*पळस फुलला*
येतो पळसाला पहा
सर्वअंगा रक्तवर्ण
माह संपताना माघ
जाती झडूनीया पर्ण
पोपटाच्या चोचीसम
याची सुंदरशी फुले
जणू फडके पताका
तशी वाऱ्यावर डुले
लाल दिसताती ज्वाला
जणू शेकोटी पेटली
मिळवाया ते तारूण्य
धरा पेटून उठली
मातकट, मळसर
जरी निसर्गाचा रंग
किमयेने पळसाच्या
सर्व राहताता दंग
झाड झाड होते सुने
जाता गळूनीया पाने
कथा पळसाची न्यारी
गातो वसंताचे गाणे
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
No comments:
Post a Comment