संपल्या रे सुट्या
आता संपतील सुट्या
सोडू मामाचा रे गाव
शाळेतल्या अंगणात
पुन्हा घ्यायचीय धाव
पुन्हा भेटतील मित्र
पुन्हा रंगतील गप्पा
सुट्टीतील आठवांचा
रिता करतील कप्पा
आजी सांगायची गोष्टी
लाडू वळायची मामी
लाडू चकल्या खाताना
गोष्टी ऐकायचो आम्ही
झेलताना थंड वारा
आम्ही चांदण्या मोजल्या
आम्ही दाखवता बोट
होत्या गालात लाजल्या
सांगा कुठं उटण्याला
आहे एवढा सुगंध
जसा गावच्या मातीला
आहे वेगळाच गंध
सुट्टीतल्या आठवणी
एकमेकां सांगुयात
मौजमजा तिथल्या रे
मनामधी जगूयात
✍लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
©ldsawant.blogspot.in
No comments:
Post a Comment