शाळा भरणार

*शाळा भरणार*

पुन्हा वाजणार घंटी
शाळा भरली जाईल
पुन्हा इवल्या जीवांना
गट्टी शाळेशी होईल

पुन्हा नवे सवंगडी
डाव वेगळा असेल
हाती प्रत्येकाच्या पुन्हा
पाटी-पुस्तक दिसेल

पुन्हा विटी नि दांडूंना
दिस वाईट येणार
खेळ लगोरीचे पुन्हा
रोज नाही दिसणार

पुन्हा नाही दिसणार
सूर-पारंब्यांचे खेळ
झेपायला विहिरीत
नाही मिळणार वेळ

पुन्हा सुट्टीतली मजा
नाही करता येणार
किल्ला बांधणारे हात
पुन्हा *आई* लिहिणार

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: