊताई अंगणी दिसायची
त्यांची गाणी गात लेकरं
अगदी मनमोकळी हसायची
घरोघरी अन् झाडोझाडी
चिमणीखोपा असायचा
प्रभातवेळी चिवचिवाटानं
हा जीव जागा व्हायचा
मायेच्या हातून पसाभर
धान्य परसात सांडायचे
वेचताना चिऊ नि काऊ
दोघं आपसात भांडायचे
घरात किती सुबत्ता आहे
चिऊचा वावर सांगायचा
घरातल्या जिव्हाळ्याचा
लगेच अंदाज लागायचा
पहिले तो सुर्य फक्त
पुर्वेकडेच उगवायचा
जो भाव असे मनामंधी
तो कर्तव्यात दिसायचा
मनाप्रमाणेच आता लोक
सुर्याला उगवायला सांगती
दुसऱ्यांची चिंता कुठं इथं
स्वपोटापुरतच ते मागती
लहानपणी दिसलेली चिऊ
फक्त पुस्तकापुरती उरली
सर्वसमावेशक संस्कृती आमची
आम्हीच मातीत पुरली
आता जे होऊ लागले नष्ट
त्यांचा दिन साजरा होतोय
मोठमोठ्या घोषणा फक्त
कृती कोण सांगा करतोय
चिऊकाऊसारखं एक दिस
नष्ट होऊन जाऊ आम्ही
कोणी शिल्लक राहणार नाही
राहील वळवळणारी कृमी
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*