झीज

*झीज*

सुरकुत्या चेहऱ्यावर
शिवल्या नाही मनाला
झीजला देह मायचा
जुंपून संसार घाण्याला

बाळंतपणातच तिचा
जन्म दुसरा झाला होता
घरटं सुंदर रचायला
जीव पुरा खर्चीला होता

निवांत आजारी पडणं
कधीच जमलं नाही
अंगावरच काढलं तिने
इलाजाची गरज नाही

उपाशी राहू नये कोणी
म्हणून दिसभर खपायची
नको नाराजी कोणाची 
मनं सर्वांचीच जपायची

आज थकलीय फार ती
शुभ्र केस तिचे सांगतात
पायांना सोसवेना भार
भुईला धरूनी रांगतात

वाळलेलं पान आज
सावली देवून थकलयं
झीजलयं आयुष्यभर
मावळतीला झुकलयं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: