जीवन सुंदर आहे

*जीवन सुंदर आहे*

नकोच नेहमी नकारघंटा
सरळमार्गी जगणं सोड
ताठ कणा हवाच कशाला
चार प्रेमाची माणसं जोड

चूरगळतील आज थोडी
ठेवणीतील कापडं तुझी
खुलतील नाजूक कळ्या
हास्याची तु चादर ओढ

कधीतरी चाल ना जरासा
वाट खचखाळग्याची तु
कशाला हवाय नेहमीचा
तो मऊशार डांबरट रोड

जीवन खरच सुंदर आहे
छोट्या गोष्टीत सुख शोध
माती सोडूनही हरभर्याला
गाठोड्यातही येतात मोड

चिखलात घसरू दे जरा
सॉक्समधला पाय तुझा
मुलायम राहायची त्याची
नेहमीची ती खोड मोड

सारखं नको सत्य ते तुझं
थोडासा तु चुकून बघ
जीवन सुंदर आहे राजा
साधेपणाशी नाळ जोड
साधेपणाशी नाळ जोड

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: