भाज्यांचे महत्त्व

*भाज्यांचे महत्त्व*

नको आम्हा चॉकलेट
आणि नकोच ती मॕगी
आई डब्यात आमच्या
आता देत जा ग भाजी

ताज्या हिरव्या भाजीने
व्हिटॕमीन  मिळतील
रोगराई  मग   साऱ्या
दूर    दूर     पळतील

मोड आलेली मटकी
आणि सारी कडधान्ये
करी शरीरा समृद्ध
मन हे ताजे-तवाने

रोज करूनी व्यायाम
राहू  आम्ही  तंदुरुस्त
कच्चे गाजर काकडी
टाकू करूनीया फस्त

आम्ही शाळेत शिकलो
हवे आहारात सत्व
म्हणूनच या भाज्यांचे
आम्हा वाटते महत्त्व

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

काळजाने दिला घाव जेव्हा

*काळजाने दिला घाव जेव्हा*🌹

*फूल  वेणीत  या माळतो मी*
*आठवांना तुझ्या चाळतो मी*

*दुःख  तूझ्या  उरी  दाटलेले*
*आसवे का अता गाळतो मी*

*काळजाने दिला घाव जेव्हा*
*वेदना आतल्या जाळतो मी*

*चांदणी तू जणू त्या नभाची*
*यौवनाला तुझ्या भाळतो मी*

*देव  ना भेटला मंदिरी त्या*
*जोडणे हात हे टाळतो मी*

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*

सूर छेडावे आपण

*सूर छेडावे आपण*

जरी आपण साऱ्यांचे
नाही कोणीच आपले
मोती काढून घेताच
काय कामाचे शिंपले?

आपुल्याच बासरीचे
सुर छेडावे आपण
जग टाळते म्हणून
नको घालाया बंधन

सुकलेल्या वाळवंटी
जीणं वीराण वाटते
जगण्याच्या लढाईचं
क्षण एकेक काटते

झाड सोडता आधार
फांदी एकटी उरते
झगडत संकटाशी
सारं आयुष्य झुरते

द्यावा सोडून विचार
सुटलेल्या त्या क्षणांचा
बासरीच्या सुरासवे
मोद घ्यावा जगण्याचा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

सांभाळ पावलांना

*सांभाळ पावलांना*🌹

*कोणास भान आता?*
*व्हा रे सुजान आता!*

*ना ऐकणार कोणा*
*हे बंद कान आता*

*अंधार कापण्याला*
*लागेल ज्ञान आता*

*जे चांगले जगी या*
*त्यांचीच वान आता*

*जाते अशी कशी तू*
*मोडून आन आता*

*सांभाळ पावलांना*
*नाहीस सान आता*

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत

गवताच्या पात्यावर

गवताच्या पात्यावर

गवताच्या पात्यावर
दवबिंदू चमकती
सकाळच्या किरणांचे
जणू स्वागत करती

गवताच्या पात्यावर
वारा खेळतो स्वच्छंद
चहुदिशा पसरवी
ओल्या मातीचा तो गंध

गवताच्या पात्यावर
फुले विविध रंगाची
नाना आकार ते जणू
नक्षी कोरली ढगांची

गवताच्या पात्यावर
छान ते फुलपाखरू
मन धावे धरायला
सांगा मी कसे आवरू

गवताच्या पात्यावर
गाई- गुरांची नजर
दृष्टी पडता क्षणीच
त्यास खायला हजर

✍लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

शिस्त कोणाला

शिस्त कोणाला?

शिस्त पशुमध्ये आहे
शिस्त आपल्याला कधी?
एवढ्याशा कामासाठी
किती करतो रे गर्दी?

धावायची घाई जणू
प्रत्येकाला आहे इथे
कोण घेणार माघार
शून्य संवेदना जिथे

वाहनांच्या शिस्तीविना
गेले हकनाक जीव
बेफर्वाई चालकांना
कशी येईना रे कीव

उंट चालती शिस्तीने
जरी मोकळेच रान
तोडी नियम माणूस
कसे उपटावे कान

धाब्यावर नियम रे
बसवती जन सारे
जपणारे नियमाला
प्राणी आहेत रे बरे

✍लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

संपल्या रे सुट्या

संपल्या रे सुट्या

आता संपतील सुट्या
सोडू मामाचा रे गाव
शाळेतल्या अंगणात
पुन्हा घ्यायचीय धाव

पुन्हा भेटतील मित्र
पुन्हा रंगतील गप्पा
सुट्टीतील आठवांचा
रिता करतील कप्पा

आजी सांगायची गोष्टी
लाडू वळायची मामी
लाडू चकल्या खाताना
गोष्टी ऐकायचो आम्ही

झेलताना थंड वारा
आम्ही चांदण्या मोजल्या
आम्ही दाखवता बोट
होत्या गालात लाजल्या

सांगा कुठं उटण्याला
आहे एवढा सुगंध
जसा गावच्या मातीला
आहे वेगळाच गंध

सुट्टीतल्या आठवणी
एकमेकां सांगुयात
मौजमजा तिथल्या रे
मनामधी जगूयात

✍लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
©ldsawant.blogspot.in

सांजवेळी ..गजल

*सांजवेळी*🌹🌹

गालगागा गालगागा गालगागा

भेटण्याची आस राणी सांजवेळी
भासते तू खास  राणी सांजवेळी

कैक झाल्या काळजाच्या मैफिली या
जाणवे का भास राणी सांजवेळी

यौवनाला भंगण्याचा शाप आता
देह हा आभास राणी सांजवेळी

मी पुजारी छानशा या यौवनाचा
होत आहे दास राणी सांजवेळी

लावियेले कोणत्या तू अत्तराला
ज्ञात हे कोणास राणी सांजवेळी

पंडितांनी हात देता पार झालो
वेळ ही कामास राणी सांजवेळी

लक्ष्मण सावंत

बाप

*बाप*

माझ्या बापाच्या अंगात
नित्य  फाटका  ढगला
फाटलेल्या  नशिबानं
सारं  आयुष्य  जगला

नाही वाहन पायात
कसतोय अनवाणी
पीक पिकवी मोत्याचं
काळ्याभोर माळरानी

पाला पाचोळा घेवूनी
छान झोपडी शेकरी
करी चूल्याच्या आगीत
माय ज्वारीची भाकरी

जरी गरीबी जगणं
मन त्याचं मोठं हाय
दारातून कोणीसुद्धा
रित्यापोटी गेलं नाय

नका पैशामधी तोलू
मोल बापाच्या घामाचं
नाही रक्तात हरामी
खातो घास इनामाचं

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*