लेख- मी पुतळा बोलतोय

मी पुतळा बोलतोय

"काढून जुना आत्ताच, माझ्या गळा घातलाय हार
पुन्हा पुन्हा या उतळ सत्काराचा सोसवेना भार"
     होय,मी पुतळा बोलतोय. निश्चलपेक्षा असंवेदनशील,समोर अत्याचार होत असताना रक्त गोठवून बर्फासारखा? छे! बर्फ गरम झाल्यावर पाणी सळसळत वाहते तरी. बर्फासारखा नव्हे तर दगडासारखा असंवेदनशीलतेने पाहत बसणारा. होय दगडच मी. जाती-जातीत दंगल पसरत असताना, धर्मा-धर्मात मलाच वाटून घेतले जात असताना, माझ्याच लेकींची खुलेआम इज्जत लुटली जात असताना,सुधारलेच्या नावाने भ्रष्टाचारात बरबटलेले,ओंगळवाणे अंगप्रदर्शन करत, किळसवाणे धांगडधींगा नृत्य करत व बिनलाज्यावाणी मदिरा प्राशन करून बेजबाबदारपणे हातवारे करत असताना,आयाबहिणींवर टाकलेले हात ज्यावेळी माझ्या जयंती- पुण्यतिथी निमित्ताने मला हार घालायला सरसावतात, वाटते यावे बाहेर या दगडामातीच्या देहातुन, अन् वाजवून द्यावी जळजळीत कानशीलात सुधारायचा प्रकाश पाडण्यासाठी किंवा दिवसाच तारे दाखवण्यासाठी नाहीतर वाटते माझ्याच ठिकर्या ठिकर्या करून छिन्न छिन्न करावे वाटते यांच्या डोक्यांची..माझ्या या दगडी देहापासून बनवावी वाटतात धारदार हत्यारे अन् छाटावी वाटतात शीरं धडापासून कायमसाठी.......होतो जरी शांतीचा पुजक मी.
    लाज वाटते माझ्याच पुढच्या पिढीची, वाटते उगाच पडलो समाज सुधारणा, देश स्वातंत्र्य करण्याच्या भानगडीत, उगाच आटवत बसलो रक्त यांच्या भलाईसाठी..अन् पसरवत बसलो विचार मनामनाला जागृत करणारे...अरे या मानव जातीपेक्षा मला ते मर्कटं, कावळे चिमण्या चांगल्या वाटतात...निदान ते दररोज येऊन विष्टा तरी करतात या दगडावर अन् करतात चिवचिवाट निस्वार्थीपणे...पण तुम्ही माञ निमित्त शोधता मला पुजनाचे, हार घालण्याचे....माझ्या सोहळ्याचे. दररोज बसणारा गुन्हेगाराचा धुराळा झटकायला येतात माझ्याकडे  पांढरे शुभ्र वसने नेसून परंतु आत दाटलेला काळकुट्ट भ्रष्टाचार कधी धुतलाच जात नाही....
   आज जरी महान असलो मी, पुतळा होण्याइतका तरी उद्या काय सांगावे माझे विचार पटतीलच सर्व लोकांना म्हणून? नाही पटले तर कोण सांगावे तोडतीलही मला काही माथेफिरू..अन् पसरेल दंगा परत माझ्या विसर्जनावरून..विचार बाजूला सारून माझे, सारून कशाला? माझ्या विचारांना मुठमाती देऊन लढतील, मुडदे पाडतील...
  खरच कंटाळा आलाय मला या पुतळेपणाचा..वाटलं घेतील प्रेरणा माझ्या कार्याची म्हणून होतो हरकलो,सुखावलो होतो मिळेल कोणीतरी आपल्या विचारांचा पाईक म्हणून ...पण व्यर्थ! माझी कथा?(व्यथा)  ऐकून नका हलवू माझ्या जागेवरून मला.नाहीतर तुम्हालाही ठरवतील ते माथेफिरू..फोडतील तुमचेचा डोके ..फक्त एकच विनंती आहे परत नका उभा करू माझे ,कोणाचेही पुतळे..उभरता आला तर फक्त विचारांचा पुतळा उभा करात स्वतःच्या मनात चिरंतन🙏🏻

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *hindhsher99@gmail.com*

भारत राष्ट्र महान

    भारत राष्ट्र महान

एका धाग्यात गुंफले मोती
माला एकतेची सुंदर छान
सान-थोर नाही कोणी इथे
समान सर्व सांगे संविधान

राबती अविरत लाखो हात
या देशाची उंचावण्या मान
प्राण अर्पुणी रक्षण करती
सैनिकांचा करूया सन्मान

जाती-धर्म विसरून जाऊ
बंधु-भावाची ठेवूया जाण
संकट येता या देशावरती
तळहातावर घेऊया प्राण

अंधश्रद्धेवर मात कराया
जवळ ठेऊयात ते विज्ञान
जगावर या राज्य करण्या
समृद्ध होऊया घेऊन ज्ञान

या परंपरेचे होऊन पाईक
वाढवूयात देशाची शान
हाती घेऊया हात आणि
करूया भारत राष्ट्र महान

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बाप


               बाप

पोसताना जीव सारे थकलाय बाप माझा
झेलताना ऊनवारा झुकलाय बाप माझा

व्यापाराच्या दारामंधी खेटा त्या किती वेळा
वीकताना पोतं पुन्हा वाकलाय बाप माझा

गुडघाभर पाण्यामंधी वाकून रोप लावताना
बोलु किती चीखलाने माखलाय बाप माझा

फाटलेला अंगात घातलेला नेहमी बंडी त्याने
दोन चींध्या लेवुनीही झाकलाय बाप माझा

देशाची उत्पादनात ठेवली सदैव उंच मान
राबताना पाठिमंधी वाकलाय बाप माझा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

झीज

*झीज*

सुरकुत्या चेहऱ्यावर
शिवल्या नाही मनाला
झीजला देह मायचा
जुंपून संसार घाण्याला

बाळंतपणातच तिचा
जन्म दुसरा झाला होता
घरटं सुंदर रचायला
जीव पुरा खर्चीला होता

निवांत आजारी पडणं
कधीच जमलं नाही
अंगावरच काढलं तिने
इलाजाची गरज नाही

उपाशी राहू नये कोणी
म्हणून दिसभर खपायची
नको नाराजी कोणाची 
मनं सर्वांचीच जपायची

आज थकलीय फार ती
शुभ्र केस तिचे सांगतात
पायांना सोसवेना भार
भुईला धरूनी रांगतात

वाळलेलं पान आज
सावली देवून थकलयं
झीजलयं आयुष्यभर
मावळतीला झुकलयं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

चार गोष्टी जीवनाच्या

*चार गोष्टी जीवनाच्या*

कामातुन काढून वेळ
आज घेतोय जवळ तुला
चार गोष्टी जीवनाच्या
सांगयच्यात माझ्या फुला

कळी जशी गुलाबाची
उमललीस माझ्या पोटी
किती होते अतुर मन
त्या नाजुक हास्यासाठी

रांगताना पाहून तुला
मी जायचो लहान होऊन
नेञ माझे सुखायचे
तुझे इवलेशे खेळ पाहून

कामाचा हा भार जरी
हळूच पाहतो चोरून तुला
चार गोष्टी जीवनाच्या
सांगायच्यात माझ्या फुला

कळीवाणी नाजुक जरी
सुगंधी फुल तुला व्हायचंय
तार्यांनाही पडेल मर्यादा
इतकं उंच तुला जायचंय

वाटेत येतील काटे कैक
त्यांना तुडवत तुला जायचंय
उंच उडताना आकाशी
नातं  जमिनीशी जोडायचंय

बोलेन म्हणतो खूप
कुशीत घेईन म्हणतो तुला
चार गोष्टी जीवनाच्या
सांगायच्यात माझ्या फुला

आई तुझी राणी जरी
बाबाही गोड आहे बाळा
काळा रंग त्याचा तरी
ज्ञानदान करतोच फळा

घरट्यातुन जाताना दूर
आठवणीत राहूदे ग बाबा
सुंदर दृश्य रचायला जो
नेहमीच पडद्यामागे उभा

भरारी तु घ्यावी म्हणून
या हातांनी  केलाय झुला
चार गोष्टी जीवनाच्या
सांगायच्यात माझ्या फुला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

दिवस जोंधळ्याचे

*अष्टाक्षरी-दिवस जोंधळ्याचे*

माझ्या हिरव्या शेतात
कोण ही जादू करून
शुभ्र टपोर्या दाण्यांनी
आलं कणीस भरून

कसं बाई सांगू तुम्हा
आसं नवल घडलं
ज्वारीच्या पोटामधून
मोती बाहेर पडलं

लागे निखारे पेटाया
भर दिवसा शेतात
हुरडा खाण्याची सर्वां
एक लालसा मनात

झुंड झुंडीत पाखरे
मारू घिरट्या लागले
किती हाकलले तरी
येऊ माघारी लागले

हे दिवस जोंधळ्याचे
खूप असती कामाचे
शेतात राबणार्यांच्या
जणू असती घामाचे

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

सुखाच्या शोधात

*सुखाच्या शोधात*

धावतो सुखाच्या शोधात
सकाळपासून राञीपर्यंत
पछाडले जरी किती वेळा
परी दुःखाला नाहीच अंत

श्रीमंत मानव नेहमी मला
सुखात असतो वाटायचा
तोही संपत्तीच्या चिंतेने
निद्रानाश ग्रस्त भेटायचा

दगडाच्या देवळातही मी
होते पाहिले सुख धुंडाळून
पालनकर्ता दुःखी होता
कापडात ठेवलेला गुंडाळून

जंगलातील तो मोरही कुठं
नेहमी सुखात राहिलाय?
एक डोळा कावळ्याचा मी
एकांतात रडताना पाहिलाय

छोट्या गोष्टीत आनंद शोध
भविष्य कोरण्यात नाही सुख
अंगाएवढेच अंथरून हवे
पोटाच्यावर नसावीच भूक

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शिक्षणाची वारी २००७

शिक्षणाची वारी गीत, औरंगाबाद २०१७
(चाल- विठ्ठल विठ्ठल)

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*

प्रगत प्रगत प्रगत प्रगत
प्रगत प्रगत प्रगत प्रगत

ज्ञानाची इच्छा जागृत झाली
ज्ञानपंढरी ही आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा उन्हामंधी ही ज्ञानसावली
प्रगत होण्या वारीला निघाली
तुझ्या नामघोषात शिक्षक सारी

साविञी साविञी सावित्री सावित्री
साविञी साविञी विद्या माऊली

भिडे आसंमंती ध्वजा शिक्षणाची
गुरूमंडळी आज नादावली
रचनावाद मनी तंत्रज्ञान ध्यानी
ज्ञानाला दिशा ही नवी मिळाली
जरी साविञी जगाची परी तू
आम्हा लेकरांची विद्या माऊली

साविञी साविञी साविञी साविञी
साविञी साविञी कृपा तुझी

राष्ट्र प्रगत करण्या झटतो रांञदिनी
घेतला शासनानी वसा
अभियानातूनी साद येते तुझी
दावते शिक्षणाला दिशा

लोकवर्गणी किती, स्वखर्च अगणती
ज्ञानरचनावादाने रंगल्यात शाळा
कृतीयुक्त अभ्यास आनंददायी शिक्षण
विद्यार्थ्यांना शाळेचा लागला लळा

आज हरपलं देहभान, जीव झाला ज्ञान भुकेला
वेचण्या गा ज्ञानकंद वारीत धावला हकेला

भिडे आसमंती ध्वजा शिक्षणाची
गुरूमंडळी आज नादावली
रचनावाद मनी तंञध्यान ध्यानी
ज्ञानाला दिशा नवी मिळाली
जरी सावित्री जगाची परी तू
आम्हा लेकरांची विद्या माऊली

साविञी साविञी साविञी साविञी
साविञी साविञी विद्या माऊली

प्रगत प्रगत प्रगत प्रगत
प्रगत प्रगत प्रगत प्रगत

चालली पालखी जाहलो अधिर कराया प्रगत शाळेला
गणित संबोध करूया स्पष्ट वापरून शतक माळेला
संगणक साक्षर होऊया मैत्री करून तंत्रज्ञानाशी
मनोरंजनातुनी शाळाबाह्यांचे नाते जोडूया शाळेशी
वारीत सामील व्हावे आता व्हावया तू ज्ञानदाता
साक्षर करून सकला उंचावया उंच तो माथा

सावित्री सावित्री सावित्री सावित्री
सावित्री सावित्री गुरू माझी

प्रगत प्रगत प्रगत प्रगत
प्रगत प्रगत प्रगत प्रगत

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पहिलं प्रेम

*प्रेम पहिले*

पहिल्याच भेटीत तिने
ह्रुदयाला केला स्पर्श
आचंबल मन जरी तरी
काळजात झाला हर्ष

पहिल्या नजरेतच तिने
माझा केला होता गेम
लगेच वाटले मला तेव्हा 
जडले तिच्यावर प्रेम

तिच्या छोट्या गोष्टीतही
मन माझं बसू लागलं
समोर येईल त्या वस्तुत
रूप तिचचं दिसू लागलं

काळजात थेट घुसायचा
तिच्या नजरेचा तो बाण
वाहत चाललोय का मी?
नव्हते कसले तेव्हा भान

चिंचा,बोरे,आंबे नि कैर्या
तोडल्या किती तिच्यासाठी
जवळीक वाढण्यासाठी मी
वाढवत राहायचो गाठीभेठी

तिने माळलेला सुंदर गजरा
लगेच नाकात दरवळायचा
तिला एकवार पाहण्यासाठी
हा जीव वेडापीसा व्हायचा

संपलं कॉलेज स्वप्न विरलं
जखम झाली काळजाला
एकजीव होण्या आधीच
काळानेच घातला घाला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

जीवन सुंदर आहे

*जीवन सुंदर आहे*

नकोच नेहमी नकारघंटा
सरळमार्गी जगणं सोड
ताठ कणा हवाच कशाला
चार प्रेमाची माणसं जोड

चूरगळतील आज थोडी
ठेवणीतील कापडं तुझी
खुलतील नाजूक कळ्या
हास्याची तु चादर ओढ

कधीतरी चाल ना जरासा
वाट खचखाळग्याची तु
कशाला हवाय नेहमीचा
तो मऊशार डांबरट रोड

जीवन खरच सुंदर आहे
छोट्या गोष्टीत सुख शोध
माती सोडूनही हरभर्याला
गाठोड्यातही येतात मोड

चिखलात घसरू दे जरा
सॉक्समधला पाय तुझा
मुलायम राहायची त्याची
नेहमीची ती खोड मोड

सारखं नको सत्य ते तुझं
थोडासा तु चुकून बघ
जीवन सुंदर आहे राजा
साधेपणाशी नाळ जोड
साधेपणाशी नाळ जोड

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

मीच पुसली जात

मानवधर्म पुरस्कर्ता रोहन व शिक्षक वाळके गुरूजी यांना समर्पित

*मीच पुसली जात*

धर्म-अधर्म उच्चनिच
यावर करतोय मात
खरं सांगतोय गुरूजी
मीच पुसलीय जात

समानतेचे धडे तुम्हीच
गुरूजी आम्हा शिकवता
हजेरीवरती जाती तुम्ही
माञ वेगवेगळ्या लिव्हता

धर्मनिर्पेक्षता, मानवता
मुल्य किती मौल्यवान
शिकविता तुम्ही नेहमी
याची ठेवायला जाण

एकच पुर्वज सर्वांचा
इतिहास आम्हा सांगतो
जातीजातीत दंगा मग
का बर रोजच रंगतो?

हा भारत माझा देश आहे
अन् भारतीय माझे बांधव
जातीचं विष कोठून येतं?
कसं काय घडतय तांडव

जाती रूपी या सर्पाला
कायमचाच ठेचनार आहे
मस्तकावरती ठेवून पाय
थयथय मी नाचनार आहे

जातीत गुंतलेल्या बुद्धीवर
मी करणारच आहे मात
म्हणूनच सांगतोय गुरूजी
मी पुसून टाकलीय जात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शौचालय जनजागृती

स्पर्धेसाठी-
*शौचालय एक जनजागृती*

कशाला करायची सांग
लग्नाची नुसती घाई?
उगड्यावर जायच का
शौचालय घरी नाही?

लाडाची मी लेक अशी
उच्च शिक्षण झालेली
शील मौल्यवान आहे
याची जाणीव झालेली

तु ही शिक्षित आहेस
मग उगड्यावर का?
सर्पदंशाची ती भिती
तुला वाटत नाही का?

रोगराई निराळीच
बाहेर गेल्याने होते
असलेली इज्जतही
मातीमधे मिसळते

तुम्ही पुरूष मंडळी
वेळ मारून नेतात
सकाळ नि संध्याकाळ
आम्ही असतो पेचात

सरकारी आदेशाला
आता तरी होय भर
शौचालय बांधायचे
आता तरी काम कर

लग्नाच्या सप्तपदीत
आठवी फेरी असावी
संडासाच्या ईमारती
दारी प्रत्येक दिसावी

स्वच्छ परीसर तर
विचार स्वच्छ असेल
रोगमुक्त परीवार
आजूबाजूला दिसेल

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माते साविञी

🙏🏻 *माते साविञी*🙏🏻

युगायुगाच्या मनुविरूद्ध
भक्कम उभी ठाकलीस
चिखल-शेन-शिव्या किती
कशाला नाही झुकलीस

तुझ्या प्रखर ज्योतीने
किती उजळल्या पणती
मनातील हटवण्या तम
सरसावल्या मग वाती

लेकी होत्या सार्या तेव्हा
आज्ञानाच्या अंधकारात
शापमुक्त केलेस माते तु
स्वतःला राबवून उन्हात

माते तुझ्या लेकी आता
उंच गगनभरारी घेतायत
प्रतिकूल परिस्थितीशी
दोन हात त्या करतायत

सावित्री तुझ्याविना कधी
कोणी दुःख नसते वेचले
*मनु* विचार वाल्यांचे मग
कान नसते कोणी टोचले

तुझ्या दृढ निश्चयापुढती
ते पाहत बसले गुमान
तुझ्या कतृत्वाला माते
माझे कोटी कोटी प्रणाम

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

गणित संबोध कार्यशाळा

*अहवाल लेखन १ला दिवस*

गटनिर्मितीसाठी इथं
चिट्टी होती काढली
माझ्या गटात कोण?
ही उत्सुकता वाढली

गटागटात कार्य मग
विभागले गेले होते
तोपर्यंत सर्वांशी सर्वांचे
परिचय झाले होते

नाईक सरांनी कार्यशाळेत
शोधली युक्ती नामी
प्रस्ताविकेची माहिती
चर्चीली आमची आम्ही

भाषा विषय सोपा असतो
गणिताचा का होतो बाऊ?
चला गड्यांनो कार्यशाळेतुन
याचे उत्तर शोधून पाहू

डाव्या हाताने लेखन करणे
अवघडच वाटले भारी
नाजूक हाती देताना पेन
म्हणावे वाटले सॉरी

गणिती साहित्यात
रमले होते गुरूजन
हाताळताना साहित्य
आनंदलं होतं मन

उत्सुकता उद्याची वाढवून
आजचा दिवस गेला
कृतीयुक्त कार्यशाळेतुन
संबोध स्पष्ट होत गेला

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

शेती आणि शेतकरी

खडकाळ भुईवर
सोनं ओतलं ओतलं
एवढीच आशा मनी
उद्या पिकेल चांगलं

रांञदिवस शेतात
बाप राबतो राबतो
सुखी जगण्याचे स्वप्न
आत मनात दाबतो

जगाला पोसविण्याचा
वसा घेतला घेतला
फाटकीच बंडी,नवा
कधी सदरा घेतला?

नाही कुणाची तक्रार
नाही उदास उदास
माय चुल्हा पेटविती
बाप खातो दोन घास

जगाच्या कल्याणासाठी
जन्म वाहीले वाहीले
शेती आणि शेतकरी
उपेक्षितच  राहीले

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.फ.केंप्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in