डोईवरी मंडवळी

डोई मंडवळी तिच्या

ओठ गुलाबाचे तिचे
नथ  शोभते  नाकात
जणू सौंदर्याची खाण
रूप  साजरे  लाखात

किती  रेखीव  भुवया
तिच्या काजळ डोळ्यात
सोनसळी दागिण्यांचा
साज शोभतो गळ्यात

हातावरी  मेहंदीत
नाव सख्याचे कोरले
शुभ मंगल होताच
बांधणार तो डोरले

चंद्रकोर  शोभतीय
भाळी भुवयांच्या मंधी
आज झालीय नवरी
होती सानुली जी आधी

डोई मंडवळी तिच्या
बिंदी मस्तकी शोभते
भविष्याच्या स्वप्नांना ती
अशी शुन्यात शोधते

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

गर्द हिरव्या पानात

गर्द हिरव्या पानात

गर्द   हिरव्या पानात
आंबा पाडाचा पाहून
चोच मारायला जोडी
येते  राघूंची   धावून

गर्द  हिरव्या पानात
जोडी हिरवी रावाची
लालेलाल चोचीने ते
रस चाखती कवाची

गर्द हिरव्या पानात
आंबे लपलेले जणू
रस चाखताना राघू
लागे  गीत  गुणगुणू

गर्द हिरव्या पानात
येई  कवडसे छान
खेळ ऊन सावलीचा
जरा हालताच पान

गर्द हिरव्या पानात
किती चैतन्य दिसते
वसंताच्या चाहूलीने
सृष्टी  आनंदे हसते

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

निकाल

निकाल

जाता  संपून परीक्षा
जीव पडतो भांड्यात
येता निकालाचा दिस
मन पडते कोड्यात

ज्यांनी केली मेहनत
फळ त्यांनाच मिळते
कोण किती पाण्यामधी
निकालाने ते कळते

कतृत्वाला शबासकी
देत आसतो निकाल
मानहानी  करणारी
नको आळशी ती चाल

कोणी अपयशी होता
नका जाऊ रे खचून
जग जिंकायचे आहे
सांगा साऱ्यांना टिच्चून

आहे निकाल सांगत
रोज करावा अभ्यास
संकटाशी दोन हात
करण्याचा घ्यावा ध्यास

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

लाखात एक

लाखात एक

तिव्र उन्हाळ्याच्या झळा
पोळू लागल्या अंगाला
माथी  मारली  गरिबी
नाही  देव  तो  चांगला

देह  उगडाच  माझा
रानी चारताना शेळी
जीव इवलासा जरी
आहे दैवाचीच खेळी

दोन्ही टेकले गुडघे
पाणी घ्यावया मुखात
माझे प्रतिबिंब तिथे
एक दिसते लाखात

पाणी हे जलाशयाचे
मज भासते नितळ
मिटे तहान जीवाची
जरी असेल उथळ

झाले शरीर काटक
राना- वनात राहून
काळासवे पाण्यासम
जावे दुःखही वाहून

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

प्रेमाने जग जिंका

प्रेमाने जग जिंका

सुंभ जळून जातो तरी
सुटला जात नाही पीळ
गाठी मनात बांधल्या की
विकासाला बसते खीळ

मी मोठा मीच हुशार
मी पणात सरते वय
अंती मात्र हिशोब होतो
नसतेच तिथे हयगय

थोड्या थोडक्या यशाने
हुरळून नसते जायचे
काय राहते शेवटी इथे
शब्द गोड बोलायचे

नाही काहीच श्वाश्वत
तरी कसला अहंकार
मिळून मिसळून जग
कशाला शब्दांचे वार?

चार दिस सासूचे जरी
सुनेचेही असतात चार
प्रेमाने जग जिंकता येते
आता तरी कर विचार

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

भूक

भूक

बाजार अस्तित्वाचा भरला होता
आपापल्या परीने प्रत्येकजण
जगण्याचा प्रपंच मांडत होता
बाजाराच्या अगदी मधोमध
झेंड्यांचा ठेला मांडलेला होता
प्रत्येक धर्माच्या जातीच्या रंगाचे
वेगवेगळ्या आकाराचे झेंडे
अगदी रूबाबदार दिसत होते
आपापल्या जाती-धर्म-पंतानुसार
खरेदी होत होते विविध झेंडे
जणू झेंड्या-झेड्यात माणूस
विभागला होता एकजुट विसरून...
झेंडा विकणारा मात्र निर्विकार...
कुठलाच रूबाब नाही...
कोणताच आततायीपणा नाही....
फक्त झेंडे विकण्यात मग्न झालेला...
हटकलेच जाऊन त्याला मी...
सांग कोणता तुझा धर्म,कोणती जात?
रंगलास सांग तू कोणत्या रंगात?
सहज बोलून गेला..मात्र धडा शिकवला
*भूक* हाच माझा धर्म,हीच माझी जात...
शोधलेच नाही अद्यापही मला मी
नेमका रंगलोय कोणत्या रंगात..
सांगा साहेब तुम्हीच आता...
भूकेला असतोय का कुठला धर्म?
जगण्याशी लढाई माझी तेच माझं कर्म
जगण्याशी लढाई माझी तेच माझं कर्म

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

शानदार गोष्ट

बालकविता

शानदार गोष्ट

माझ्या वर्गातील मुलं
रोज रोज हट्ट धरतात
ऐकायची नवीन गोष्ट
मागणी सुरात करतात

ऐके दिवशी मिही त्यांना
सांगितली नवीन गोष्ट
गोष्टीच्या त्या टपालाला
नव्हतचं कुठलं पोस्ट

सांगतो म्हटलं गोष्ट पण
राहायचं तुम्ही सगळे दक्ष
उत्तर जो देईल तोच असेल
इथं सगळ्यामधी चाणाक्ष

आटपाट नगरीमध्ये
दोन मित्र राहायचे
सांगू आणि नकासांगू
लोक त्यांना म्हणायचे

दोघांचेही  लग्न  झालते
बायका होत्या छान छान
जंगलात जाऊ फिरायला
सगळ्यांनीच केला प्लॕन

जंगलात येता सारेजण
लागले गंमतीजमती करू
आनंदाने गाणी म्हणत
तालावर नृत्य लागले करू

चौघेच होती जंगलात
त्यांना सिंह दिसला दुरून
कळेना कोणाला काही
सगळेच गेले घाबरून

ऐका मुलांनो ध्यान देवून
तिथं गोष्ट अनोखी घडली
सांगा चढला झाडावरती
बायको सांगाचीही चढली

नकासांगाचीही बायको
झाडावर चढली पटकन
सांगा बरं झाडाखाली
आता राहिलं असेल कोण?

चटकन बोलले विद्यार्थी
*नकासांगू* राहिला खाली
खर सांगतो तुम्हाला आता
तिथच चूक त्यांनी केली

मिही म्हणालो त्यांना मग
आता नाहीच गोष्ट सांगत
तुम्हीच बोलले नका सांगू
बसा गोष्टीची वाट बघत .....

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

मामाची बैलगाडी

मामाची बैलगाडी

माझ्या मामाच्या गाडीला
छान   शुभ्र   बैलजोडी
सर्जा राजाच्या साथीने
मामा   हाकी   बैलगाडी

असो उन्हाळा दिवाळी
मन  अतुर  जायला
गाडी हाकीत हाकीत
मामा येतसे न्यायला

जोडी सर्जा न राजाची
खूप  दिसती  सुरेख
रोज  राबती  शेतात
लय  कष्टाळू नी नेक

वाजे घुंगरू गळ्यात
छान  पाठीवर झूल
घेती  धाव  लगबग
जरा मिळता चाहूल

सजलेली  बैलगाडी
त्यात मामा गाडीवान
जणू सुखाची पर्वणी
आम्हा  वाटे  धनवान

गाडीमधी बसायला
वाटे अनोखा आनंद
खूर उडल्या धुळीचा
असे वेगळाच गंध

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

एप्रिल फूल

एप्रिल फूल दिनानिमित्त
बरेच जण जाहले फूल
माणसात नव्हते जे कोणी
आज मात्र राहिले कूल

कुठे बायकोने नवऱ्याला
कुठे नवऱ्याने बायकोला
कुठे काकांनी काकुला
कुठे काकुंनी काकाला
आजोबांनीही आजीला
आजींबाईनी आजोबाला
प्रयकराने प्रियशीला
प्रयशीनेही प्रियकराला
शब्दांनीच शब्दांची दिली हूल
बनवले एकमेकांना फूल

आज मुर्ख होण्यापेक्षाही
फूल होण्यात जास्तच रूची
अर्थ जरी एक तरीही
सन्मान पडणार नव्हता खर्ची
एक मात्र नक्की होतं
आपल्याच ओळखीतल्या
आपल्याच माणसांनी
आपल्याच मित्रमैत्रिणींनी
एकमेकांना बनवले आहे
आजच्या दिनी एप्रिल फूल

लक्ष्मण दशरथ सावंत

गावातील माणुसकी

गावातली माणुसकी

नदी सुकूनीया गेली
गेली विहीर तळाला
दुष्ट दुष्काळाच्या पशू
लागू लागले गळाला

झाड जाहले बोडके
नाही सावली राहिली
पाय भाजता उन्हात
होते जीवाची काहिली

घोटभर पाण्यासाठी
ठरलेली पायपीट
कामधंदा नाही हाता
नाही भाकरीला पीठ

जरी आटले रे पाणी
माणुसकी जीती हाय
पाण्याविना वाटसरू
कधी रिता गेला नाय

गावातलं गावपण
नाही राहिलं रे जरी
माणुसकी जपायचं
भान रूजलेलं उरी

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

महाबलशाली हनुमान

महाबलशाली हनुमान

महापराक्रमी| महाबलवान|
महाधैर्यवान | हनुमंत ||

सर्वशक्तीमान | केशरी नंदन |
संकटमोचन | अंजनेय ||

लन्किनी भंजन | सर्व रोगहारा |
सर्व दुखःहारा | महाकाय ||

वानर नायक | अंजनीचा सुत |
रामाचा तो दूत | बजरंगी ||

बजरंगबली | कंचन बरन |
शंकर सुवन | महावीर ||

लंका विदायक | दैत्यकुलान्तक |
सर्वयन्त्रात्मक | वज्रकाय ||

अमित विक्रम | उदधिक्रमण |
शोक विनाशन | महारूद्र ||

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कैं.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

आता फक्त लढायचं

आता फक्त लढायचं

नको फासी घेऊ राजा
आता फक्त  लढायचं
भले येतील संकटे
नाही कधी रडायचं

हमी नाहीच भावाची
तरी उत्पन्न घ्यायचं
नाही निसर्गाची साथ
तरी पेरीत राह्यचं

कर्ज मानगुटी जरी
नाही मोडून जायचं
फास सावकारी सारे
दूर फेकून द्यायचं

हवे हक्काचे आम्हाला
  हिंमतीने सांगायचं
समृद्धीला साऱ्यांनीच
  वेशीवर टांगायचं

हातामधी हात घेत
हक्कासाठी लढायचं
मोर्चा निमित्त रे फक्त
अन्यायाशी भिडायचं

लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

परीक्षा

📝 परीक्षा 📝

अरे परीक्षा परीक्षा
बंद कुदणं खेळणं
पुस्तकाच्या पानांची रे
होते वाचून चाळणं

अरे परीक्षा परीक्षा
घोर जीवाला लागतो
अभ्यासाला परीक्षार्थी
रातं-दिवस जागतो

अरे परीक्षा परीक्षा
फेल कोण पास कोण
जणू विस्तवामधूनी
निघे चकाकून सोनं

अरे परीक्षा परीक्षा
नाही डोळ्याला रे डोळा
नको वाटतो सर्वांना
निकालात रे भोपळा

अरे परीक्षा परीक्षा
जणू जीवनाचे अंग
जावे तरून सागर
सारे बांधताती चंग

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in