लगीनघाई

*लगीनघाई*

आली लगीन सराई
घरा-घरात गोंधळ
लेक जाताना सासरी
मन होतयं वेंधळं

त्याच्या लाडक्या लेकीला
बाप घेतो रूखवत
रूप पाहून साजरं
त्याचं मन सुखावतं

लेक जाणार सासरी
गोळा येई उदराला
माय एकांती असता
डोळा पुसे पदराला

दुःख असताना मनी
भाऊ पञिका वाटतो
ताई होताना परकी
गळी हुंदका दाटतो

लग्न मंडपी उत्सव
मनी वादळ दाटलं
ज्याने जपलं मायेनं
तेच परके वाटलं

गळा आलाय भरून
आता सासरी जायचं
जिथं घेतलाय जन्म
तिथं पाव्हणी व्हायचं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: