*न्याहरी*
धनी राबतो शेतात
घाम अंगाचा निघतो
येते दुपार डोईला
वाट सखीची बघतो
वेळ न्याहारीची होता
कानी पैंजण वाजते
मुरडत ठुमकत
सखी शेतामधी येते
अनवाणी पावलांनी
पाय भाजते चालते
धनी उपाशी शेतात
तिचं काळीज बोलते
कांदा चटणी भाकर
टोपलीत डोईवर
प्रिती तिची धन्यावर
जशी साय दुधावर
तृणपाते बांधावर
तिच्या पायाशी खेळते
फुल तोडून तिथले
तिही केसात माळते
लाज पदरी लपते
होता नजरा नजर
किती लोभस दिसतं
तिचं रूपडं साजरं
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment