गावातील माणुसकी

गावातली माणुसकी

नदी सुकूनीया गेली
गेली विहीर तळाला
दुष्ट दुष्काळाच्या पशू
लागू लागले गळाला

झाड जाहले बोडके
नाही सावली राहिली
पाय भाजता उन्हात
होते जीवाची काहिली

घोटभर पाण्यासाठी
ठरलेली पायपीट
कामधंदा नाही हाता
नाही भाकरीला पीठ

जरी आटले रे पाणी
माणुसकी जीती हाय
पाण्याविना वाटसरू
कधी रिता गेला नाय

गावातलं गावपण
नाही राहिलं रे जरी
माणुसकी जपायचं
भान रूजलेलं उरी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

No comments: