तो नभीचा ध्रुवतारा

*तो नभीचा ध्रुवतारा* 🌟

ढळला जातो गिरीराजही
कधी हिमस्सखलन होऊन
कधी केदारनाथ तर कधी
माळीणला पोटात गाडून

महावृक्षही पोखरला जातो
वाळव्यांच्या अक्रमणाने
तर कधी दिला जातो बळी
अवास्तव विकास नावाने

भलेभलेही गाडले गेलेत
जग मुठीत धरू पाहणारे
अजिंक्य बिरूदावलीवाले
भौतिकतेवर गर्व करणारे

उठतात मनाच्या पटलावर
ते कैक तरंग अनिश्चितेने
दृढनिश्चयही ढळला जातो
मेनकेच्या एका दर्शनाने

विश्वासही नाही राहिला
आता अभेद्य, चिरंतन
पेव अफवांचे फुटताच
आत कातरले जाते मन

पावसावरही नाही भरवसा
बेईमान होतोय तो वारा
अढळ,निश्चल,श्वाश्वत फक्त
एकच तो नभीचा ध्रुवतारा

✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*

No comments: