फाटलेल्या कपड्यात

*फाटलेल्या कपड्यात*

भुई हिरवीकंच झाली
त्या मेघुटाच्या कृपेनं
शेतामध्ये सगळीकडं
अवंदा पिकलयं सोनं

केलाय जरासा आराम
दुष्काळानं या सालात
म्हणूनच दिसून येतीय
बरकत आता मालात

जगाला पोसवितो धनी
  राहूनिया  झोपड्यात
दिसतीया श्रीमंती त्याची
  फाटलेल्या कपड्यात

धनीची उसवली वसने
राब-राबुनीया शेतामधी
भूईचं अंथरूण टेकाया
काळी आई जणू गादी

फाटलेल्या कपड्याला
मिळेल ठिगळ कधीतरी
याच आशेवर जगणं की
चार पैसे असतील पदरी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

निसर्गाची हाक

🌍 *निसर्गाची हाक*🍃

तुझ्या राक्षसी वृत्तीने
पाणी केले हद्दपार
झाल्या विहिरी वांझट
झाले ओसाड शिवार

दिसू लागल्या गावात
दुष्ट दुष्काळाच्या छटा
पाणी मिळेना पोटाला
काय करायच्या नोटा?

अशा भयाण उन्हात
पाय चाले अनवाणी
शोध पाण्याचा घेताना
दाटे डोळ्यामधी पाणी

गेलं  पाणी  वाहूनिया
नाही बांदाला बंदिस्ती
किती चिमण्या जीवांची
गेली उजाडून वस्ती

होती हिरवी धरती
गात आनंदात गाणी
नाही राहिली पाखरे
गेली संपून कहानी

हाक ऐक निसर्गाची
धर हातामधी हात
बांध बंदिस्ती घालाया
देऊ एकमेकां साथ

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

हुंड्याचा धंदा

👰🏻 *हुंड्याचा धंदा*💸

वयात येताच पोरगा जरा
धंदा जोरात चालू होतो
किती घ्यायचा हुंडा हा
हिशोब घरादारात चालतो

घरदारासह हा पट्ट्या
पोरगी बघायला जातो
कांदापोहे चालेल कशी
पुरणपोळी खाऊन येतो

बैठक बसवून लोकांची
इथं लावली जाते बोली
बापाला मग प्रश्न पडतो
का जन्माला येतात मुली

हुंड्याचा रेट प्रत्येकाचा
वेगळा ठरलेला असतो
लाख दीड लाखात कोणी
तोळ्यात विकला जातो

एक दोन हजारामुळेही
शुभकार्यात येते विघ्न
अशी पैसेपिपासु लोकं 
मोडून टाकत्याती लग्न

चिमण्या पोरीसाठी बाप
देणं सगळ करतो कबूल
दिवट्या पोराच्या अंगावर
मग चढवली जाते झुल

मातीमोल ठरतात नाती
कवडीमोल कागदासाठी
कशा जन्मा येतील पोरी
अशाने समाज्याच्यापोटी?

तुझ्या पोटी जन्मेल मुलगी
तेव्हाच सारं तुला कळेल
बोली लागताना तेव्हा तुझं
काळीज तीळ तीळ जळेल

आता तरी वाटुदे जरा खंत
अजूनही वेळ गेलेली नाही
मुलीचे बाप मागतील हुंडा
तो दिवस  खरेच दूर नाही

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

लाट

🌊 *लाट* 🌊

लाट आता समुद्रापुरतीच
मर्यादित राहिलेली नाही
किनारे कधीच सोडलेत तिने

लाट थंडीचीही येते कधी
गुलाबी स्वप्न रंगवायला
कधी उघड्यांना कुडकुडवायला

रंगाचीही असतेय लाट
कधी भगवी,निळी कधी
तर कधी असतेय ती हिरवी

लाट असते स्वातंत्र्याचीही
कधी गुलामगिरीपासून तर
कधी अनिष्ट चालीरितीपासूनची

विचारांचीही लाट असते
गांधीवादी, हिटलरवादी,
कट्टरवादी,कधी कम्युनिस्टांचीही

व्यक्तींचीही असते लाट
कधी मोदी,पुतीन कधी
कधी ट्रम्प,आणि ओबामाचीही

आलेली लाट ओसरतेच
निसर्गाच्या नियमानुसार
कधी भरती तर कधी ओहोटी

परंतु लाट असते करत नक्षी
मनाच्या किनाऱ्यावरती
क्षणिक कधी निरंतरतेसाठी

माणूसकीचीही यावी लाट
अनिश्चित कालावधीसाठी
कधी ओहोटी न येण्यासाठी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

चैञ पालवी

*चैञ पालवी*

चैञ पालवी ही चैञ पालवी
मना-मनाला खुलवी
       ही चैत्र पालवी ||धृ||

पाने फांद्यांना फुटती
खेळ हवेत खेळती
इवलेशे पक्षी सारे
तिथं घरट्यात नांदती
रणरणत्या उन्हात देती
झाडे शीतल सावली||१||

तो आखादिनी सण
चैत्र महिन्यात येतो
सासूरवाशीण लेकीला
माहेराला बोलवितो
मायबापाला भेटता
हसू गालात खुलवी||२||

रानातला रानमेवा
चैञ महिन्यात येतो
घड द्राक्षांचा असा
वेलीला लगडतो
आंबा फणस काजूने
परसबागेला फुलवी||३||

गावागावात जञा
उधळण आनंदाची
घाई सार्याचा जणांना
नवस फेडण्याची
अशी आनंद पर्वणी
सांगा कोणाला घावली||४||

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

नाथाची शिकवण

*नाथाची शिकवण*

सुर्य ओकतोय आग
या जीवाची काहिली
पानवटे नि हिरवळ
आता कुठे ना राहिली

पाण्यासाठी पशुपक्षी
दाहीदिशा भटकती
कित्येक मुके जीव
पाण्याविना तडपती

उघडावे डोळे आपण
खोलावेत हात जरा
झिजवावा देह थोडा
आपुला परोपकारा

भुकेल्यास द्यावे अन्न
तहानलेल्यास पाणी
नाथाची ती शिकवण
धरावी आपण मनी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अवघड सोपे

(अवघड क्षेत्रांत काम करणाऱ्या शिक्षकाच्या पत्निला रेखाटण्या प्रयत्न...)     

          *अवघड सोपे*

आवघड सोप्याचा जीआर येताच
आधी सांगितला बायकोला जावून
आनंदाचा पारावर नव्हता उरला
चेहऱ्यावर तिच्या तो निर्णय पाहून

खूपच काढलेत नवर्यानी माझ्या
अवघड भागामध्ये खडतर दिवस
बदली व्हावी शहरात यांची म्हणून
कितीदा केलेत देवाला मी नवस

शहरालगत बदली होईल म्हणून
बायको आनंदामध्ये दिसू लागली
गोरे दिसावेत जरासे पोट्टे म्हणून
ती पावडर जास्तच फासू लागली

चिंतेने काळवंढलेला चेहरा तिचा
लगेच उजळायला होता लागला
माझी भी पोरं शहरात शिकतील
ह्याचा तिला विश्वास वाटू लागला

लागलीच माझा फोन घेवून ती
सर्वांना सांगू लागली आनंदात
ह्यांची म्हणे होतेय आता बदली
या अवघडमधून सोप्या भागात

सुख-दु;खाच्या काळात आम्ही
असूत सर्वांच्याच बरोबर आता
कसं सांगू अवघड भागामधी
किती ह्योव जीव घुसमटत होता

नजर नको लागायला आता तरी
नकोच लावायला कोणीही दृष्ट
सोप्या क्षेञात राहणाऱ्यांनो पाहा
किती सोसावे लागतायत इथं कष्ट

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
(टिप-कवीची पुर्ण सेवा सोप्या क्षेञात झालेली असून अवघड क्षेञात काम करणाऱ्या तमाम बंधु-भगिनींना ही कविता समर्पित)

आठवण

🍂🍂 *आठवण*😥🍂

छळते जाळते मनाला ती आठवण
हसवते रडवते मनाला ती आठवण

विरहाने तुझ्या झाले मनाचे वाळवंट
शीतलतेचा गारवा जणू ती आठवण

भेटण्याच्या आशा विरल्या हवेमध्ये
मगजळच जणू आता तव आठवण

ग्रीष्मात पावसाची मनाला या आस
चातक बनवते तुझीच ती आठवण

नजरेला दुसरे आता काहीच दिसेना
ह्रुदयाची स्पंदने फक्त तुझी आठवण

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

हे वसुंधरा

🌏  *हे वसुंदधरा*🌍

हिरवी वसने फेडली तव
पाणीही केलेय दुषीत
तूझ्याच दिनानिमित्त मग
तू कशी राहशील तु खुशीत

विकासाच्या हव्यासापोटी
कापला जातो तुझा गळा
यामुळे बिघडला समतोल
कसा राहील हिरवा मळा?

दरी डोंगर सारे तुझे माते
आज ओसाड आम्ही केले
आम्हीच इथले राजवैभव
दूरवर  रसातळाला  नेले

तुझ्याच पोटी घेवून जन्म
तुलाच ओरबडतो आम्ही
गुणगान करायला तुझेच
पुन्हा करत नाहीत कमी

तुझा करून घात आम्ही
करून घेतोय कपाळमोक्ष
अधाशी बनून केले आम्ही
सारे नंदनवन इथले रूक्ष

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

बोल ना

👩🏻‍🌾 *बोल ना*🌹

लपवले का ह्रुदयात तु
राज सारे खोल ना
सोड हा अबोला सखे
माझ्याशी तु बोल ना

उनाड भासे वारा आज
उनाड त्याचा स्पर्श ही
का अंतरी वादळे आज
संपवत्याती तो हर्ष ही
वादळाला मी भेदताना
तु संग माझ्या चाल ना

कशाचा सांग राग सखे
तुझ्या नाकावर शोभतो
ओठ पाकळ्यांना का
सांग असा तो झाकतो
गीत गाण्या प्रेमाचे तु
पाकळ्या त्या खोल ना

दुरावली ती अंतरे अन्
झाला अनोळखी गंध ग
सरताना ती राञ सारी
चांदण्या झाल्या मंद ग
पुणवेकडे झुकताना
चंद्रही होई तो गोल ना

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

चला शोधूया

आम्ही थंड
तुम्ही थंड
कोण थांबवेल हे
मानवते विरूद्धचे बंड

आम्ही शांत
तुम्ही शांत
दृष्ट प्रवृतीचा
कोण करेल अंत

तुम्ही शंड
आम्ही शंड
म्हणून जातीयवादी
वाढलेत गुंड

आम्ही दुःखी
तुम्ही दुःखी
कशी होईल
जनता सुखी

आम्ही राजे
तुम्ही राजे
विकास शुन्य
नुसते तोंड गर्जे

आम्ही कवी
तुम्ही कवी
चला शोधूया
यावर युक्ती नवी

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

तो नभीचा ध्रुवतारा

*तो नभीचा ध्रुवतारा* 🌟

ढळला जातो गिरीराजही
कधी हिमस्सखलन होऊन
कधी केदारनाथ तर कधी
माळीणला पोटात गाडून

महावृक्षही पोखरला जातो
वाळव्यांच्या अक्रमणाने
तर कधी दिला जातो बळी
अवास्तव विकास नावाने

भलेभलेही गाडले गेलेत
जग मुठीत धरू पाहणारे
अजिंक्य बिरूदावलीवाले
भौतिकतेवर गर्व करणारे

उठतात मनाच्या पटलावर
ते कैक तरंग अनिश्चितेने
दृढनिश्चयही ढळला जातो
मेनकेच्या एका दर्शनाने

विश्वासही नाही राहिला
आता अभेद्य, चिरंतन
पेव अफवांचे फुटताच
आत कातरले जाते मन

पावसावरही नाही भरवसा
बेईमान होतोय तो वारा
अढळ,निश्चल,श्वाश्वत फक्त
एकच तो नभीचा ध्रुवतारा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

होय माझा देश

*होय माझा देश महासत्ता बनू लागलाय*

होय माझा देश महासत्ता बनू लागलाय!

पहिल्यासारखा आता शेतकरी दीनवानी
देवाला दोष देत बसत नाही
आत्महत्या करण्यापेक्षा या सरकारला
सळो की पळो करून सोडू लागलाय

बेरोजगारीचे कारण नशीबाला आता
कोणताच तरूण मानत नाही
विविध कौशल्यात निपून होतोय तो
किंवा स्वतःच उद्योग उभारू लागलाय

दास्यत्वाची वल्कले स्त्रीयांनी केव्हाच
गाडून टाकल्यात काळाच्या मातीत
अन्यायाविरूद्ध पेटून उटत्यात आणि
आत्मविश्वासही मनात जोर धरू लागलाय

पाप-पुण्य या भाकडकथेत कोणी रमत नाही
कर्मकांडालाही सहसा जुमानत नाही कोणी
विज्ञानाचा वसा सर्वांनीच अंगीकारलाय
चंद्रावर पाय ठेवून मंगळाला पाहू लागलाय

जाती-पातीची बंधने केव्हाच झुगारलेत
खांद्याला खांदा लावून झटतोय प्रत्येकजन
समानतेचा वसा आता प्रत्येकानेच घेतलाय
सविंधानाचे नियम जो तो पाळू लागलाय

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

अंधकार पसरतोय

*अंधकार पसरतोय*

संपतोय तो प्रकाश
अंधारतेय ती वाट
सोनेरी किरणांची
हरवतेय ती पहाट

दूरावली सारी नाती
सुटले हातातले हात
आपल्या मतलबाने
केला आपलाच घात

झाडांच्या नरडीवरती
आम्हीच ठेवली कुर्हाड
चिऊकाऊचं सुखातलं
हाकलून दिलं बिर्हाड

चॕटिंग करण्यासाठी
संवादच केलाय बंद
संकुचित प्रवृत्तीमध्ये
झाले सारे नजरबंद

वंशाच्या दिव्यासाठी
वातीलाच विसरतोय
म्हणून तर घराघरात
हा अंधकार पसरतोय

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

प्रेमवेडा

🌹 *प्रेमवेडा*🌹

माझ्या गुलाबी प्रश्नांना
नकोय ग काटेरी उत्तर
सौंदर्यासह तुझ्या सखे
पसरू दे सुगंधी अत्तर

तुझ्या मुलायम केसात
माळावा वाटतो गजरा
का दडवतेस पदरात तु
मुखडा तुझा तो लाजरा

ओठ सखे तुझे जणू की
गुलाबाच्या  पाकळ्या
हसतेस जेव्हा गाली तु
उमलतात जशा कळ्या

पैंजणाची ती रूणझुण
ह्रुदयाची छेडते तार
कातिल मृगनयनांनी तव
होतात माझ्यावर वार

समजावे मी तरी किती
हा जीव गुंतला तुझ्यात
विसरून तुलाच तुही
मिसळून जावे माझ्यात

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
© *ldsawant.blogspot.in*

नजर मायेची

*नजर मायेची*

झेप आकाशी घेतली
चित्त बाळापाशी होते
तिच्या भविष्यासाठीच
बळ पंखामध्ये येते

आहे शर्यत जीवाची
दंग धावण्यात जो तो
माय घेते धाव परी
जीव लेकीत गुंततो

राणी झाशीची लढली
पुञ पाठीशी बांधून
माता जपते पुञांना
राञं - दिवस रांधून

उर्मी एकच मनाला
ध्येय गाठायचे आता
धावताना हरीणीला
जशी पाडसाची चिंता

तिची नजर मायेची
दूर हटेना थोडीही
जीवा इवल्या सोडून
जावू वाटेना पुढेही

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

आला उन्हाळा

🔥 *आला उन्हाळा*🍂

धारा घामाच्या घेवून
आलाय हा उन्हाळा
सोसवेना कोणालाही
गरम हवेच्या झळा

तळ गाठलेली विहीर
ओस पडलेला गाव
चहूदिशा पाण्यासाठी
बायापोरं घेती धाव

भेगाळलेली जमीन
हळदीजर्द बाबूळ
ओझंटलेले वाहणारे
नभात शुभ्र ढगूळ

जागोजाग पाणपोई
गार कुल्फीचे ठेले
गावोगावी गावकरी
ग्रामयाञेत रंगलेले

थंड ठेवा तुम्ही शरीरा
नि ठेवा मनालाही थंड
उन्हासह झेलायच्यात
झळा महागाईच्या प्रचंड

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

पुन्हा येवो रामराज्य

रामा तुझ्या राज्यामधे
आद्भुत लागलय घडू
रामच गेला जीवनातील
अनुभव येतायत कडू

मर्यादा आपल्यासम इथं
कोणीच पाळत नाही
कितपत चालवावी जीभ
काहींना हेही कळत नाही

परस्री मातेसमान मानणे
आता सारेच विसरलेत
तिची आब्रु लुटण्याईतपत
कित्येक नराधम घसरलेत

सुखी प्रजेची संकल्पना
केव्हाच झालीय नष्ट
अन्यायाचे झेलत घाव
अजूनही सोसतेय कष्ट

भावा-भावामधून आता
विस्तवही जात नाही
माणुस नावाची जात
आता दिसूनच येत नाही

कोणतीच सासू सुनेला
अजूनही मानत नाही लेक
संयम नाही कोणाकडेच
उडतो संतापाचा उद्रेक

पुन्हा येवो श्रीराम राज्य
हीच मनाला अभिलाषा
नाहीतर कटकारस्थानाने
काळवंडून जातील दिशा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

माझ्या शाळेत चल माझ्या दोस्ता


माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता गीताच्या चालीला अनुसरून

माझ्या शाळेत चल माझ्या दोस्ता

चिखला-पाण्याचा तुडवीत रस्ता
माझ्या शाळेत चल माझा दोस्ता

बा मातीचे मातीचे करतोय सोनं
शिक्षण घेवून त्याची वाढवू शान
प्रगत होऊन उंचावू त्याची मान
आणिक किती खाईल तो खस्ता

बघ गणित गणित झालय सोप
जसा शंकु शंकु जोकराचा टोप
कशाला धरायचा शेताचा रस्ता
माझ्या शाळेत चल माझ्या दोस्ता

घेवूया शिक्षण शिक्षण जावूया पुढे
डिजीटल तंञाने तंञाने शिकू धडे
अज्ञानाने लागेल जीवा घोर नस्ता
माझ्या शाळेत चल माझ्या दोस्ता

या देशाचे आहोत आपण भविष्य
ज्ञान घेवूनीया होऊ गुणवंत शिष्य
नाहीच कठीण हा प्रगतीचा रस्ता
माझ्या शाळेत चल माझ्या दोस्ता

✍🏻 लक्ष्मण दशरथ सावंत
जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद
© ldsawant.blogspot.in

जगण्याचे बळ

*जगण्याचे बळ*

सोसवेना आता या
तिव्र उन्हाची झळ
विहिरींनीही केव्हाच
गाठलाय तो तळ

पर्ण झडून वृक्षवेली
बोडक्या झाल्यात
पाण्याविना पडल्या
धरतीलाही भेगळ

पाणवटे केव्हाचेच
पडलेत सारे ओस
प्राणी सैरावैरा झाले
शोधताना मृगजळ

सुकल्यात पापण्याही
सुकताना पिके मोती
जखम काळजामध्ये
कसे दाखवणार वळ

आस  कर्जमाफीची
या  मनाला  लागलीय
तरी  मायबाप सरकार
अजूनही काढतय पळ

इडापिडा टळू दे सारी
येवो दे  बळीचे राज्य
आत्महत्येविना येऊ दे
त्याला जगण्याचे बळ

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*