मामाची बैलगाडी
माझ्या मामाच्या गाडीला
छान शुभ्र बैलजोडी
सर्जा राजाच्या साथीने
मामा हाकी बैलगाडी
असो उन्हाळा दिवाळी
मन अतुर जायला
गाडी हाकीत हाकीत
मामा येतसे न्यायला
जोडी सर्जा न राजाची
खूप दिसती सुरेख
रोज राबती शेतात
लय कष्टाळू नी नेक
वाजे घुंगरू गळ्यात
छान पाठीवर झूल
घेती धाव लगबग
जरा मिळता चाहूल
सजलेली बैलगाडी
त्यात मामा गाडीवान
जणू सुखाची पर्वणी
आम्हा वाटे धनवान
गाडीमधी बसायला
वाटे अनोखा आनंद
खूर उडल्या धुळीचा
असे वेगळाच गंध
✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment