*चार गोष्टी जीवनाच्या*
कामातुन काढून वेळ
आज घेतोय जवळ तुला
चार गोष्टी जीवनाच्या
सांगयच्यात माझ्या फुला
कळी जशी गुलाबाची
उमललीस माझ्या पोटी
किती होते अतुर मन
त्या नाजुक हास्यासाठी
रांगताना पाहून तुला
मी जायचो लहान होऊन
नेञ माझे सुखायचे
तुझे इवलेशे खेळ पाहून
कामाचा हा भार जरी
हळूच पाहतो चोरून तुला
चार गोष्टी जीवनाच्या
सांगायच्यात माझ्या फुला
कळीवाणी नाजुक जरी
सुगंधी फुल तुला व्हायचंय
तार्यांनाही पडेल मर्यादा
इतकं उंच तुला जायचंय
वाटेत येतील काटे कैक
त्यांना तुडवत तुला जायचंय
उंच उडताना आकाशी
नातं जमिनीशी जोडायचंय
बोलेन म्हणतो खूप
कुशीत घेईन म्हणतो तुला
चार गोष्टी जीवनाच्या
सांगायच्यात माझ्या फुला
आई तुझी राणी जरी
बाबाही गोड आहे बाळा
काळा रंग त्याचा तरी
ज्ञानदान करतोच फळा
घरट्यातुन जाताना दूर
आठवणीत राहूदे ग बाबा
सुंदर दृश्य रचायला जो
नेहमीच पडद्यामागे उभा
भरारी तु घ्यावी म्हणून
या हातांनी केलाय झुला
चार गोष्टी जीवनाच्या
सांगायच्यात माझ्या फुला
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment