आस थेंबांची

🌧 *आस थेंबांची*🌧

आस थेंबांची लावून
धरा केव्हाची बसली
वेळ मिलनाची होता
हळू गालात  हसली

नभ  लागले  गरजू
चिंब  सपान  पडले
निळसर आभाळाला
काळ्या ढगांनी वेढले

वीज चमकेल नभी
अशा झरतील धारा
नादी लागूनीया त्याच्या
होई  ओलसर वारा

तळे, शेतं  भरतील
पूर  नदीला  येईल
पाणी मातीत मुरता
धरा  हिरवी  होईल

मऊ  मऊ  मातीमधी
मग  तिफन  चालेल
कोंब फुटून बियांना
मन  वार्याने  हलेल

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: