एकटी चिमणी २

*एकटी चिमणी*

कर्ज बनलं ग फास
केलं पांढरं कपाळ
नाही पहावलं सुख
कसं अभद्र हे भाळ

झाली होती ग आमच्या
साल  दोनच  लग्नाला
धाडीयेलं  आमंत्रण
दुष्काळानं ग विघ्नाला

फुल  एकच फुललं
संसाराच्या  वेलीवर
लय होता जीव त्यांचा
इवल्याश्या मुलीवर

कोण कुणाचं असतं?
आपलच  मेल्यावर
एकटच  ग  झुलावं
लागतयं  झुल्यावर

स्वप्न पडली पांढरी
कधी होती ग रंगीत
गेले विरूनीया रंग 
आता निरस संगीत

आता एकटी चिमणी
नाही चिमणा साथीला
तेलाविना सांग कसं
बळ येईल वातीला?

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: