आठवण तुझी येते

*आठवण तुझी येते*

आठवण तुझी येते
तेव्हा काळीज फाटते
दुराव्याचे शल्य माझ्या
सखे उरात दाटते

आठवण तुझी येते
नभी दिसता चांदणं
आठवते तुझ्या सखे
भाळी केलेलं गोंदणं

आठवण तुझी येते
फूल गुलाबी पाहून
वाटे घालावासा पिंगा
आता भ्रमर होऊन

आठवण तुझी येते
थेंब लागताच पडू
आसू जातात भिजून
याला का म्हणावे रडू?

आठवण तुझी येते
दिसताच मयखाना
दोन घोट  पिण्यासाठी
मग मिळतो बहाणा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: