*काल आज आणि उद्या*
प्रत्येक क्षणा क्षणामध्ये पाहा किती बदलले जाते
काल,आज आणि उद्यामंधी किती जग पालटते
एवढीशी परी ती माझी नाजूक पावलांनी आली
अनोळखी नजरेने पाहत हळूच आमुची झाली
पाहता पाहता दुडूदुडू ती घरात लागली चालू
काल बोबडे बोलणारी आज स्पष्ट लागली बोलू
मी तिचा बाप तरी ती माय माझी होऊन जाते
काल, आज आणि उद्यामंधी किती जग पालटते
उन्हाळा किती पाहिलेत मी आज अचूक सांगते
चूका होणारच नाहीत चूकून अशीच ती वागते
हट्ट ही तिचा झालाय कमी कधी वेगळे न मागते
लग्नाचा विषय काढताच हळूच गाली लाजते
तिच छोटीशी परी मज अजूनही ती छोटीच वाटते
काल, आज आणि उद्यामंधी किती जग पालटते
काल इवलीशी असणारी आज मोठी झाली जरी
उद्या जाईल कदाचित तिच्या स्वतःच्या ती घरी
काल माझी असणारी उद्या राहील का माझी परी
या एकाच विचाराने घर काळजात माझ्या करी
जुनेच राहील का आमच्या दोघांचे अल्लड ते नाते
कल,आज आणि उद्यामंधी किती जग पालटते
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment