एकदा तरी

🌹 *एकदा तरी*😥

कस सांगू मी तुला
विसरू शकत नाही
तुझ्याशिवाय खरेतर
काहीच सुचत नाही

नजरेआड होताच तू
गोंधळ माझा होतो
तुझ्या भेटीसाठी जीव
व्याकूळ माझा होतो

तूच  तू  दिसतेस  मग
गुलाबाच्या  पाकळीत
तुझीच  प्रतिमा माझ्या
गळ्यातल्या साखळीत

ओठावरचं नाव तुझं
ह्रुदयातही कोरलयं
तुझ्यासाठी कित्येकींना
बाजूला मी सारलयं

श्वास हा तुटण्याआधी
एकदा तरी येऊन जा
तुझ्या मिलनाचा सखे
गारवा  तू   देवून  जा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

धरतीचे नंदनवन

*धरतीचे नंदनवन*

देवतांच्या वासाने पावन
जम्मु नि कश्मीर झाले
निसर्गानेही मुक्त हस्ताने
इथं सौंदर्य बहाल केले

ट्युलिप फुलांनी बहरलेलं
माझ्या भारताचे नंदनवन
धर्मांध दहशतवाद्यांमुळे
त्याला लागले आहे ग्रहण

धरतीचा हा स्वर्ग आता
नरकच बनू पाहतोय
बर्फाच्या पाण्यामधून
रोज लालझरा वाहतोय

नसानसात भरलीय जणू
फुटीरतावादी संस्कृती
माणुसकीचा खून होऊन
दिसू लागलीय विकृती

फुटीरतावाद्यांना धडा
आता शिकवायला हवा
भारताचा हा नंदनवन
आता वाचवायला हवा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आस थेंबांची

🌧 *आस थेंबांची*🌧

आस थेंबांची लावून
धरा केव्हाची बसली
वेळ मिलनाची होता
हळू गालात  हसली

नभ  लागले  गरजू
चिंब  सपान  पडले
निळसर आभाळाला
काळ्या ढगांनी वेढले

वीज चमकेल नभी
अशा झरतील धारा
नादी लागूनीया त्याच्या
होई  ओलसर वारा

तळे, शेतं  भरतील
पूर  नदीला  येईल
पाणी मातीत मुरता
धरा  हिरवी  होईल

मऊ  मऊ  मातीमधी
मग  तिफन  चालेल
कोंब फुटून बियांना
मन  वार्याने  हलेल

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मी पुन्हा

✊🏻 *मी पुन्हा*✊🏻

लाजाळूच्या झाडाला मी पुन्हा लाजवू का
चिंब लाजेने झालीस मी पुन्हा भिजवू का

आधीच विचाराच्या गर्तेत आडकलीस तू
शंकेचे वादळ मनात मी पुन्हा माजवू का

विरहाच्या दुःखाची आताच खपली पडली
आठवणीच्या काडीने मी पुन्हा खाजवू का

स्वर बासरीचे करतात बैचेन हरेक मनाला
मनमोही त्या मुरलीला मी पुन्हा वाजवू का

झेलले वादळांना किती, हरलो ना कधीही
या तुफानाला ह्रुदयात मी पुन्हा निजवू का

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आज का उदास

*

वेणीतील गजरा तुझा
आज सुकून का गेला
चंद्रावाणी मुकडा हा
असा का कोमेजलेला

केस विस्कटलेले तुझे
नाही बुचुडा बांधलेला
आज उदास का चेहरा
काल गाली लाजलेला

कोकिळेवाणी तो कंठ
आज का एकदम शांत
मंञमुग्ध करणारा स्वर
आज आसुत भिजलेला

तुझ्या त्या नयन बाणाने
ह्रुदयात  पेटतात  दिवे
समईत  तेवणारा  दिवा
आज असा का विजलेला

का झाकला चंद्र हाताने
बघ झाला अंधार चहूकडे
कर प्रकाशीत या ह्रुदया
नको ठेवू तो निजलेला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मन

*मन*

मन उडालं उडालं
गेलं आकाशा भिडाया
कुठं लागत्याती पंख
त्याला हवेत उडाया

मन मोगर्याचं फूल
जाई  दूरवर गंध
कधी गुलाब वासाने
जाई होऊन बेधुंद

मन पाटातलं पाणी
करी आवाज खळाळ
नाही आवरत जणू
पायी बांधलय चाळ

मन झंजावात वारा
कधी इथे कधी तिथे
कधी होऊन वादळ
दूर पाचोळ्याला नेते

मन सागराची खोली
कधी लागला ना आंत
आत वादळ कित्येक
तरी  दिसतयं  शांत

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

लगीनघाई

*लगीनघाई*

आली लगीन सराई
घरा-घरात गोंधळ
लेक जाताना सासरी
मन होतयं वेंधळं

त्याच्या लाडक्या लेकीला
बाप घेतो रूखवत
रूप पाहून साजरं
त्याचं मन सुखावतं

लेक जाणार सासरी
गोळा येई उदराला
माय एकांती असता
डोळा पुसे पदराला

दुःख असताना मनी
भाऊ पञिका वाटतो
ताई होताना परकी
गळी हुंदका दाटतो

लग्न मंडपी उत्सव
मनी वादळ दाटलं
ज्याने जपलं मायेनं
तेच परके वाटलं

गळा आलाय भरून
आता सासरी जायचं
जिथं घेतलाय जन्म
तिथं पाव्हणी व्हायचं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शाळा भरणार

*शाळा भरणार*

पुन्हा वाजणार घंटी
शाळा भरली जाईल
पुन्हा इवल्या जीवांना
गट्टी शाळेशी होईल

पुन्हा नवे सवंगडी
डाव वेगळा असेल
हाती प्रत्येकाच्या पुन्हा
पाटी-पुस्तक दिसेल

पुन्हा विटी नि दांडूंना
दिस वाईट येणार
खेळ लगोरीचे पुन्हा
रोज नाही दिसणार

पुन्हा नाही दिसणार
सूर-पारंब्यांचे खेळ
झेपायला विहिरीत
नाही मिळणार वेळ

पुन्हा सुट्टीतली मजा
नाही करता येणार
किल्ला बांधणारे हात
पुन्हा *आई* लिहिणार

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

सपान पेरीतं

🌾 *सपानं पेरीतं*🌾

दिस पेरणीचे आले
झाली लगबग सुरू
शेता-शेतात तिपन
स्वप्न लागलीय पेरु

सर्जा राजाच्या साथीनं
मन सपानं पेरीतं
विठू भेटेल म्हणून
होतं सामील वारीत

घन येतील भरून
चिंब करतील माती
बीया आणी धरतीची
घट्ट बनतील नाती

आज सोने तो पेरीतो
अशा उघड्या रानात
पिका येईल बहार
आशा असते मनात

दोर जगाच्या भुकेची
आहे हातातच माझ्या
आम्हा कष्टानेच सुखी
होते राजा आणि प्रजा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

प्रिय सखे

🌹 *प्रिय सखे* 🌹

सात फेरे लग्नाचे घेवून
माझ्या जीवनात आलीस
शीतल चांदण्यांची बरसात
तु माझ्या अंगणी केलीस

तु नसतीस जीवनात तर
रूक्ष वाटले असते जीवन
तुझ्या पावलांनीच झाले
माझ्या जीवनाचे नंदनवन

तु आलीस या जीवनात
असा दैवयोग तो घडला
जणू स्वातीच्या नक्षत्रात
थेंब शिंपल्यामध्ये पडला

सदैव सोबत माझ्या तु
सुख दुःखात तुझी साथ
ऊन्हाचा कडाका सोसला
उभी भिजतही पावसात

रुसवा-फुगवा क्षणाचा
मज आनंद जातो देऊन
पुन्हा गाली तुझ्या हासू
जणू गुलाब आला फुलून

अशीच राहावी सोबत
कधीही दुरावा न येवो
तुझा हात या हातामध्ये
साथ आयुष्याची होवो

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

असा यावा पाऊस

🌧 *असा यावा पाऊस*

असा यावा *पाऊस*
व्हावी धरती थंडगार
रस्त्याच्या दुतर्फा व्हावी
मग रानफुलांची बहार

असा यावा *पाऊस*
मेघगर्जनाही व्हावी
मनात चैत्यन्याची
विज चमकून जावी

असा यावा *पाऊस*
मन तृप्त होऊन जावे
पशु आणि पक्षांनी
गीत आनंदाने गावे

असा यावा *पाऊस*
यावा नदीलाही पूर
केराकचरा व्यसनाचा
वाहून जावा कोसो दूर

असा यावा *पाऊस*
शेतकरी आनंदावा
दुष्काळाचा जरासा
लवलेशही ना रहावा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बालगीत

*बालगीत-देवाकडे प्रार्थना*

देवा तुला आज
मी जोडतो रे हात
साळीच्या रोपानांच
येऊ दे मऊ भात

उसालाच येऊदे
पोते भरून साखर
ज्वारीच्या रोपांनाच
येऊ दे गोल भाकर

समुद्राच्या सतरंजीवर
जरा वेळ लोळू दे
इंद्रधनुचा आम्हांला
झोकाही जरा खेळू दे

चंद्र आणि चांदण्या
हाताला त्या येऊ दे
सुर्यालाही जरासा तु
थंड कुल्फी खाऊ दे

ढगांकडे बोट करता
गळू दे बदाबदा पाणी
इशारा करता कोकिळेला
गाऊ दे गोड गोड गाणी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

ती शेतकरी जोडी

🌾 *ती शेतकरी जोडी* 🌾

त्याची फाटक्याच धोतराची जोडी होती
तिची फाटक्याच कापडाची साडी होती

झोपडीवजा घर  पाचोळ्याने शेकारलेले
फाटलेक्या स्वप्नांची त्यांच्या माडी होती

पोटच्या पोरावाणी करायचे प्रेम बैलांवर
सर्जा आणि राजाची ती बैलजोडी होती

काटक झालेलं शरीर राब राबून शेतात
कोण म्हणेल त्यांना दोघं खादाडी होती

दुष्काळाने सुकलं सारं शेतशीवार तरी
मनामध्ये प्रेमाची हिरवीगार झाडी होती

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

यल्गार

👊🏻 *एल्गार* 👊🏻

प्रियकराचे लग्न तिच्या
दुसरीच्यासंगे जमले
भावनांचा चुराडा झाला
सारे स्वप्न तिचे भंगले

समजलं असेल त्यालाही
काय होतं कणखर भेटल्यावर
तिही काही कमी नाही
मनातून पेटून उठल्यावर

मंडप पेटवून तिने आज
खरचं फुकलाय शंख
बेवफाई प्रवृत्तीला तिने
जोरदार मारलाय डंख

फुलांनाही वेदना होतात
ते देठापासून तुटताना
कसं कोणाला सहन होईन
सुख डोळ्यांदेखत लुटताना

तिला नेमकं समजता काय?
फक्त मजा घेताय करून
पायातली वाहन नाहीये ती
मुकाटयाने सहन घेईन करून

तिच्या धाडसाला माझे
आहेत लाख प्रणाम
बेवफाई प्रवृत्तीला आतातरी
लागला पाहिजे लगाम

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

अनुभव

*अनुभव*

पिकलेले केस अन्
चेहरा सुरकुतलेला
अनुभव सांगत असतो

थरथरता हात जेव्हा
डोक्यावर ठेवला जातो
आशिर्वाद देत असतो

अंधुक झालेले डोळे
अंधारात मिचमिचतात
संकटातही अश्वासक करतात

चालताना हातातली काठी
फक्त आधारासाठी नाही
मार्गदर्शनही करत असते

दात सगळे पडून
बोळका झालेला जबडा
जीवनाचा धडा शिकवतो

राब राबून आयुष्यभर
पाठीला आलेला बाक
झुकते घ्यायला शिकवतो

वारस जेव्हा स्पर्शीतात
ते थकलेले मातीमय पाय
नक्कीच पुजनीय असतात
अनुभवाचे गाठोडे असतात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अक्कलकोटी अभंग

*अक्कलकोटी स्वामींच्या चरणी लीन होऊन*

डोळा देखियेले | श्री स्वामी समर्थ |
जीवनाचा अर्थ | कळला गे ||

या अक्कलकोटी | समर्थ श्री स्वामी |
पावन ही भूमी | झाली असे ||

स्वामींच्या चरणी | माथा ठेवियेला |
सारा बोळविला | मी तु पणा ||

सेविला प्रसाद | गोडी अमृताची |
महाप्रसादाची | लागतसे ||

भिऊ तू नकोस | पाठीशी तो आहे|
चिंता मग काहे | तुज असे ||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बडबडगीत

*बडबडगीत*

एकदा एका घरट्यात
पोपट होते चार
नटखट होते भारी
आणि चतुरही फार

एकदा चारी जणांनी
बागेत कुच केली
पेरूच्या पोटाला
हळूच चोच मारली

चोच मारताच त्यांना
पेरू लागला गोड
चार तुकडे करून
एकेक घेतली फोड

मग चारी जणांनी
ढेकर भारी दिला
शिट्टी मारून सगळा
जमाव गोळा केला

गोड गोड पेरूवर
असा प्रसंग घडला
सार्या जमावाने मग
फडशा पेरूंचा पाडला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

बिनदास्त राहा ना जरा

🌹 *बिनास्त राहा ना जरा*🌹

का बसायचं कुडत उडालेत म्हणून रंग
दुःखालाही गुंडाळू चला सुखाच्या संग

छञी सोबत घेतली असली की
पाऊस हमखास मारतो दडी
छञी नसली सोबत घेतली की
तो अंगावर मारणार नक्की उडी
का भीत जगायचं पावसाला?
घ्या अंगावर भिजू द्या जरा अंग

ञास जाणवतो शुगरचा म्हणून
साखरेचं मन का मारत जगायचं
वाढलं जरासं पोट इतभर म्हणून
का माकडउड्या मारून बघायचं
का करायची कपड्यांची काळजी
होऊदे थोडे त्यांनाही अंगाला तंग

सफेद कपडे अंगात घातली की
पक्का चिखल उडणार कपड्यावर
जायचं असेल कुठे गावाला की
पाव्हणे हजर लगेचच वाड्यावर
कुठवर रहायचं स्वतःतच मग्न
होऊन द्या कधीतरी एकाग्रता भंग

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माझी तु

🌹🌹 *माझी तु*🌹🌹

जीव तुझ्यात गुंतला
नाही कशाचेही भान
तुझी सवय ओठाला
नित्य तुझे गुणगान

तुझे मखमली केस
असे वार्यांनी उडती
कंठ कोकिळेचा तुझा
स्वर ह्रुदया भिडती

तुझे चालणे नाजूक
पायी वाजते पैंजण
नाद ऐकताच होई
ह्रुदयात रूणझुण

नाक जणू चाफेकळी
ओठ गुलाब पाकळी
मला सतावन्या भाळी
बटा सोडली मोकळी

वेणी दिसते खुलून
आहे माळला गजरा
मज म्हणोनी आवडे
तिचा चेहरा लाजरा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मानवतेचा हात

*मानवतेचा हात*

उन्हाचा असह्य तडाका
जीव कासाविस तहानेने
पाणी मिळेना कुठेही
काय करावे मुक्त प्राण्याने?

हिंदू गाईला माता मानतो
मुस्लिमांना दूध कुठं आहे वर्ज्य
भुकेला अन्न तहानेला पाणी
हा सगळ्यांचाच आहे फर्ज

तिला सारखेच दोन्हीही
मंदिर असो वा मस्जिद
दूध ती दोघांनाही पुरवते
दिवाळी असो किंवा ईद

मुक्या प्राण्यांना कुठं सांगा
कळतो जात अन् धर्म
फक्त भाईचार्याने राहायाचे
एवढेच जाणतात ते कर्म

फक्त मानुन उपयोग काय?
गोमाता आमची आई
पाण्याविना आजही तडफती
रस्त्यावर कैक बेवारस गाई

भुतदया जे दाखवितात
नसतात कोणत्या धर्माचे
मदत करणारे हात नेहमी
फक्त असतात मानवतेचे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पुन्हा पुन्हा

🌹🌹 *पुन्हा पुन्हा*🌹🌹

प्रेमामध्ये पडावे पुन्हा पुन्हा
तो गुन्हा करावा पुन्हा पुन्हा

टोचले ते काटे विरहाचे तरी
प्रेम फूल तोडावे पुन्हा पुन्हा

नकार तिचा लटकाच असतो
प्रयास तो करावा पुन्हा पुन्हा

भाव खाणे जन्मसिद्ध हक्क
भाव द्यावा तिला पुन्हा पुन्हा

बाहूपाशात यावया अधीर ती
मिठीत घ्यावे तिला पुन्हा पुन्हा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

माझा जिल्हा

*माझा जिल्हा माझी कविता*

जगाची ती माता
तुळजा भवानी
वसली जिथे ती
ती  हीच धरणी

शांततेची शिकवण
धाराशीव लेणीचा
चव एकदा चाखाच
कुंथलगीरी पेढ्याची

महादेवाचे डोंगर
आहेत पहारेकरी
येरमळी येडामाय
सदैव वास करी

नळदुर्ग किल्यातील
तो नरमादी धबधबा
अभेद्य आहोत आम्ही
हे सांगत आहे उभा

गोरोबाकाकांचे तेर
गाव प्रसिद्ध आहे
झरा ज्ञानाचा नित्य
सीना नदीतून वाहे

दुष्काळ,भुकंप
तरी आम्ही नाबाद
एकच जिल्हा तो
फक्त उस्मानाबाद

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*मु.तिंञज,ता-भुम,जि-उस्मानाबाद*
*ldsawant.bligspot.in*

महाराष्ट्र गीत

🚩 *महाराष्ट्र गीत* 🚩

जरिपटक्याचा भगवा झेंडा हा
अटकेपार होता फडफडला
स्वराज्य संस्थापक शिवरायही
सह्याद्रीच्या याच भुमीत घडला

पौरूषत्वाच्या कथा इथल्या
आसेतुहिमाचल लोक वदती
लाख सिकंदरांना गाडून इथे
नेहमीच पुरून उरते ही माती

राजकारण वा समाजकारण
दोन्हीही सुखाने इथे नांदती
पसरवायाला किर्ती जगामधी
शक्ती-युक्ती साथ कार्य साधती

हीच ती माती भिमाची जननी
आगरकर,टिळक,फुले,शाहुंची
काळाकुट्ट पाषाण फोडणाऱ्या
राकट कणखर बलदंड बाहुंची

जात,धर्म बहू वेशभूषा इथल्या
परि मराठी हा मानवधर्म असे
जरी सूर विविध जसे रंग इंद्रधनु
महाराष्ट्र गीत या ह्रुदयात वसे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.bligspot.in*

रांग

🚶🏻🚶🏻🚶🏻 *रांग*🚶🏻🚶🏻🚶🏻

कसं जगायचं हे तूच सांग आता
सगळीकडेच दिसतेय रांग आता

सरकार असायचे आधार आधी
सरकारलाच हवाय आधार आता
जनसंख्या काही कमी नाही इथं
आधार काढायला होती रांग आता

*जीवो* चा नारा फुकटामध्ये आला
पुरा देश सिमसाठी रांगेत उभा झाला
फायदा शोधला जातो फुकटातही हे
पटवणार जनतेला कोण सांग आता

कॕशलेसच्या नावाने नोटाबंधी झाली
पुन्हा गरीब जनता रांगेत उभी केली
कष्टाचा पांढरा पैसा गुंतलाय बँकेत
रांगेशिवाय कोणता पर्याय सांग आता

कटप्पाने बाहुबलीला सांग का मारले?
जीवन-मरणाचा प्रश्न देशाला पडला
तिकीटविक्रीचा अनोखा विक्रम घडला
उत्तर शोधायला पुन्हा आहे रांग आता

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

दुपार

🌞 *दुपार*🔥

होता मध्यान दुपार
लागे अंगाला चटके
कुठे किती शिवणार
आहे नशीब फाटके

फाटलेल्या कपड्यात
बाप उन्हात राबतो
काळ्या काळ्या ढेकळात
जणू नशीब शोधतो

काम करता शेतात
वाहे घामाच्या त्या धारा
नाही आराम माहित
होई श्वास त्याचा खारा

होऊ लागता दूपार
लपे पायात सावली
संगे घेवून न्याहारी
चाले शेतात माऊली

पान हालेना डुलेना
वारा गरम जाहला
नादी लागून उन्हाच्या
त्याची किरणे पियला

पंख दुमडून पक्षी
शांत झाडत बसली
चारा शोधण्याची घाई
नाही राहिली कसली

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

हसावे लागते

😀 *हसावे लागते*😷

हसू नाही वाटले तरी हसावे लागते
बसू नाही वाटले तरी बसावे लागते

जीवन म्हणजे आहे हारजीतचा खेळ
खेळू नाही वाटले तरी खेळावे लागते

कैक निर्णयावरून घ्यावी लागते माघार
वळू नाही वाटले तरी वळावे लागते

हे जीवनच झालयं क्षणोक्षणी रेस
पळू नाही वाटले तरी पळावे लागते

लपावे वाटते मतलबी दुनियेपासून
दिसू नाही वाटले तरी दिसावे लागते

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

उन्हाळी सुट्या

*उन्हाळी सुट्ट्या*

लागल्या सुट्या चला
गाठू मामाचा गाव
आई आणी दादासंगे
पाय घेतात धाव

नवी नवी कपडे
मामा देतो घेवून
राजकुमारी भासे
कपडे मी लेवून

आमरस नि पोळ्या
गरम शेवायाचा भात
मायाळू आजीची मी
आहे लाडाची नात

कैर्या चिंचा पाडायची
गंमत असते भारी
सुरपारूंब्याचा खेळ
सुरू तिथेच झाडावरी

शाळा नाही अभ्यास
नाही क्लासेसचा ताण
उन्हाळी सुट्टी म्हणजे
असते आनंदाला उधान

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अवकाळी

🌧 *अवकाळी*🌧

अवकाळी पावसाची
सर अशी यावी
या तापलेल्या भूईची
तहान भागवावी

अवकाळी पावसाची
सर अशीही यावी
गरम झालेल्या देहासह
मनाची शांती व्हावी

अवकाळी पावसाची
सर अशी यावी
तापलेल्या वार्याची
शीतल झुळूक व्हावी

अवकाळी पावसाची
सर अशीही यावी
झाडेवेली पशुपक्षी
मग आनंदाने गावी

अवकाळी पावसात
तीही अवकाळी यावी
सुकलेल्या या ओठाची
तिने तृष्णा मिटवावी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नको हा उन्हाळा

*नको हा उन्हाळा*

असेल का हो उन्हाचं
काळीज जसं पाषाण
जळू पाहतोय हा देह
नुसती घाशाला तहान

उन्हाळ्याच्या दिवसांत
याचचं चालतयं नाणं
डिग्रीचा वाढलाय भाव
लय शिकलेलं दिसतं बेणं

अशा या उन्हाळ्यामध्ये
घामाच्या वाहत्यात धारा
नको वाटायला लागलाय
तिच्या मिठीचाही सहारा

जरा थंडगार वाटतं म्हणून
ए टि एम शोधावं लागतोय
पैसे काढायचा बहाण्याने
बॕलेन्स चेक करून बघतोय

कधी येईल तो पावसाळा
याची आस लागलीय मना
तिला पुन्हा मिठीत घेण्याचा
मी शोधणार आहे बहाणा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*