पाझर

*पाझर*

गेला  संपून  खरीप
तरी  बरसला  नाही
कसा लोपला वरूण
कुठं  दिसतही नाही

हाता तोंडाशी आलेलं
गेलं   पीक  करपुनी 
नाय   पाहावत  शेत
गेलं    भान   हरपुनी

कष्ट झालं मातीमोल
जीव लागेना कशात
माती होताना पिकांची
घास जाईना घशात

बीज   पेरलं  शेतात
कर्ज  बँकेचे  काढून
नाही  पाझर ढगाला
काय   ठेवलं  वाढून

आस डोळ्यांना लागली
बरसेल  आज  उद्या
मग   दुथडी  भरूनी
सुखी  वाहतील  नद्या

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: