त्याच्याविना दिवाळी

*त्याच्याविना दिवाळी*

तिच्या ओल्या पापण्यांना
त्याची  आठवण  झाली
त्याच्याविना दिवाळीला
घर  वाटे  खाली  खाली

देशासाठी सीमेवर
तिचा लढणारा सखा
तिचा असूनही होता
तिच्यासाठी तो परका

असो दिवाळी दसरा
येणे जमतच नाही
सुकलेल्या पापण्यांनी
सखी वाट त्याची पाही

अभिमान जरी तिला
सखा असल्याचा वीर
फुटे  आठवांचा बांध
कसा  धरायचा  धीर

आसमंत  उजळला
लक्ष लक्ष त्या दिव्यांनी
दाटी केली डोळ्यांमधी
आठवाच्या आसवांनी

त्याच्याविना दिवाळीला
दिप  नाही  पाजळला
नूर  चेहऱ्याचा  तिच्या
नाही  कधी  उजळला

आग आत काळजात
तरी डोळ्यामधी हसू
दुःख दाखवावे कोणा
लपे  पापण्यात आसू

त्याचा अभिमान आम्हा
आहे तसाच तुझाही
देशासाठी  लढतो तो
त्याग ना कमी तुझाही
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: