*भाकरीचा चंद्र*
चंद्र पाहण्याचा ध्यास
आम्ही घेतलाच नाही
चंद्र भाकरीचा आम्हा
आज दिसलाच नाही
आज शितल चांदणे
आले घेऊन प्रकाश
भाग्य उजळेल कधी
त्यात नित्य अमावस
नाही माहित आम्हाला
काय शरद चांदणे
आहे आमुच्या नशिबी
भिक मागून जगणे
जागलात रात्रभर
दूध आठवीत तुम्ही
भर नाही या पोटात
जागे उपाशीच आम्ही
छान केसरी दूधात
कोण चंद्राला बघतो
भाकरीच्या चंद्रासाठी
आम्ही उपाशी जागतो
चंद्रावर मोहिमेचं
देश सपान बघतो
भाकरीच्या तुकड्यात
आम्ही चंद्राला शोधतो
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment