प्रवाह

पान-पान झाले ओले
जलमय झाला परिसर
रानोमाळ जलधारांचा
चाललाय मुक्त संचार

काळभोर खडकातून
पाट दुधाचे वाहती
मनमौजी ते शैवाल
नित्य प्रवाहात नाहती

शुभ्र कांतीचा हा प्रवाह
जाई दूरवरती वाहून
कधी ओढा नदीनाला
कधी धबधबा होऊन

सळसळती नागीन
कधी हरणीचे पाय
मन जाईल तिकडे
सैरवैर धावत जाय

खळखळाट येई कानी
पाणी सांगे जीवन रहस्य
नका राहू तुम्ही बंदिस्त 
द्या झुगारूनी सारे दास्य

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: