आजच कर

*जे करायचे ते आजच कर*

जे करायचे ते आजच कर
व्यर्थ भय ना तू मनात धर

जुलूमी शृंखला तोडून टाक
अन्यायापुढे नको झोळेझाक
एक मरताच उठतील लाख
युद्ध लढण्याची तयारी कर

मीच का? हा नको विचार
एकटाच जरी तू कर प्रहार
धर  हाती  ती  शूर तलवार
तव शौर्याची येऊ दे रे लहर

कसला धर्म नी कसली जात
बंद कर  तू तो अंध रक्तपात
संपवायला  ती  अंधारी रात
दिवा न्यायाचा आता उंच धर

नसानसात रक्त सळसळू दे
लाट क्रांतीची मनी उसळू दे
शौर्यकिर्तीचा सुगंध दरवळू दे
ना तरी हा देह आहेच नश्वर

कुठवर शब्दद्वंद्व चालू द्यावे
कुठवर युद्ध टाळून ध्यावे
शिवरायांचे  वंशज आपण
लढण्या सदैव तत्पर रहावे
हाती असो खडग् वा कंकर

हसत झेलले ज्यांनी विरमरण
शुरविरांचे त्या तू कर स्मरण
जयगाथेने चढू दे तव स्फुरण
वेळ  हीच रे होण्याची अमर

No comments: