दुपार

🌞 *दुपार*🔥

होता मध्यान दुपार
लागे अंगाला चटके
कुठे किती शिवणार
आहे नशीब फाटके

फाटलेल्या कपड्यात
बाप उन्हात राबतो
काळ्या काळ्या ढेकळात
जणू नशीब शोधतो

काम करता शेतात
वाहे घामाच्या त्या धारा
नाही आराम माहित
होई श्वास त्याचा खारा

होऊ लागता दूपार
लपे पायात सावली
संगे घेवून न्याहारी
चाले शेतात माऊली

पान हालेना डुलेना
वारा गरम जाहला
नादी लागून उन्हाच्या
त्याची किरणे पियला

पंख दुमडून पक्षी
शांत झाडत बसली
चारा शोधण्याची घाई
नाही राहिली कसली

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: